चिंताजनकरीत्या विलोपनाच्या धोक्यात असणाऱ्या प्रजातींच्या संवर्धनाचा शेवटचा उपाय म्हणून त्यांचे बंदिवासात प्रजनन करून नैसर्गिक किंवा नव्याने निवडलेल्या अधिवासात त्यांचे पुन:स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. माणसाळलेल्या तसेच वन्य अशा साऱ्याच प्रजातींना बदलत्या परिस्थितीत टिकाव धरण्यासाठी जनुकीय वैविध्य आवश्यक असते. यामुळे बंदिवासातील प्रजननात जनकांमधील (पेरेंट्स) नातेसंबंध गुणकांक (कोइफिशियंट ऑफ रिलेटेडनेस) कमीत कमी राखून बहि:प्रजनन (आऊट ब्रीडिंग) घडवून आणण्याला प्राधान्य दिले जाते.साधारणपणे २५ ते ३० विभिन्न ठिकाणांहून मिळविलेल्या प्राण्यांना जनक बनवून त्यांना पोषक व नियंत्रित परिस्थितीत वाढवून प्रजननासाठी उद्युक्त केले जाते. ‘जायंट पांडा’सारखे अनेक प्राणी बंदिवासात प्रजनन करीत नाहीत. अशा प्राण्यांना दीर्घकाळ नियंत्रित परिस्थितीत ठेवणे भाग पडते, ज्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत बदल होऊन त्यांच्या पुढील पिढय़ांत स्वत:चे अन्न मिळवणे किंवा संघर्षांत टिकाव धरणे अशा क्षमता लोप पावू लागतात. याखेरीज परिस्थितीत कालानुरूप बदल होत नवी आव्हाने निर्माण होऊन नव्या पिढीला टिकाव धरणे कठीण होते. अशा आव्हानांचे पूर्वानुमान लावून यथायोग्य प्रशिक्षण देऊन किंवा जनुकीय बदल घडवून प्रजातींचे पुन:स्थापन योग्य प्रकारे होईल याची काळजी घ्यावी लागते.
विज्ञान- तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सुयोग्य जनकांचे रेत (सीमेन)/ शुक्राणू / अंडपेशी यांचे निम्नतापी जतन (क्रायोप्रिझव्र्हेशन) करून ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणे शक्य झाले आहे. काही शास्त्रज्ञ व पशुवैद्य यांच्या मते, अशा पेशींची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने त्यांचा वापर टाळावा; पण जे प्राणी बंदिवासात प्रजनन करीतच नाहीत, त्यांच्यासाठी हे साहाय्यी प्रजनन तंत्रज्ञान (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) मदतीला येऊ शकते. कृत्रिम रेतन किंवा प्रयोगशाळेतील फलन व परमातृकी (सरोगसी) पद्धतीने गर्भपोषण यांद्वारे प्रजोत्पत्ती होऊ शकते. शिवाय या पद्धतीत एका नर किंवा मादीपासून मोठय़ा संख्येने प्रजोत्पत्ती करता येऊ शकते. जैवतंत्रज्ञानात वनस्पतींच्या काही पेशींपासून अनेक निरोगी वनस्पती तयार करण्याची कुशलता मोठय़ा प्रमाणात आत्मसात करण्यात आली आहे व ‘ऑर्किड्स’सारख्या बीजांपासून पुनरुत्पत्ती कठीण असलेल्या किंवा ‘गुलाबां’सारख्या बीज नसणाऱ्या वनस्पतींचे पुनरुत्पादन नित्याचे झाले आहे. या ‘जेनेटिक क्लोनिंग’ तंत्रज्ञानाने जन्माला आलेल्या प्राण्यांचे आरोग्य आणि वयोमानविषयक समस्यांमुळे ते प्रजननासाठी अथवा प्रजाती संवर्धनासाठी वापरले जात नाहीत.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील गोठीव प्राणिसंग्रहालयात (फ्रोझन झू) आजवर विलोपनाच्या धोक्यातील ३५५ प्रजातींच्या भ्रूण/ रेत/ शुक्राणू/ अंडपेशी/ उतींचे निम्नतापी जतन भविष्यातील पुनरुज्जीवनासाठी केले गेले आहे.
– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org