07 July 2020

News Flash

कुतूहल : वाळवंटीकरण प्रतिरोध-दिन

दरवर्षी १७ जून हा दिवस ‘जागतिक वाळवंटीकरण प्रतिरोध दिन’ म्हणून जगभर पाळला जातो.

संग्रहित छायाचित्र

वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील अतिकोरडा आणि अतिशय कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश की जेथे वनस्पती व प्राणीजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड, वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिकदृष्टय़ा वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८ टक्के, तर थंड वाळवंटांनी १६ टक्के भाग व्यापलेला आहे. बदलते हवामान, जैवविविधतेचा ऱ्हास यांबरोबर वाळवंटी व दुष्काळी क्षेत्रांची वाढ हीदेखील चिंतेची बाब बनली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या संदर्भात १९९२ साली रिओ दि जानिरो येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत (‘अर्थ समिट’मध्ये) ठराव मांडला आणि १९९४ मध्ये त्याला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळून ‘यूएनसीसीडी’ (संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिरोधक कार्यक्रम) मार्फत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्ताने दरवर्षी १७ जून हा दिवस ‘जागतिक वाळवंटीकरण प्रतिरोध दिन’ म्हणून जगभर पाळला जातो.

जमिनीची धूप होणे तसेच कस कमी होणे, बदलते हवामान, वाढते वाळवंटीकरण, स्थानिक मर्यादा व गरजा अशांसारख्या मुद्दय़ांचा दुष्काळी स्थितीशी असलेला संबंध ‘यूएनसीसीडी’कडून अभ्यासला जातो. विकासाची पर्यावरणविरोधी संकल्पना बदलून शाश्वत विकास, स्थानिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, जमिनीचा योग्य वापर, शेतीची नवी तंत्रे अशा बाबी स्वीकारल्यानेही वाढत्या वाळवंटीकरणाचा सामना करता येईल.

या वर्षीच्या ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोध दिना’ची संकल्पना आहे ‘मानवासाठी अन्न, पशुधनासाठी खाद्य आणि पुन्हा मानवासाठी वस्त्र’ या गरजा भागविण्यासाठी शाश्वत विकास आणि वापर. दिवसेंदिवस जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी जंगलतोड करून शेतजमीन मिळवावी लागत आहे. त्यामुळे २०३०पर्यंत अन्न उत्पादनास अतिरिक्त ३०० दशलक्ष हेक्टर जमीन लागेल असा अंदाज आहे. सन २०५० पर्यंत दहा अब्ज लोकांच्या गरजा भागविण्यासाठी  जमिनीची उत्पादकता वाढवणे, आपली जीवनशैली बदलणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण व कमी वापर करणे आवश्यक आहे. जंगलतोड हा यावर उपाय नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या  दिनानिमित्ताने निरनिराळे उपक्रम राबविले जाऊन समाजात याबाबत जागरूकता निर्माण केली जाते.

– शुभदा वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 12:06 am

Web Title: article on desertification resistance day abn 97
Next Stories
1 मनोवेध : ध्यान की झोप
2 कुतूहल : पर्यावरण अभ्यासक्रमाचे स्वरूप
3 कुतूहल : पर्यावरण शिक्षणाचा निर्णय
Just Now!
X