16 January 2021

News Flash

कुतूहल : गणितासह प्रवास..

आदिम काळापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा राहिल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

आदिम काळापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा राहिल्या आहेत. त्या मार्गी लागल्यावर सुसंस्कृतपणाकडे आणि त्यानंतर आधुनिकतेकडे वाटचाल करताना अर्थपूर्ण संवाद, साहित्य, कला व क्रीडा आणि काळाच्या ओघात प्रगत तंत्रज्ञान हे सर्व विकसित झाले. भाषा आणि गणित जवळपास एकत्र उदयास आल्यामुळे हे शक्य झाले. त्यातील गणित आपल्या नित्य व्यवहारात इतके गुंफले गेले आहे, की त्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उपस्थिती लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, भ्रमणध्वनीच्या (सेलफोन) कार्यात द्विमान अंकगणित, सारणी बीजगणित, त्रिकोणमिती, संकेतन सिद्धांत अशा अनेक गणिती शाखा वापरल्या जातात. थोडक्यात, कुठलेच क्षेत्र गणितापासून अलिप्त नाही.

तथापि, विषय म्हणून गणिताचा अभ्यास करताना कित्येकांना अडचण जाणवते. यासाठी काही वेळा गणिताची अमूर्तता, आदर्श रचना आणि पोलादी तार्किक चौकट, तर अनेकदा केवळ पुस्तकी अध्यापन तसेच त्याचे उपयोग न सांगितले जाणे, हे घटक जबाबदार असतात. त्यामुळे ‘गणित हा यांत्रिक, रुक्ष आणि मर्यादित वापरता येणारा विषय आहे’- तेव्हा केवळ परीक्षेत चांगले गुण मिळाले की झाले, अशी समजूत होते. पण मानवी आयुष्याच्या बहुतेक सगळ्या छटांशी गणित निगडित आहे. गोष्टी, कविता, कोडी, खेळ, चुटके या रंजक बाबीही गणितात आहेत. यामुळे २०२१ मध्ये गणिताचे विविध ज्ञात व सहसा माहीत नसलेले पैलू, उपयोजन आणि निवडक गणितज्ञांच्या गोष्टी हे विषय ‘कुतूहल’मध्ये सादर केले जातील.

सर्वाना समजतील, भावतील असे नवीन दृष्टिकोन देणारे तसेच गणिताबद्दलची उत्सुकता वाढवणारे लेख अनुभवी आणि नवोदित गणितलेखक या सदरात लिहितील. त्यांचे समन्वय चारुशीला जुईकर या करतील. गणितात रस निर्माण व्हावा आणि अधिक कुतूहल निर्माण व्हावे असा प्रयत्न राहील. आपला प्रतिसाद मोलाचा असेल. वर्षभरात कुठले लेख असावेत याबद्दल आम्ही एक बृहत्आराखडा तयार केला आहे. पण तुमच्या प्रतिक्रिया, मागणी लक्षात घेऊन त्यात बदल केले जाऊ शकतील. तरी गणिती प्रवाहातील या प्रवासास सिद्ध व्हा.. तुम्हाला या सफरीत अनेक नवी स्थळे, दिशा आणि विचार नक्कीच गवसतील.

–  डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:06 am

Web Title: article on journey with mathematics abn 97
Next Stories
1 कुतूहल – पर्यावरणासाठी साद..
2 मनोवेध : जीवनोत्सव
3 मनोवेध : वर्तनबदल
Just Now!
X