05 April 2020

News Flash

कुतूहल : ग्राहक आणि पर्यावरण

जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिक मानके गाठण्याचा प्रयत्न करणारी आपली अर्थव्यवस्था आहे

(संग्रहित छायाचित्र)

ग्राहक राजासाठी बाजारपेठ सजवणाऱ्या सर्व बाजारांचे स्वरूप आजतरी फक्त नफ्याकरता चालवणारा व्यवसाय असेच आहे. या स्पर्धेमध्ये मानवी मूल्ये आढळत नाहीत. पर्यावरणीय मर्यादांचे भान तर कधीच आढळत नाहीत. आजही आपल्या देशाकडे पाहण्याचा इतर देशांचा दृष्टिकोन हा ‘जगातील सर्वात मोठी बाजारपेठ’ असाच आहे. लोकशाही मूल्यांमुळे मोकळेपणा, स्वातंत्र्य आणि खरेदीक्षमता यामुळे बहुविविधतेने नटलेल्या या देशात व्यापार करण्याचे अनेक पाश्चात्त्य देशांनाही आकर्षण आहे.

जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिक मानके गाठण्याचा प्रयत्न करणारी आपली अर्थव्यवस्था आहे. मात्र आपल्या देशाच्या विकसनशीलतेचा गैरफायदा घेऊन आपल्यावर कुरघोडी करणाऱ्या आर्थिक महासत्ता त्यांची अनेक उत्पादने आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आपल्याला ग्राहक म्हणून उत्तम वस्तू रास्त दरात मिळत नाहीत. देशी वस्तूंची गुणवत्ता समान असली तरीही, ती कमी संख्येने उत्पादित करून अत्यंत स्पर्धात्मक किमतीला विकण्याचे आव्हान इथले उत्पादक स्वीकारू शकत नाहीत. भरमसाट उत्पादकता, कमी प्रतीचा कच्चा माल, उत्पादकतेची अत्यंत कमी किंमत, सवलतीची करप्रणाली आणि अत्यंत स्वस्त कर्मचारी वर्ग या इतर देशांतील परिस्थितीमुळे आपली उत्पादने बाजाराच्या स्पर्धेत उतरत नाहीत.

त्यामुळे पर्यावरणीयदृष्टय़ा धोकादायक उत्पादने सहजरीत्या आपल्या बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होतात, लोकप्रिय होतात आणि विकलीही जातात. आपल्या सणांचा, आवश्यकतांचा अभ्यास करून इथल्या, स्थानिक उत्पादनांना पर्याय म्हणून आणलेली स्वस्त उत्पादने ही सुरक्षित आणि पर्यावरणसहयोगी असतातच असे नाही. उदाहरणार्थ, आशियातील खेळण्यांच्या बाजारपेठेत आलेली अनेक खेळणी ही पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवल्यामुळे ती लहान मुलांना अपायकारक असल्याचे सिद्ध झाले होते.

अशा प्रकारे बाजारपेठ या असुरक्षित मालाने भरून टाकून स्थानिक उत्पादने मारून टाकल्याने ग्राहक म्हणून आपली स्वायत्तता धोक्यात येते. आपण कायमचे आयात केलेल्या उत्पादनांवर अवलंबून राहू लागतो. जे संपूर्णपणे अपर्यावरणीय आहे. जागतिक ग्राहक दिनी (१५ मार्च) उत्तम ग्राहक म्हणून स्थानिक उत्पादने विकत घेण्याचे अभियान सुरू करणे ही आजची गरज आहे. ‘‘तुमच्या गल्लीतील दुकानदाराकडून माल घ्या. तो स्वदेशी. पलीकडच्या गल्लीतील दुकानदार परकीय.’’- इति महात्मा गांधी!

 विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 12:10 am

Web Title: article on customers and the environment abn 97
Next Stories
1 कुतूहल : पर्यावरण रक्षणाची त्रिसूत्री   
2 मनोवेध : अस्तित्ववाद
3 मनोवेध : प्रेरणा
Just Now!
X