News Flash

मोजपट्टी -२

एक ते दीड मीटपर्यंत लांबीची लाकडी, प्लॅस्टिकची वा धातूची मोजपट्टी सहज हाताळता येते

मोजपट्टी -२

एक ते दीड मीटपर्यंत लांबीची लाकडी, प्लॅस्टिकची वा धातूची मोजपट्टी सहज हाताळता येते;  परंतु त्यापेक्षा जास्त लांबीची मोजपट्टी हाताळताना व्यावहारिक अडचणी येतात. शिंपी, सुतार, गवंडी, भू-मापन करणारे अधिकारी यांना जास्त लांबी मोजण्याच्या साधनांची आवश्यकता असते.

पूर्वीच्या काळी सुताराकडे घडीची लाकडी मोजपट्टी असे, ती सहज खिशात घेऊन वावरता येत असे. परंतू या मोजपट्टय़ा तितकोशा अचूक नसत. शिंप्याकडे कापडाची, रेग्झिनची किंवा प्लॅस्टिकची घडीची मोजपट्टी (Measuring tape)असते. तिची लांबी साधारण दीड मीटर पर्यंत असते. ती मानेभोवती अडकविता येते किंवा काम झाल्यानंतर या मोजपट्टीची घडी घालून ठेवता येते. पुन्हा पुन्हा वापराने या मोजपट्टीत सुरुवातीच्या टोकाचा भाग खराब होणे, घडीच्या ठिकाणच्या खुणा किंवा संख्यांचे आकडे पुसट होणे, तडे जाऊन मोजपट्टी तुटणे असे दोष मोजपट्टीत निर्माण होतात व त्या खराब होतात.

स्थापत्य अभियंते किंवा वास्तुविशारदांकडे यापेक्षा लांब मोजपट्टय़ा असतात. कापडाच्या, रेग्झिनच्या, प्लॅस्टिकच्या किंवा धातूच्या पातळ पट्टीच्या त्या बनविलेल्या असतात. यावर सेंटिमीटर, मीटर तसेच इंच व फुटाच्यादेखील खुणा असतात.

या मोजपट्टय़ांना त्याच्या पेटीसारख्या कवचामध्ये गुंडाळून ठेवण्याची व्यवस्था असते. त्यासाठी एक सíपलाकार स्प्रिंग पेटीसारख्या कवचामध्ये असते. मोजपट्टी कवचातून बाहेर ओढली की ती सíपलाकार स्प्रिंग ताणली जाते. मोजपट्टी सोडली की स्प्रिंगवरील ताण कमी होतो, स्प्रिंग कवचामध्ये गुंडाळली जाते आणि त्याबरोबर जोडलेली मोजपट्टीही आत गुंडाळली जाते.

या प्रकारच्या मोजपट्टय़ा काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. अन्यथा त्यांची सíपलाकार स्प्रिंगवर आधारित यंत्रणा खराब होऊन त्यात गुंडाळण्याच्या यंत्रणेत दोष निर्माण होतो.

बाजारात वरील प्रकारच्या, सíपलाकार स्प्रिंग असलेल्या मोजपट्टय़ा तीन ते आठ मीटपर्यंत लांबीच्या उपलब्ध आहेत. त्यापेक्षा जास्त लांबीच्या मोजपट्टय़ा १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर अशा प्रकारच्या उपलब्ध आहेत. अशा जास्त लांबी मोजण्याच्या मोजपट्टय़ांना हाताने गुंडाळण्याची व्यवस्था केलेली असते.

या मोजपट्टय़ांच्या पेटीसारख्या कवचामध्ये एक रीळ असतो. कवचाबाहेरून हा रीळ फिरविण्यासाठी व्यवस्था केलेली असते.

एखाद्या रिळावर दोरा गुंडाळावा त्याप्रमाणे मोजपट्टी कवचाच्या उघडय़ा भागाजवळ पकडून आतील रीळ फिरवून मोजपट्टी कवचामध्ये गुंडाळून सुरक्षित ठेवता येते.

सई पगारे- गोखले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कुसुमाग्रज : भाषाविषयक विचार..

१९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात, आपली काव्यविषयक भूमिका मांडताना कुसुमाग्रज म्हणाले, ‘आपण माझ्या साहित्याला महाराष्ट्राच्या नकाशावरून भारताच्या नकाशावर आणले आहे. या सन्मानाबद्दल मी भारतीय ज्ञानपीठाचे आणि सर्व संबंधितांचे मन:पूर्वक आभार मानतो. हा गौरव माझ्या मायभाषेचा, जिच्या खांद्यावर मी उभा आहे, त्या वाङ्मयीन परंपरेचा आणि ज्यांच्या हातात हात घालून मी प्रवास करतो आहे, त्या समकालीन साहित्यिकांचाही आहे. ज्ञानेश्वर, तुकारामादि प्राचीनांनी आणि केशवसुत, गडकरी आदि अर्वाचीनांनी संपन्न केलेल्या मराठी भाषेचे ऋण मस्तकावर घेऊनच मी या सन्मानाचा स्वीकार करीत आहे. मातृभाषेचा दुरभिमान माझ्या ठिकाणी नाही. पण अभिमान मात्र अवश्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेवर आघात करणारा भाषिक दुरभिमान हा निषेधार्हच मानायला हवा.

एक नागरिक आणि लेखक म्हणून मला खंत वाटते की, ..पळवाट काढून आपण इंग्रजीचा, एक अभारतीय भाषेचा अवाजवी आश्रय घेत आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजीचा प्रभाव कमी तर झालेलाच नाही, उलट तो पूर्वी कधीही नव्हता इतका वाढलेला आहे. देशातील सर्व प्रतिष्ठित व्यवहारांमध्ये इंग्रजीला वाढत्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे.. भारतातील कोणत्याही नागरिकाला आपल्याला इंग्रजी येत नाही याचा संकोच वाटावा, किंवा इंग्रजी येत नाही म्हणून प्रगतीचे अनेक दरवाजे त्यांच्यासाठी बंद असावेत ही परिस्थिती खरोखरच लज्जास्पदच आहे. बहुसंख्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत आपले सर्व वरच्या पातळीवरील आर्थिक- राजकीय व्यवहार होत असल्यामुळेच ‘लोकांना न कळणाऱ्या भाषेत चालणारी लोकशाही’ ही अद्भुत घटना (सुसंस्कृत जगात कुठेही नसलेली) आपण सिद्ध करीत आहोत. इंग्रजी भाषेवर एक संपन्न भाषा म्हणून माझेही प्रेम आहे. जगातील ज्ञान- विज्ञानाशी संपर्क साधणारी ही एक खिडकी आहे.. पण खिडकी म्हणजे घर नव्हे.

भाषेचा प्रश्न हा केवळ अभिमानाचा विषय नसून समाजाच्या अस्मितेचा आणि म्हणून अस्तित्वाचाही प्रश्न आहे. समाजाच्या परिवर्तनाची वा क्रांतीची पेरणी ही स्वभाषेच्या किनाऱ्यावर होऊ शकते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 2:01 am

Web Title: article on meter tape
Next Stories
1 वि. वा. शिरवाडकर –  सन्मान
2 शिरवाडकरांचे नाटय़लेखन
3 कुसुमाग्रज- काव्य
Just Now!
X