28 March 2020

News Flash

कुतूहल : अरण्यसंस्कृतीचा शाश्वत वारसा

सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील काही देवरायांचा परिचय लेखकाने या पुस्तकात करून दिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देवराई.. देवाला वाहिलेला घनदाट जंगलाचा एक भाग! देवबन, देवरहाटी, शरणवन, नागवन, मातृकावन अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या जंगली भागाविषयी त्यातले मोठाले वृक्ष, त्यावर डवरलेल्या वेली, नानाविध प्राणी, पक्षी यांमुळे एक गूढत्व प्रत्येकाच्याच मनात असते.

श्राद्धिक भावनेमुळेच आजवर संरक्षित असलेला हा वारसा वाढते शहरीकरण, नानाविध विकास प्रकल्प, स्मार्ट सिटीची स्वप्ने यांमुळे आज नष्ट होत असल्याचे दिसून येते. पर्यावरण परिसंस्थेतील अनन्यसाधारण भाग असलेल्या या देवराईंचे महत्त्व देवराईतज्ज्ञ डॉ. उमेश श्रीराम मुंडल्ये यांनी ‘देवराई : निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा’ या पुस्तकातून अतिशय सोप्या, सहज भाषेत समजावून दिले आहे. सुमारे दोन दशकांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ३,८०० पैकी तब्बल १,५०० देवरायांमधून दिवस-रात्र केलेला अभ्यासपूर्ण प्रवास आणि या प्रवासातून घेतलेले ‘देवराई’ या संकल्पनेबद्दलचे अनुभव सामान्य वाचकांना कळेल अशा भाषेत सांगणारे डॉ. मुंडल्ये हे स्वत:ला ‘रूढ अर्थाने लेखक’ समजत नसले, तरी त्यांचे हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी देवराईंबद्दलचा माहितीकोशच ठरावा. एकूण १६ प्रकरणांमधून लेखकाने देवराईंचा इतिहास, त्यांचे वैशिष्टय़, जैवविविधतेतील त्यांचे महत्त्व आणि सध्या शिल्लक असलेल्या देवराईंच्या संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न आदी मुद्दे विस्तृतपणे मांडले आहेत. पाण्याच्या संवर्धनात देवराईंचा मोलाचा वाटा कसा आहे, याची माहितीही एका स्वतंत्र प्रकरणातून दिली आहे. तर ‘देवराई आणि देवता’ या प्रकरणातून श्रद्धेमुळेच हा अरण्यवारसा आजही काही प्रमाणात शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील काही देवरायांचा परिचय लेखकाने या पुस्तकात करून दिला आहे. तसेच देवरायांचे महत्त्व, त्यांचे उपयोग याबाबतची जनजागृती करून लोकसहभागामधून देवराया वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयीही माहिती दिली आहे. शेकडो वर्षांचा वारसा, तसेच अनेकविध प्रजातींचे वृक्ष, निरनिराळे प्राणी, फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, दिवसा अंधार आणि रात्री तर कोणी जायलाही धजावणार नाही अशी गूढता.. ही देवरायांची काही वैशिष्टय़े. त्यामुळे देवरायांबद्दल निर्माण होणारे कुतूहल डॉ. मुंडल्ये यांच्या पुस्तकामुळे निश्चितच शमते.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 12:14 am

Web Title: article on eternal legacy of the forest culture abn 97
Next Stories
1 मनोवेध : लोगो थेरपी
2 कुतूहल : ग्राहक आणि पर्यावरण
3 कुतूहल : पर्यावरण रक्षणाची त्रिसूत्री   
Just Now!
X