07 August 2020

News Flash

कुतूहल : खारफुटीचे अस्तित्व

ज्ञात जीवाष्मांच्या अभ्यासानुसार, सपुष्प वनस्पतींच्या उत्पत्तीनंतर लगेचच खारफुटी अस्तित्वात आल्या

संग्रहित छायाचित्र

 

भरती-ओहोटीच्या क्षेत्रातील खारफुटी जंगले ही चैतन्य व गतिमानतेने भरलेली व भारलेली परिसंस्था आहे. कालौघात अधिवासातील गुणात्मक व परिमाणात्मक बदल त्यात दिसून येतात, जे निसर्गातील इतर संस्थांत आढळत नाहीत. हे बदल कसे झाले हे पाहणे रोचक व उद्बोधक ठरते.

ज्ञात जीवाष्मांच्या अभ्यासानुसार, सपुष्प वनस्पतींच्या उत्पत्तीनंतर लगेचच खारफुटी अस्तित्वात आल्या. क्रिटेशिअन काळाचा (कल्पक युग) उत्तरार्ध ते पॅलीओसीन काळाचा पूर्वार्ध यादरम्यान, ‘नायपा’ या पामवर्गीय व त्यानंतर ‘सोनेरेशिआ’ या वृक्षवर्गीय खारफुटीचा उल्लेख सापडतो. तत्पूर्वी, मेसोझोईक युगातील टेथीस समुद्रात (हिंदी व अटलांटिक महासागराची पूव्र्योत्पत्ती) या वनस्पतींची निर्मिती होऊन, त्या चार भिन्न दिशांना गेल्याने पृथ्वीवर विखुरल्या. मात्र इतर वनस्पतींच्या तुलनेत त्यांची व्याप्ती मर्यादित राहिली. या वस्तुस्थितीची पडताळणी आजही करता येते.

सद्य:स्थितीतील खारफुटीची वाढ आणि विस्तार ही मानवी क्रियांवर अवलंबून आहे. प्रदूषण, बेसुमार जंगलतोड आणि शेती व मत्स्यशेतीसाठी खारफुटी जमिनीचा पर्यावरणात्मक गैरवापर ही प्रमुख कारणे खारफुटी प्रजातीत व अधिवासात बदल घडवतात. खारफुटी आरोपणाचे प्रयत्न स्तुत्य असले तरीही, काही ठिकाणी खारफुटीचे नैसर्गिक वितरण लक्षणीयरीत्या बदलले गेले आहे. खारफुटीच्या प्रजाती संख्या व सुपीकता यांत घट झाली आहे. आर्थिक लाभापायी त्यांचा अधिवास नसलेल्या जागी त्यांची लागवड केली जात आहे, जे पर्यावरणदृष्टय़ा हानिकारक आहे. यामुळे रोपांची वाढ खुंटते, व्याप्ती कमी होते, त्यांच्या शरीरातील आद्र्रतेचे, क्षारांचे प्रमाण बदलते. परिणामी त्यांच्या नैसर्गिक गुणवत्ता व गुणधर्मात फरक दिसून येतो.

भविष्यात, उत्क्रांती/विकास व जागतिक स्तरावरील वितरण यांचा विचार केल्यास आणि सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यास, पुढील तीन घटक कारणीभूत ठरावेत : (१) रचनात्मक बदल, (२) शारीरक्रियात्मक बदल, (३) जीव-रासायनिक भेद. पर्यावरणातील अहितकारी बदल खारफुटीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण व संवर्धनासाठी ठोस निर्णय घेतले असले, तरीही आर्थिक विकासासाठी खारफुटी जंगलतोडीचे विविध मार्ग अवलंबले जात आहेत. शासकीय-निमशासकीय संस्था व प्रामुख्याने बिगरशासकीय सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने सार्वत्रिक सहभागातून इतर विकास प्रकल्पांबरोबरच खारफुटी विकास व व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने केले, तर या सकलोपयोगी, बहुगुणी, बहुमूल्य नैसर्गिक साधनसंपत्तीचे भवितव्य उज्ज्वल असेल हे निश्चित!

– प्रा. डॉ. संजय देशमुख

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:06 am

Web Title: article on existence of mangrove abn 97
Next Stories
1 कुतूहल : खारफुटी महोत्सव
2 मनोवेध : प्रतिबिंब
3 मनोवेध : स्वमग्नतेमध्ये माइंडफुलनेस
Just Now!
X