– डॉ. यश वेलणकर

आपल्या मनातील बरेच विचार स्मरणशक्तीमुळे येत असतात. स्मरणातील काही गोष्टी जुन्या असतात आणि काही तात्कालिक असतात. संगणक किंवा स्मार्ट फोनमध्ये साठवणूक (स्टोअर) क्षमता आणि ‘रॅम’ (रॅण्डम अ‍ॅक्सेस मेमरी) वेगवेगळी असते, तसेच मेंदूतही असते. तात्कालिक स्मरणशक्ती फोनच्या ‘रॅम’सारखी असते. तिच्यात आपण किती माहिती एका वेळी धारण करू शकतो, याला मर्यादा असतात. शास्त्रज्ञांच्या मते, माहितीचे सात गठ्ठे एका वेळी धारण करता येतात. मेमरी विकसित करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली असते, त्यांच्यासाठी हे खरे आहे. आपली क्षमता यापेक्षा कमी असते. आपण दहा अंकी फोन क्रमांकाच्या अंकांचे चार-पाच तुकडे करतो, ते या वर्किंग मेमरीच्या सोयीसाठी असते.

मेंदूत जुन्या स्मरणशक्तीसाठी मात्र भरपूर जागा आहे. पण मेंदूतील स्मरणशक्ती संगणकासारखी जशीच्या तशी राहत नाही. ती बदलत राहते. ही जुनी स्मरणशक्ती दोन प्रकारची असते. शब्दात व्यक्त करू शकता त्या माहितीला ‘व्यक्त स्मरणशक्ती’ म्हणतात. माणसाला त्याच्या आयुष्यातील पहिल्या तीन-चार वर्षांतील घटना आठवत नाहीत. कारण व्यक्त स्मरणशक्तीसाठी आवश्यक असलेला मेंदूतील भाग त्या वेळी विकसित झालेला नसतो. त्यानंतरचे सारे आयुष्य आपण आत्मचरित्रासारखे सांगू शकतो. यातील साऱ्या आठवणी अर्थातच ‘मी’शी निगडित असतात. मी कसे कष्ट केले, कशी मजा केली अशा स्वरूपाच्या या आठवणी सत्य असतातच असे नाही. सांगणाऱ्यास त्या सत्य वाटत असल्या तरी त्या साठवल्या गेलेल्या असताना ‘मी’च्या सोयीने त्यात बदल होत जातात. एखाद्या प्रसंगी तो जे काही बोलला/ वागला असेल, त्यातील काही गोष्टी विस्मृतीत जातात. काही वर्षांपूर्वीच्या एखाद्या प्रसंगाबद्दल प्रत्येकाच्या आठवणीत काही ना काही वेगळेपण असते. कारण स्मरणशक्ती निरपेक्ष नसते, ती ‘मी’च्या रंगातून लक्षात ठेवलेली असते.

व्यक्त करता येणारी दुसऱ्या प्रकारची स्मरणशक्ती मात्र वास्तव माहितीच्या स्वरूपात असते. विज्ञान किंवा अन्य विषयांचा आपण शाळेत अभ्यास करतो तेव्हा या प्रकारच्या स्मरणशक्तीमध्ये तो साठवला जातो. पण हा भागही भावनांशी जोडलेला आहे. आवड असलेल्या विषयातील माहिती सहजतेने साठवली जाते. शाळेत एखादे शिक्षक/शिक्षिका आवडू लागले, की ते शिकवीत असलेला विषयही आवडू लागतो, तो याचमुळे!

yashwel@gmail.com