अ‍ॅमेझॉन जंगलाच्या पश्चिम ब्राझील भागातले झापुरी हे गाव. या गावापासच्या जंगलातून झाडांपासून रबराचा चीक (लॅटेक्स) गोळा करणारा एक युवक चिको मेण्डेस. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मेण्डेस वयाच्या नवव्या वर्षांपासूनच वडिलांबरोबर लॅटेक्स गोळा करण्याच्या रोजंदारीवर जात असे. झाडांना काहीही इजा न पोहोचवता मेण्डेस आणि त्यांचे सहकारी लॅटेक्स गोळा करत. परंतु जागतिक विकासाच्या वेगात रबराला प्रचंड किंमत आली आणि मोठमोठय़ा उद्योजकांची नजर या विस्तीर्ण पसरलेल्या जंगलाकडे वळली. शेकडो वर्षांपासून स्थानिकांनी जोपासलेली ही वनसंपदा यंत्रांच्या साहाय्याने धडाधड कोसळू लागली. हजारो हेक्टर्सची जंगले नाहीशी होत होती.

बांधकाम व्यवसायातील कंपन्यांसाठी नवीन रस्ते, इमारतींसाठी लाकूड याकरिता जंगलाचा मोठा पट्टा नष्ट केला जात होता. परिसरातील खाणींमधून सोडलेले रासायनिक पाणी जंगलातील नद्यांना प्रदूषित करत होते. या साऱ्याचा दुष्परिणाम अ‍ॅमेझॉनच्या वृक्षसंपदेवर, पशुपक्ष्यांवर आणि सगळ्याच जैवविविधतेवर होऊ लागला होता. व्यावसायिकांच्या हव्यासापोटी हे जंगल असेच नष्ट होत राहिले तर वनसंपदेबरोबरच आपला रोजगारही धोक्यात येईल याची जाणीव लॅटेक्स गोळा करणाऱ्या ‘रबर टॅपर्स’ना होऊ लागली. यासाठी एक लढा उभारण्याची गरज होती आणि त्यासाठी पुढाकार घेतला चिको मेण्डेस यांनी. वयाच्या १७ व्या वर्षी मेण्डेस यांनी सर्वप्रथम टॅपर्सना लिहा-वाचायला शिकवून त्यांना अ‍ॅमेझॉन जंगलाबाहेरच्या जगाची ओळख करून दिली. मग लढय़ास प्रवृत्त केले. या लढय़ात अ‍ॅमेझॉनमधील मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन्सचे मिळालेले सहकार्य ही सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. कारण रेड इंडियन्स आणि रबर टॅपर्स यांच्यामधील अनेक वर्षांचे वैर यामुळे संपुष्टात आले होते.

जगभरातील लोक मेण्डेस यांच्या लढय़ात सामील होऊ लागले. जून १९८८ मध्ये मेण्डेस यांचे बालपण जिथे गेले त्या सेरिगल कॅचोइरासह आणखी तीन क्षेत्रे ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने या लढय़ाला यश मिळत असतानाच, २२ डिसेंबर १९८८ रोजी मेण्डेस यांची हत्या करण्यात आली. त्याआधी सहा वेळा झालेल्या हल्ल्यांमुळे मेण्डेस यांना या संघर्षांत आपल्या जिवाचे काही बरे-वाईट होऊ शकते याची कल्पना होती. म्हणूनच त्यांनी सांगून ठेवले होते की, ‘‘माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी मला फुले नकोत. कारण ती जंगलातून तोडून आणलेली असतील.’’ मृत्यूनंतरही केवळ जंगलांचा, वनसंपदेचा विचार करणारा हा लढवय्या विरळाच म्हणावा लागेल.

– मनीष चंद्रशेखर वाघ मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

office@mavipamumbai.org