‘मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे’- हे जीवनविषयक तत्त्व सांगणारे, आधुनिक तत्त्वज्ञानाचे आणि वैश्लेषिक (अ‍ॅनालिटिक) भूमितीचे जनक असणारे रेने देकार्त यांचा जन्म ३१ मार्च १५९६ रोजी फ्रान्समधील ला हेग या गावी झाला. ला फ्लेश येथील जेझुइट शाळेत त्यांचा भौतिकशास्त्राशी आणि गणिताशी परिचय झाला. सन १६१८ मध्ये तत्कालीन प्रथेप्रमाणे ते प्रोटेस्टंट डच सैन्यामध्ये दाखल झाले, जेथे त्यांना लष्करी अभियांत्रिकीच्या शिक्षणामुळे गणितात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. असे म्हटले जाते की, १०-११ नोव्हेंबर १६१९ च्या रात्री देकार्त यांना साक्षात्काराचा अनुभव देणारी स्वप्ने पडली, ज्यांतून वैश्लेषिक भूमितीची तसेच गणिताच्या पद्धती तत्त्वज्ञानात वापरण्याची कल्पना त्यांना सुचली.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?

देकार्त यांनी सन १६३७ मध्ये आपला ‘ला जिऑमेट्री’ हा भूमितीविषयक निबंध प्रसिद्ध केला. त्यात प्रथमच बीजगणित आणि भूमिती हे तोपर्यंत पूर्णपणे स्वतंत्र असणारे विषय एकत्र आणणाऱ्या वैश्लेषिक भूमिती/बैजिक भूमिती या विषयाची कल्पना मांडली गेली होती. याचा उपयोग पुढे कलनशास्त्राच्या उत्पत्तीतही झाला. देकार्तपूर्वी बीजगणितीय समस्या शब्दांमध्ये मांडल्या जात. देकार्त यांनी चल दाखवण्यासाठी अक्षरे आणि घातांक लिहिण्यासाठी क्ष२, क्ष३ अशी पद्धत वापरली, जी आजही सर्वत्र वापरतात. दिलेल्या कोनाचे कितीही समान भागांत विभाजन करणे, तीन प्रकारच्या त्रिघाती समीकरणांच्या उकलीची भौमितिक रचना करणे, शांकवांचे समीकरणाद्वारे वर्णन करणे- असे प्रश्न देकार्त यांनी हाताळले आणि बैजिक भूमितीची ताकद दाखवून दिली.

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, घातमूळ या बैजिक क्रिया रेषाखंडांच्या रचनांतून दाखवण्याची पद्धतही देकार्त यांनी सांगितली. त्यामुळे भूमितीय समस्या समीकरणांत रूपांतरित करणे शक्य झाले. त्यापूर्वीचा- वर्गपदे क्षेत्रफळ आणि घनपदे घनफळच दाखवतात, हा समज देकार्त यांनी दूर करून ही पदे रेषाखंडांची लांबीही दाखवण्यासाठी वापरली. दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या बिंदुपथाने (लोकस) दर्शवला जाणारा भौमितिक आकार शोधण्याच्या समस्या त्यांनी सोडवल्या, ज्यासाठी आधार म्हणून एक सरळ रेषा (अक्ष) घेत असत. तिच्यापासूनची अंतरे लक्षात घेऊन आकार शोधत असत. यात आपण वापरत असलेल्या कोणत्याही द्विमितीय बिंदूचे दोन सहगुणकांनी निर्देशन करणाऱ्या (देकार्त यांच्या नावाने प्रसिद्ध) ‘कार्टेशियन भूमिती’ची बीजे दिसून येतात.

‘देकार्त प्रमेय’ तसेच बहुपदीच्या धन आणि मूळ निर्वाहांची (रूट्स) संख्या सांगणारा ‘चिन्हांचा नियम (रूल ऑफ साइन्स)’ हे देकार्त यांच्या नावाने ओळखले जातात. प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन, इंद्रधनुष्यापाठील तत्त्व यांचेही गणिती विश्लेषण त्यांनी केले. तत्त्वज्ञानामध्येही त्यांचे भरीव योगदान आहे. सर्व विज्ञानशाखांमध्ये गणिताचा वापर करण्यावर भर देणाऱ्या देकार्त यांचा ११ फेब्रुवारी १६५० रोजी मृत्यू झाला.

– डॉ. राजीव सप्रे

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org