गेल्या १०० वर्षांत यापूर्वी कधीही झाले नाही एवढय़ा झपाटय़ाने पृथ्वीचे तापमान वाढले. यास ‘ग्लोबल वॉर्मिग’ अर्थात जागतिक तापमानवाढ असे म्हटले जाते. हा अत्यंत चिंतेचा विषय असला, तरी या वाढत्या तापमानाची झळ आपल्याला ज्या प्रमाणात बसायली हवी तशी बसलेली नाही. त्याचे कारण पृथ्वीवरचे ९० टक्के अतिरिक्त तापमान समुद्रच शोषून घेत असतो. उष्णता धरून ठेवणारा कार्बन डायऑक्साइड वायू विशेषत: पावसाबरोबर सागरात शिरतो आणि जड असल्याने समुद्राच्या तळाशी जातो. शिवाय दररोज हवेत सोडल्या जाणाऱ्या लाखो मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड आणि अन्य विषारी वायूंचे लक्षणीय प्रमाणात विघटन समुद्रातच होते.

परंतु सागरपृष्ठावरच्या तापमानवाढीमुळे सागरी तुफाने येतात. सागरांतर्गत तापमानवाढदेखील या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढवत असते. जेव्हा ही तुफाने सागर घुसळून काढतात, त्या वेळी सागरात अडकलेला कार्बन डायऑक्साइड फेसाबरोबर पृष्ठभागावर येतो आणि पुन्हा वातावरणात मुक्त होतो. त्याच्या परिणामी तापमानवाढ होते. समुद्राच्या पाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या तापमानाचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सजीवांना बसतो. चक्रीवादळांमुळे लाखो हेक्टर क्षेत्रातली पिके, प्राणी वाहून जातात. प्रचंड पडझड होते. काही खेडय़ांचे अस्तित्वच पुसले जाते.

पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे अंटाक्र्टिका भागातील हिमनद्याही वितळायला लागल्या आहेत. गेल्या शतकात समुद्राच्या पाण्याची पातळी २० सेंटिमीटरने वाढलेली आहे; त्यामुळे सखल भागात समुद्राचे पाणी शिरू लागले आहे. मात्र, समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत गेल्यास, या शतकाअखेर समुद्राच्या पाण्याची पातळी ९० सेंटिमीटरने वाढण्याचा धोका आहे. तसे झाल्यास, येत्या ५० वर्षांत मुंबई, टोकियो, न्यू यॉर्क या महानगरांसह अनेक मोठय़ा शहरांचे अस्तित्व नाहीसे होईल, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने दिला आहे. उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या निरीक्षणात्मक अभ्यासानंतर ‘नासा’ने हा निष्कर्ष काढला आहे.

खरे तर जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम तुम्हा-आम्हाला, सर्व सजीवांना भोगावे लागणार आहेत. आपण ठरवले तर आपणच यातून मार्ग काढू शकू; पण त्यासाठी आपल्याला जागतिक तापमानवाढीची कारणे समजून घ्यायला हवीत. माणूसच यास कसा जबाबदार आहे, तेही समजून घ्यावे लागेल.

चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org