एखाद्या प्राण्याने आपल्या प्रदेशातील सीमारेषा विष्ठा, मूत्र विसर्जन अशा चिन्हांनी किंवा खुणांनी निश्चित केलेल्या असतानादेखील, जर अतिक्रमण अथवा घुसखोरी थांबली नाही तर तो प्राणी घुसखोराला रागाचे प्रदर्शन करून समज देताना दिसतो. रागाचे प्रदर्शन प्राण्यांमधील श्रेणीय व्यवस्थेमुळे अथवा स्वत:च्या आणि पिल्लांच्या सुरक्षेसाठीसुद्धा केले जाते. हे प्रदर्शन विविध प्रकारचे, रंजक, बोलके आणि आगळीक करणाऱ्याच्या विरोधात असते. यामुळे इजा आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी टाळता येतात; परंतु त्याचबरोबर ‘मी इजा आणि वेदना देऊ शकतो’ याची समजसुद्धा दिली जाते. शरीराचा आकार, शिंगं, नखे, दात यांच्या मदतीने राग दर्शविला जातो, तसेच जोरात श्वास घेणे, गुरगुरणे, उत्तेजित होऊन हालचाली करणे, चेहरा उग्र करणे, दात विचकणे, सुळे दाखविणे, अंगावर धावून जाणे या गोष्टींचाही समावेश असतो. हा ‘माझ्या हद्दीत आल्यास परिणाम वाईट होईल’ असा जणू समोरच्याला दिलेला इशाराच असतो.

नर-वानर (प्रायमेट्स) गटातील प्राणी चेहऱ्यावरील भाव बदलून राग प्रदर्शित करतात, तर मासे, शीर्षपाद प्राणी गडद रंग धारण करून समोरच्याला समज देतात. थोडक्यात, याद्वारे प्रत्यक्ष हल्ला करण्याची गरज जोखली जाते. राग अथवा संतापाचे प्रदर्शन नर जास्त प्रमाणात करताना दिसतो. चिम्पान्झीमध्ये दोन गटांत त्यांचा प्रदेश राखण्यासाठी रागाचे प्रदर्शन केले जाते. नर माउंटन गोरिला दुसऱ्या नरावर हल्ला करण्यापूर्वी हातांच्या तळव्यांना गोलसर आकार देत छाती बडवून, जमिनीवर हात आपटून रागाचे प्रदर्शन करतो. कुत्रा भुंकतो, गुरगुरतो आणि दात दाखवतो.

राग दर्शविण्याचा प्राण्याला जैविक फायदा असतो. त्याची तंदुरुस्ती वाढते, जी नैसर्गिक निवडीसाठी अनुकूल ठरते. जेव्हा एखादे अनोळखी हाउलर माकड दुसऱ्याच्या प्रदेशाजवळ येते तेव्हा तेथील रहिवासी नराकडे एकत्र केकाटत आक्रोश करतात; हा आवाज तीन मैलांपर्यंत ऐकू येतो. हा घुसखोरास दिलेला इशारा असतो. गटातील सर्व लांडगे एकदम आक्रोश करून नजीकच्या गटाला इशारा देतात, तर फिडलर खेकडा त्याचा नख्या असलेला लांब हात हलवून प्रदेशासाठीचा इशारा देतो. अनेकदा स्वत:चा प्रदेश राखताना मोठा आवाज करून, कलकलाट करून आणि घुसखोराच्या मागे लागून त्याला पळवून लावले जाते. हे सगळे करूनदेखील घुसखोर ऐकत नसेल तर मात्र प्राण्यांकडे प्रत्यक्ष हल्ला करण्यावाचून गत्यंतर उरत नाही.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org