– डॉ. यश वेलणकर
सजीव शरीरातील गतिमान संतुलन हे आरोग्याचे निदर्शक आहे. शरीराचे तापमान, रक्तातील साखरेचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण अशा अनेक गोष्टी स्थिर नसतात; त्या ठरावीक मर्यादेत कमी-जास्त होत असतात. ही मर्यादा ओलांडली की आरोग्य बिघडते. शरीरातील समतोल बिघडल्यानेच असे होते. कोणत्याही बाह्य़ किंवा आंतरिक कारणांनी हा समतोल बिघडू लागल्यानंतर तो लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा संतुलन साधण्याच्या क्षमतेवर आरोग्य अवलंबून असते. व्यायाम, योगासने आणि प्राणायाम यामुळे ही क्षमता विकसित होते. त्यामुळे या कृती आरोग्यासाठी लाभदायक आहेत.
योगासने करताना शरीराला वेगवेगळ्या स्थितींत नेले जाते. अर्धमत्स्येन्द्रासनात पाठीच्या कण्याला पीळ देतो किंवा शीर्षांसनात उलटे होतो, तेव्हा शरीराचे संतुलन बिघडते. पण त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतो तेव्हा शरीर पुन्हा संतुलन साधते. प्राणायामातील कपालभाती किंवा उड्डीयान बंध केल्यानेही संतुलन बिघडते आणि शरीर पुन्हा तो साधते. या क्रियांच्या सरावामुळे संतुलन बिघडल्यानंतर पुन्हा समतोल साधण्याची शरीराची क्षमता विकसित होते, शरीराला तेच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता वाढते. हे जसे शरीरात होते, तसेच मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक आहे, असे मेंदूविषयक संशोधकांना वाटते. म्हणजे कोणत्याच आव्हानाला कधीही सामोरे न गेलेल्या माणसाला साधेसे संकटही नामोहरम करते; कारण त्याच्या मेंदूला समतोल साधण्याचे प्रशिक्षण मिळालेले नसते. अतिशय स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात राहिलेल्या माणसाची रोगप्रतिकारशक्ती अतिशय दुबळी होते.
अगदी तसेच सतत सुरक्षित वातावरणात वाढलेल्या माणसाच्या मेंदूचेही होते. त्यामुळे थोडय़ाशा अपयशाने औदासीन्य येते, संकटाच्या विचारांनीच चिंतारोग होतो. अशा वेळी मेंदू त्याच्या परीने संतुलन साधण्याचे स्वत:ला प्रशिक्षण देऊ इच्छित असतो. दर्दभरी गाणी ऐकणे हे अशा प्रकारचे एक प्रशिक्षण आहे. ती ऐकल्याने मेंदूत दु:खप्रसंगी होणारे बदल होतात, पण ते कायम राहत नाहीत. मेंदूतील स्थिती बदलते; पण मेंदूला संतुलन साधण्याचे प्रशिक्षण मिळते. शीर्षांसन केल्याने जे शरीरात होते, तेच दर्दभरी, विरह गीते ऐकल्याने मेंदूत होते. त्याचमुळे दु:ख ही भावना त्रासदायक असली, तरी ती भावना निर्माण करणारी गाणी ऐकावी असे वाटते. अशी गाणी ऐकताना शरीरातील संवेदनांकडे लक्ष ठेवले आणि त्यांचा साक्षीभाव ठेवून स्वीकार केला, तर त्याचा लाभ अधिक होतो.
yashwel@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 7, 2020 12:07 am