21 November 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : खेळ आणि मेंदू

व्यायाम, आवड, छंद म्हणूनही काही जण खेळ चालू ठेवतात, ही मेंदूपूरक कृती आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. श्रुती पानसे

आपण एकूण आयुष्यात सर्वात जास्त कधी खेळतो? तर ते बालपणात! याला अपवाद अर्थातच  खेळाडूंचा. तसंच, व्यायाम, आवड, छंद म्हणूनही काही जण खेळ चालू ठेवतात, ही मेंदूपूरक कृती आहे.  मात्र हे मान्य करायला हवं की जेवढं आपण लहान वयात खेळतो, तेवढा वेळ मोठय़ा वयात खेळ खेळत नाही.

पण प्रश्न असा आहे की आजची छोटी मुलं भरपूर खेळतात का? त्यांना खेळायला मित्रमंडळी आणि मोकळी जागा असते का?  शहरात मुलांना मदानं नसल्यामुळे, खेळण्याची सोय नसल्यामुळे, मुलं कायम घराच्या चौकटीच्या आतच राहिल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होतो? ‘खेळणं’ या मुलांच्या नैसर्गिक गरजेला मोठय़ांच्या जगात काहीही स्थान नाही. त्यापेक्षा त्यांनी टय़ूशनला जाणं हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. गावाकडे मोकळी जागा असते. मुलं खेळतातही. पण टीव्हीचं आकर्षण बरंच आहे. त्यामुळे छानशा संध्याकाळीसुद्धा मुलं टीव्हीवर कार्टून बघत असतात. नाहीतर टय़ुशनला गेलेली असतात.

लहान वयात खेळ हा सर्वात महत्त्वाचा असतो; अगदी जीव की प्राण म्हटलं तरी चालेल. न खेळता स्वस्थ बसणं त्यांना जमत नाही, याला एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे.  ती मेंदूची गरज आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. दोन्ही मेंदूंचा समतोल साधण्यासाठी हा भाग सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी त्याला द्यायचा मुख्य खाऊ म्हणजे हालचाल. ही हालचाल व्हावी अशी मेंदूची गरजच नव्हे; तर मागणी असते. या सगळ्या परिस्थितीमुळे मुलांच्या खेळण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचे दुष्परिणाम आहारावर झाले आहेत. आरोग्याच्या समस्याही पूर्वीपेक्षा जास्त असतात.

मुलं चिडचिडी होतात, अस्वस्थ होतात. अभ्यासाच्या पद्धती विचित्र होतात, वागणं बदलतं. टोकाच्या भावना दिसून येतात. कारण न खेळल्यामुळे मनात भावना कोंडून, साचून राहतात. खेळण्याचे फायदे खूपच आहेत. त्यापैकी एक म्हणजे, मेंदूला ऑक्सिजन मिळून तो तरतरीत होतो. एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्तीवरही खेळण्याचा चांगला परिणाम होतो. हे केवळ लहान मुलांच्या बाबतीतच नाही, मोठय़ांनीही जमेल तेव्हा लहान मुलांसारखं खेळलं पाहिजे आणि लहान मुलांना खेळू दिलं पाहिजे.

contact@shrutipanse.com.

First Published on June 12, 2019 12:52 am

Web Title: article on games and brain
Just Now!
X