आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून मिळणाऱ्या पाण्याच्या वापराचे संख्यात्मक विश्लेषण म्हणजे ‘वॉटर ऑडिट’!  या विश्लेषणाच्या अंतिम निष्कर्षांतून- आपण पाणी अतिशय काळजीने किंवा जपून वापरतो की निष्काळजीपणे उधळपट्टी करतो, हे आपल्याला कळते. तसेच या अत्यंत बहुमोल नैसर्गिक संसाधनाची काळजी घेण्याची आवश्यकताही अधोरेखित होते. अशा परिस्थितीत जेवढे पाणी उपलब्ध आहे त्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, आर्थिक-सामाजिक स्तराचा विचार न करता प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाण्याचा समान वाटा मिळावा यासाठी घरगुती वापरातील तसेच व्यावसायिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे वेळोवेळी लेखापरीक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे.

आता या लेखापरीक्षण करण्याच्या पद्धतीचा थोडक्यात आढावा घेऊ या. उदाहरणादाखल, ‘क्ष’ शाळेत अशा प्रकारचा प्रकल्प करावयाचा आहे. यासाठी सुरुवातीला शाळेत महापालिकेव्यतिरिक्त पाणीपुरवठय़ाचे अन्य काही स्रोत- उदा. बोअरवेल, विहीर आदी आहेत का, याचे सर्वेक्षण करावे. यानंतर या स्रोतांतून इमारतीला किती पाणी पुरवले जाते, हे मोजावे आणि त्याची नोंद करावी. यापुढची पायरी म्हणजे, शाळेच्या संपूर्ण इमारतीत पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर वापरासाठी किती नळजोडण्या आहेत, याची मोजणी करावी आणि एक तक्ता तयार करून याची नोंद करावी. मग नळ सुरू केल्यानंतर त्यातून वाहणाऱ्या पाण्याचे मोजमाप करावे. यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे ठरावीक आकारमानाचे एक भांडे घेऊन ते नळाच्या पाण्याने पूर्ण भरण्यास किती वेळ लागतो, हे मोजावे. उदा. ५०० मिलिलिटर आकारमान असलेले भांडे पूर्ण भरायला एक मिनीट लागला असे आढळून आले, तर यावरून त्या पाण्याचा ताशी प्रवाह काढता येईल  आणि यावरून २४ तासांत सरासरी किती पाणी वापरले गेले हे काढता येईल. याच पद्धतीने  खराब झालेल्या व गळक्या नळांमधून किती पाणी वाया जाते आहे, हे मोजता येईल. शौचालयातील फ्लश टाकीची पाणी साठवण्याची क्षमता आणि फ्लश केल्यानंतर वाया गेलेले पाणी हेदेखील मोजता येईल.

थोडक्यात, शाळेला पुरवठा करण्यात आलेले पाणी, प्रत्यक्ष वापरले गेलेले पाणी आणि वाया गेलेले पाणी यांचा हिशेब करून भविष्यासाठी  पाण्याचे काटेकोर नियोजन करता येईल. हीच पद्धत आपण आपल्या घरीसुद्धा वापरू शकतो!

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org