शास्त्रज्ञांनी सभोवतीच्या वातावरणामध्ये उष्णता वाढवणाऱ्या सहा वायू घटकांची नोंद घेतली. त्यामध्ये कर्बवायू, मिथेन, बाष्प, नायट्रस ऑक्साइड, ओझोन आणि सीएफसी यांचा समावेश होतो. उष्णता साठवून ठेवणारे वायू म्हणून यांना ‘हरितगृह वायू’ असेही म्हणतात. वातावरणामध्ये मिथेन वायूचे प्रमाण ०.०००२ टक्के एवढे कमी असले ती तो कर्बवायूपेक्षा २८ पटीने जास्त उष्णता शोषण करून सभोवतालचे वातावरण जास्त उबदार करतो. असे वातावरण आपल्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाससुद्धा घातक असते. गेली दोन दशके मिथेन हा वायू वातावरणामध्ये सध्याच्या स्थिर प्रमाणापेक्षा ८० पटीने जास्त आहे. मिथेनचे हे वाढते प्रमाण बिघडलेल्या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

मिथेन वायूची निर्मिती ही आपणास सुदृढ पर्यावरण म्हणजे काय हे न समजल्यामुळे वाढते आहे. ओला कचरा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमधून बाहेर टाकणे, तेथून तो जनावरांच्या पोटात जाणे हा मिथेन निर्मितीचा फार मोठा स्रोत आहे. ओल्या कचऱ्याचा प्राणवायूशी संबंध आला नाही की त्याचे बंदिस्त अवस्थेत हळूहळू मिथेनमध्ये रूपांतर होते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

आपल्या देशात पाळीव प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. हे गोधन जर चारा खाण्यासाठी गायरानात गेले तर मिथेनची निर्मिती नगण्य होते. आज (विकासाच्या नावाखाली) चराऊ कुरणे आढळत नाहीत म्हणून जनावरांना बंदिस्त जागेत राहावे लागते. मिथेन निर्मितीचे हे उगमक्षेत्र आहे. भारत याचमुळे आज जगामध्ये सर्वात जास्त मिथेन निर्माण करणारा देश ठरला आहे. मिथेन उत्पत्तीची इतर केंद्रे म्हणजे गाळाने भरलेली धरणे, थांबलेल्या नदय़ा, ओढे, नाले, खाडय़ा, सांडपाण्याची गटारे आणि दुर्लक्षित पाणथळ जागा आहेत. आहारात ‘जंक फूड’चा मुबलक वापर आपल्या शरीरात मोठय़ा प्रमाणात मिथेन तयार करतो. आपण आपली जीवनशैली पर्यावरणस्नेही ठेवली तर मिथेनची निर्मिती निश्चित कमी होऊ शकते.

मिथेनच्या दुष्परिणामाबरोबरच त्याचा एक चांगला उपयोग म्हणजे हा ज्वलनशील वायू आहे. गोबर गॅस आणि गॅस सिलेंडरच्या रूपात तो आपल्या स्वयंपाकघरात मोलाचे कार्य करत असतो. संकलित ओल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सतत धूर आणि लहान मोठय़ा आगी लागलेल्या आढळतात. हा मिथेनचा प्रताप ढासळलेल्या पर्यावरणाचे एक दर्शकच आहे. मात्र याच कचऱ्याच्या डोंगरामधून वैज्ञानिक पद्धतीने मिथेनची निर्मिती करणे हासुद्धा स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणासाठी एक शुभ संदेश आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org