05 April 2020

News Flash

कुतूहल : पर्यावरण आणि हवामान

विशेषत: पावसाच्या अंदाजासाठी हवामान खात्याला सर्वात जास्त टीका सहन करावी लागते.

पर्यावरण आणि हवामान यांचे नाते आहे. खरे तर पर्यावरण म्हणजे वातावरण आणि वातावरणाचे तंत्र, स्वरूप व आपल्याला जाणवणारे बदल म्हणजे हवामान. आकाशवाणीवरून दररोज सायंकाळी दिल्या जाणाऱ्या हवामान वृत्ताचे महत्त्व काय, असे आपल्याला आज सुरक्षित शहरात वाटू शकते. परंतु बदलणाऱ्या हवामानाचा वायूमार्ग, जलमार्गाने चालणारी वाहतूक, पाणी व हवेवर चालणारे उद्योगधंदे तसेच समुद्रकिनाऱ्याचे तापमान, खारे व मतलई वाऱ्यांचा वेग व तीव्रता या साऱ्यांवर परिणाम होतो.

आपण सर्व अनेकदा, विशेषत: पावसाच्या अंदाजावरून हवामान खात्याची चेष्टा करतो. परंतु आपण या सर्व बातम्या किंवा इशारे ऐकले तर आपल्याला कळेल की, हवामानाचा ‘अंदाज’ सांगितला जातो, हवामानाचे ‘भविष्य’ वर्तवले जात नाही. हा अंदाज निसर्गातील अनेक घटकांवर अवलंबून असतो. यापैकी निसर्गाच्या अनाकलनीय वागणुकीने काही गोष्टी बदलल्यास एकदम वेगळाच अनुभव येतो. उदाहरणार्थ, आपल्या समुद्रात येऊन उभे राहिलेले वादळ कोणत्या दिशेने जाईल याचे आडाखे बांधता येतात. काळजीही घेता येते. परंतु नंतर ते वादळ कधी अचानक दिशा बदलून इतरत्र निघून जाते, तेव्हा आपल्या मनात या विज्ञानाबद्दल शंका निर्माण होतात. पण दिलेल्या अंदाजावरून वादळ त्याच ठिकाणी आल्यावरही केलेल्या पूर्वनियोजनामुळे वित्तहानी कमी झाली आणि जीवितहानी झाली नाही, तरीही हवामान खात्याला कोणी श्रेय देत नाही.

विशेषत: पावसाच्या अंदाजासाठी हवामान खात्याला सर्वात जास्त टीका सहन करावी लागते. समुद्रातील प्रवाहांची हालचाल, डॉप्लर रडारचे साहाय्य आणि आजवरचे अनुभव वापरून पावसाचे अंदाज बांधणे पूर्णपणे वैज्ञानिक आहे. परंतु मोसमी वाऱ्याच्या लहरीप्रमाणे आणि जागतिक तापमानवाढीच्या परिणामी अत्यंत अचूक अंदाज केला तरीही त्यामध्ये काहीसा फरक पडू शकतो. हवामानाचे ‘मॉडेल’ तयार करून, बाहेरून आलेल्या माहितीवरून प्रक्रिया करून आणि त्याला दिलेल्या संगणक आज्ञावलीप्रमाणे आपल्याला हवामानाबद्दल सूचना मिळतात आणि त्या सूचनांचे एकत्रीकरण करून हवामानाचा अंदाज केला जातो.

आज (२३ मार्च) जगभर साजरा होत असलेल्या ‘जागतिक हवामान दिना’च्या निमित्ताने आपल्याजवळील हवामान मापन करणाऱ्या एखाद्या केंद्राला भेट दिली, तर आपल्याला हवामानाचे विज्ञान कळेल आणि पर्यावरणाचे गणित व हवामानाचे अंदाज यांमध्ये असलेला मानवी हस्तक्षेप कळेल. मग निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या या विज्ञानशाखेबद्दल आपल्याला आदर वाटू लागेल. यंदा हवामान दिनाचे संकल्पना -सूत्र आहे ‘हवामान आणि पाणी’; तर काल (२२ मार्च) साजरा झालेल्या जागतिक जल दिनाचे संकल्पना-सूत्र होते.. ‘हवामान बदल आणि पाणी’!

– डॉ. संजय जोशी  मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 3:38 am

Web Title: article on environment and climate akp 94
Next Stories
1 कुतूहल : ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार
2 रोगांचे कारण
3 कुतूहल : पाणी आणि हवामानबदल
Just Now!
X