‘मैं ऐसा क्यूं हूं’ हे हृतिक रोशनचे लोकप्रिय गाणे आहे. हा प्रश्न मानसशास्त्रातदेखील महत्त्वाचा आहे. त्याचे उत्तर देणारे वेगवेगळे सिद्धांत आहेत. जन्माला येतानाच व्यक्ती कशी असणार हे ठरलेले असते, असे काही जण मानतात. गुणसूत्रे अर्थात ‘जीन्स’वर आधारित अनुवंशशास्त्र यालाच महत्त्व देते. ‘मी रागीट आहे, कारण माझे वडील असेच होते,’ असे मानणारी व्यक्ती याचे उदाहरण आहे. याउलट वर्तनचिकित्सा असे मानते की, जन्मत: कोण कसा होणार हे ठरलेले नसते, व्यक्तिमत्त्व हे वातावरणानुसार घडते. वर्तनचिकित्सा म्हणजे ‘बिहेविअर थेरपी’चे संशोधक डॉ. वॉटसन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘मला कोणतीही दहा मुले द्या आणि त्यातील कुणाला शास्त्रज्ञ, कुणाला गायक आणि कुणाला खेळाडू बनवायचे ते सांगा; मी त्यांना तसे बनवून दाखवतो.’ हे करून दाखवण्याची संधी त्यांना मिळाली नाही; पण मुले मातीचा गोळा असतात, तुम्ही त्यांना हवा तो आकार देऊ  शकता, हा समज याच सिद्धान्तानुसार आहे. ही दोन्ही मते एकांगी आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. व्यक्तिमत्त्व हे जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही घटकांचा परिणाम असते. अन्य प्राण्यांसाठी हेच दोन घटक असतात. मात्र माणसाच्या बाबतीत आणखी एक घटक महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्याची निवड करण्याची क्षमता! ‘जीन्स’ आणि लहानपणाचे वातावरण हे व्यक्ती निवडू शकत नाही; मात्र तिला आयुष्यात कोणत्या दिशेने जायचे आहे, ही निवड करण्याची क्षमता माणसात असते; ती साक्षीभावाने शक्य होते. अशी अनेक उदाहरणे आहेत की, जुळे भाऊ  एकाच घरात लहानाचे मोठे झाले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगवेगळे होते. त्यांचे ‘जीन्स’ सारखे असतात, वातावरणदेखील तेच असते. दारुडय़ा बापाचा जुळ्या मुलांतील एक मुलगा दारुडा होतो. ‘लहानपणापासून दारू घरात येत होती म्हणून पिऊ  लागलो,’ असे तो म्हणतो. दुसरा मात्र व्यसनमुक्तीचे काम करू लागतो. ‘दारूमुळे संसाराची कशी वाताहत होते हे मी पाहिले, त्यामुळे हे काम करतो,’ असे तो सांगतो. परिस्थिती तीच असूनदेखील प्रतिसाद दोघांनीही वेगवेगळा दिला. त्यामुळे दोघांचेही व्यक्तिमत्त्व वेगळे झाले. ही निवड करण्याची क्षमता विकसित करणे हे मानसोपचारातील समुपदेशनाचे एक ध्येय असते. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com