News Flash

अरकाटचे नवाब

१७४० साली मराठय़ांनी अरकाटवर आक्रमण केले.

महम्मद गौस खान

१७४० साली मराठय़ांनी अरकाटवर आक्रमण केले. दमालचेरी येथे मराठे आणि नवाब यांच्या फौजांमध्ये झालेल्या युद्धात तत्कालीन नवाब दोस्त अली आणि त्याचा मुलगा हसन अली मारले जाऊन अरकाटवर मराठय़ांनी आपला अंमल बसविला. दोस्त अलीचा मेव्हणा चंदासाहेब यालाही मराठय़ांनी कैद करून नागपूर येथे कैदेत ठेवले. पुढे अरकाटवर ताबा मिळविण्यात नवाब यशस्वी झाला आणि नागपूरच्या कैदेत असलेल्या चंदासाहेबाने फ्रेंचांच्या मदतीने कैदेतून सुटका करून घेतली. या काळात तत्कालीन अरकाट नवाब मुहम्मद अली वालाजा (कारकीर्द १७४९ ते १७९५) याच्याशी चंदासाहेबाचे वैमनस्य होऊन त्याने वालाजाला पदच्युत केले. वालाजाचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या मदतीने वालाजा चंदासाहेबाचा बीमोड करून परत नवाबपदी आला. वालाजा आणि म्हैसूरच्या हैदरअली यांच्यामधील संघर्षांतून हैदरचे मित्र फ्रेंच आणि वालाजाचे मित्र ब्रिटिश यांच्यात १७८० साली झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी हैदर आणि फ्रेंचांचा पूर्ण पराभव केला; परंतु या युद्धाचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी नवाब वालाजाकडून चार लाख पॅगोडा (तत्कालीन चलन) वसूल केले. या युद्धानंतर कंपनी सरकारच्या वर्चस्वाखाली आलेल्या अरकाटचा तेरावा नवाब गुलाम महम्मद गौस खानाची कारकीर्द इ.स. १८२५ ते १८५५ अशी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणी नसíगक पुरुष वारस नसल्यामुळे कंपनी सरकारने अरकाट राज्य १८५५ मध्ये खालसा करून कंपनीच्या राज्यप्रदेशात विलीन केले; परंतु पुढे १८६७ साली महाराणी व्हिक्टोरियाने गौस खानाचा चुलता अझीम जाह याला ‘अमीर-ए-अरकाट’ अर्थात अरकाटचा राजा असा खिताब देऊन पुढच्या सर्व वारस राजांना करमुक्त निवृत्तिवेतन दिले. सध्या एकविसाव्या शतकातही हे निवृत्तिवेतन भारत सरकार अरकाटच्या वारसांना देत आहे.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

चाणाक्ष वस्त्रप्रावरणे प्रकार – २
वस्त्रप्रावरणाधिष्ठित सेन्सरच्या सहयोगाने जाणण्याच्या प्रक्रियेवर (सेिन्सग) जैविक वैद्यक शास्त्रांत व सुरक्षा क्षेत्रात बरेच संशोधन झालेले आहे. वस्त्रप्रावरणाधिष्ठित ‘कपॅसिटिव्ह स्वाचिस’(एक इलेक्ट्रॉनिक साधन) ई.सी.जी, ई.एम.जी, ई.ई.जी. यांमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात.
न्युमेट्रेक्स या संस्थेने काढलेला हा अंगरखा, ह्रदय निरीक्षणाचे हे जॅकेट वीजभार अंगीकृत करणाऱ्या तुकडय़ांनी बनवलेला आहे. हे तुकडे खेळामध्ये दबावाखाली येणाऱ्या क्षेत्रात सोयीस्कररीत्या कपॅसिटिव्ह क्षमतेनुसार हृदयाचे ठोके मोजतात आणि हे मोजमापन उपलब्ध असलेल्या उपकरणांपेक्षा जास्त सुखकारकरीत्या केले जाते. त्यामुळे ते जास्त अचूक निदान करण्यास समर्थ आहे.
न्युमेट्रेक्सचा हृदयाची धगधग अनुमान करणारा हा अंगरखा क्षीण होऊ शकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मोजमापनपद्धती व चाणाक्ष वस्त्रप्रावरणांनी संभाव्यतेच्या कक्षेत आणलेल्या व उपलब्ध केलेल्या प्रयत्नांचा मध्यिबदू आहे. कपॅसिटि सेिन्सग वस्त्रांनी व त्यावर आधारित उपकरणांनी पारंपरिक उपलब्ध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना व साधनांना अत्यंत यशस्वी पर्याय उपलब्ध केला आहे वस्त्रप्रावरणांमध्ये थर्मोकपल एकनिष्ठ, समाविष्ट केलेले (म्हणजे जोडलेले नाही) तापमानमापक बनवतात व तो प्रचलित थर्मामीटर म्हणून मान्यता प्राप्त झालेला आहे. वस्त्रप्रावरणांमध्ये अंतर्भूत केलेले चकाकणारे-ल्युमिनिसंट भाग बायोफोटोनिक सेन्सर म्हणून, सिद्धहस्त उपकरणे म्हणून उपलब्ध आहेत. वस्त्रप्रावरणांमध्ये समाविष्ट केलेले कार्बन इलेक्ट्रोड पर्यावरणांत उपलब्ध असलेले बायोमेडिकल पदार्थ, प्राणवायू, आद्र्रता, सदोष व हानिकारक पदार्थ वा द्रव जाणण्याकरिता व मोजण्याकरिता वापरणे हीसुद्धा एक मान्यताप्राप्त पद्धती आहे. आकार व आयाम संबंधित व याबाबतीत संवेदनशील असलेली शारीरिक हालचाल, दाब, ताणतणाव मापनासाठी वस्त्रप्रावरणाधिष्ठित उपकरणे ई.एम.जी. बरोबर संलग्नकरून स्नायूंच्या स्वास्थ्यचिंतनाचे अनुमान करतात.
रेडिओ फ्रिक्वेन्सी (आर एफ) कार्यक्षमता : चाणाक्ष वस्त्र उपयुक्ततेच्या कक्षा रुंदावल्या आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे चाणाक्ष वस्त्राधिष्ठित अँटेना. उपलब्ध साध्या वस्त्र अँटेनामधे वीजभारक क्षमता असलेले ठरावीक लांबीचे धागे त्यात शिवलेले असतात वा वीजभारक क्षमता अनुपस्थित असलेल्या साध्या वस्त्रांमध्ये विणलेले वा गुंफलेले असतात. संकीर्ण अँटेना विशिष्ट आकारांमध्ये वीजभारक क्षमता असलेल्या वस्त्रांत विणलेले असतात त्याचा उपयोग संरक्षक वेष्टन वा दिशादर्शनासाठी असलेल्या अँटेनाकरिता असतो. अशा प्रकारच्या अँटेना आता सेल्युलर व सॅटेलाइट फोनकरिता उपलब्ध आहेत.
– श्वेतकेतू (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 1:46 am

Web Title: article on mohammed ghouse khan
Next Stories
1 संस्थानांची बखर – अरकाट राज्यस्थापना
2 संस्थानांची बखर – कोचीनची सत्तांतरे
3 कोचिन राज्यस्थापना
Just Now!
X