News Flash

कुतूहल : गणित पंचांगाचे!

कालगणित आणि अवकाशस्थानगणित असे ग्रहगणिताचे दोन भाग असून त्यात कालमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे

(संग्रहित छायाचित्र)

गुढीपाडवा! या दिवसापासून नवीन पंचांगाच्या आधारे हिंदू बांधव नववर्ष सुरू करतात. पंचांग हे कालगणनेचे साधन प्राचीन काळापासून भारतामध्ये प्रचलित आहे. पृथ्वीचे स्वत:च्या अक्षाभोवतीचे भ्रमण, चंद्राचे पृथ्वीभोवतीचे भ्रमण आणि पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण यांवर आधारलेली कालगणना पद्धत म्हणजे पंचांग! या भ्रमणांच्या कक्षा (लंबवर्तुळाकार मार्ग), पृथ्वीपासूनचे चंद्र-सूर्याचे अंतर व भ्रमणांचा वेग यांवरून पंचांगामध्ये असणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा,चंद्रोदय आणि तिथिक्षय, ग्रहणांचे कालावधी इत्यादी तपशील गणिताने निश्चिात केले जातात. इस्लामी कालगणना चंद्र गतीवर तर ख्रिश्चान कालगणना सौरगतीवर तयार केलेली आहे. मात्र हिंदू पंचांग चांद्रसौर आहे. पंचांगाची म्हणजे पाच अंगे असलेल्या तक्त्याची तिथी, नक्षत्र, योग, करण आणि वार ही अंगे आहेत.

कालगणित आणि अवकाशस्थानगणित असे ग्रहगणिताचे दोन भाग असून त्यात कालमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतामध्ये फार प्राचीन काळापासून वेग, वेळ आणि अंतर याबाबतचे गणन आणि मापन पुष्कळसे अचूकपणे करण्यात येत होते. सूक्ष्म कालावधी मोजण्यासाठी परमाणू, अणू, त्रसरेणू, त्रुटी,लव, निमेष, काष्ठा, घटिका, पळे तर महाकाय कालमापनासाठी संवत्सर, युग, महायुग, मन्वंतर, कल्प अशी एकके अस्तित्वात होती. बहुतांश गणन अंकगणित वापरून केले जात असे आणि अभ्यासकांच्या सोयीसाठी तयार कोष्टके देण्याची पद्धत होती.

चंद्राच्या बदलत्या कलांवरून एका चांद्रमासात ३० तिथी होतात. चंद्र  व सूर्य यांच्यामध्ये १२ अंशांचे कोनात्मक अंतर (लॉंन्जिट्यूडिनल अँगल) पडण्यासाठी लागणारा काळ म्हणजे तिथी. चांद्रवर्षाचा काळ सुमारे ३५४.३७ दिवस तर सौरवर्षाचा काळ सुमारे ३६५.२४ दिवस असतो. ऋतुचक्र सूर्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीचा काळ व त्यानुसार येणारे सणसमारंभ यांमध्ये मेळ साधण्यासाठी अधिकमासाची संकल्पना आली. दरवर्षीच्या अंदाजे १०.८७ दिवसांच्या  फरकामुळे सामान्यपणे २७ ते ३३ महिन्यांनंतर अधिक महिना येतो. क्वचित क्षयमासही येतो. पंचांगाचे गणित ज्यांवरून पूर्वी केले जात असे त्या ग्रंथांना ‘करणग्रंथ’ म्हणत. आकाशात दिसणारी ग्रहताऱ्यांची स्थिती व पंचांगातील गणित यांचा मेळ साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. सध्या यासाठी संगणकाची मदत होते. शिळाप्रेसवर छापलेले पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी प्रसिद्ध केले. वैज्ञानिक मेघनाद साहा

(६ ऑक्टोबर १८९३-१६ फेब्रुवारी१९५६) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेवरून भारत सरकारने १९५७ मध्ये राष्ट्रीय पंचांग स्वीकारले. यात ३६५ दिवसांच्या सौरमानाच्या वर्षात वैशाख ते भाद्रपद असे पाच महिने ३१ दिवसांचे व उर्वरित महिने ३० दिवसांचे घेऊन फक्त लीप वर्षात चैत्र महिना ३१ दिवसांचा ठरवण्यात आला.

– प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 12:07 am

Web Title: article on math almanac abn 97
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : सिंहिणीचा पर्वत… सिएरा लिओन!
2 कुतूहल : ध्येयाची होतसे पूर्ती…
3 नवदेशांचा उदयास्त : आजचे आयव्हरी कोस्ट
Just Now!
X