उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात प्राणी जमिनीवर, भूपृष्ठावर अधिवासासाठी अनुकूल झाले; परंतु त्यांच्यासमोर पिल्लांच्या संगोपनाची वेगळी आव्हाने उभी राहिली. जमिनीवरील बरेचसे सरपटणारे प्राणी अंडी घालतात, तर काही पिल्लांना जन्म देतात. म्हणजेच अंडी घालण्यापासून त्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत त्यांची काळजी घेणे पालकांसाठी गरजेचे ठरते. या प्राण्यांमध्ये संगोपनाच्या विविध रंजक आणि अचूक पद्धती दिसून येतात. सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगरी आणि कासवे खूप जास्त अंडी घालतात. झाडांच्या बुंध्यांच्या फटीमध्ये, झाडाच्या उतीमध्ये अशा ठिकाणी साप अंडी घालतात. पाली आणि सापांमध्येसुद्धा अंडी घालण्याची योग्य जागा, त्यांचे रक्षण आणि पिल्लांची काळजी या गोष्टी दिसतात. या प्राण्यांमध्ये विविध प्रकारची घरटी/ घरे बांधली जातात.

सर्वात उच्च दर्जाची आणि विकसित अशी संगोपनाची पद्धत मगरींमध्ये दिसून येते. त्यांच्यातील अमेरिकी ‘एलिगेटर’ प्रजातीतील मादी कुजणाऱ्या वनस्पतीच्या साहाय्याने घर बांधते. त्यामुळे अंडी पाण्याच्या पातळीपासून अलगद वर उचलली जातात आणि त्यांना आवश्यक ते तापमान आणि आद्र्रता मिळते. मादी घराचे रक्षण करते आणि पिल्लांना बाहेर पडण्यास मदतसुद्धा करते. ‘नाईल’ मगरीची मादी किनाऱ्यावरील वाळूत एक खड्डा करून त्यात अंडी घालते आणि दुरून त्यावर नजर ठेवते. अंडय़ांतून आवाज येऊ लागले, की पिल्लांना बाहेर पडण्यास मदत करते; इतकेच नव्हे, तर पिल्लांना तोंडात धरून पाण्याच्या बांधाशी आणून सोडते.

कासवे अंडय़ांसाठी एक खास खड्डा करतात; त्यात अंडी घालतात आणि निघून जातात. पालींच्या आणि सापांच्या काही प्रजाती अंडय़ांजवळ राहतात. अंडी उबविण्याचा काळ अंडय़ांची संख्या, तापमान आणि आद्र्रता यांवर अवलंबून असतो. संशोधनानुसार, अंडय़ांतून नर की मादी बाहेर येणार हे खड्डय़ातील तापमानावर ठरते. घरटय़ाचे तापमान कमी असेल तर जास्त करून नर जन्म घेतात आणि अधिक तापमानात जास्त मादींची निर्मिती होते. पिल्ले बहुधा त्यांचा पाण्याकडे जाण्याचा प्रवास रात्रीच्या वेळी करतात. कासवांच्या अंडय़ांच्या रक्षणासाठी आणि पिल्लांच्या पाण्याकडे जाण्याच्या यशस्वी प्रवासासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जातात. ‘इगुआना’ प्रजाती (एक प्रकारची घोरपड) खड्डा बराच खोलवर खणते आणि अंडी घातल्यावर तो खड्डा सैलसर मातीने बंद केला जातो.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org