मुक्या प्राण्यांवर दया करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपण त्यांची भूक भागवायला आणि पुण्य (!?) पदरात पाडायला सरसावतो. माकडांना चकल्या, बिस्किटे; माशांना पाव, कणीक; कावळे, सीगल यांना गाठीया शेव आणि चिमण्या, कबुतरांना गहू, ज्वारी खायला टाकण्याची काही जणांना सवय असते. वरवर पाहता ही कृती भूतदयावादी वाटू शकते. पण या ‘अनैसर्गिक’ अन्नाचा त्या जीवांवर काय आणि कसा परिणाम होत असेल, याचा विचार आपण कधी केला आहे का?

अन्नाची सहज उपलब्धता, चविष्टपणा यांमुळे या पक्षा-प्राण्यांना त्याची चटक लागते. साहजिकच कष्ट करून अन्न मिळवायचे प्रयत्न ते हळूहळू विसरू लागतात. तळलेले व अनैसर्गिक अन्न यांमुळे त्यांना स्थूलत्व  येते आणि ते आक्रमक होतात. त्यांच्या अधिवासात ते एकलकोंडे होतात. इतरांच्या तुलनेत या पक्षी-प्राण्यांच्या चापल्य आणि प्रसंगी प्रजननक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. नैसर्गिक अन्न खाणारे आणि सतत अनैसर्गिक अन्न सेवन करणारे असे दोन गट यांच्यात पडतात. जिथे समजूतदार, जाणता माणूस या चमचमीत अन्नाला बळी पडतो, तिथे वैद्यक सुविधा नसलेल्या या मुक्यांची काय कथा?

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

सीगलसारखे स्थलांतरित पक्षी- जे अति थंडीमुळे आपल्याकडे आलेले असतात, त्यांना तर पुन्हा त्यांच्या  प्रदेशात जातादेखील येत नाही. कावळे, कबुतरे यांची वाढती संख्या हादेखील चिंतेचा विषय आहे. कणीक, पाव यांमुळे कायम अपचनी झालेले मासे हे बगळ्यांचे अगदी सहज अन्न बनतात. दुष्परिणामांची ही मालिका त्यांचा आयुष्यभर पिच्छा पुरवते. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोच, त्यात या मानवनिर्मित संकटाची भर कशाला?

या वागण्याला आपण भूतदया म्हणायचे का? उद्या जर या सगळ्यांनी कृमी, कीटक, किडे, डासांची अंडी, झाडाची कोवळी पालवी, कच्ची करवंदे  यांसारखे त्यांचे अन्नपदार्थ आपल्याला खायला दिले तर तुम्ही-आम्ही ते खाऊ का? त्यामुळे ज्याने चोच दिली तो चाराही देतो, या नैसर्गिक तत्त्वाला छेद देत ‘पुण्य’ कमावण्यासाठी या अमूल्य नैसर्गिक संपत्तीचा सर्वनाश आपल्याकडून होत नाही ना, याचा विचार सर्वानीच करायला हवा.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org