07 July 2020

News Flash

कुतूहल : तिबोटी खंडय़ा कोकणात!

जून ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. नर व मादी या दोघांच्या संगनमताने घरटय़ाची जागा निश्चित होते.

संग्रहित छायाचित्र

 

निसर्गाचे वरदान लाभलेले कोकण हे अनेक सजीवांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. ‘ओरिएण्टल ड्वार्फ किंगफिशर’ अर्थात तिबोटी खंडय़ा हा खंडय़ा पक्ष्यांच्या गटातला एक अत्यंत देखणा पक्षी. गेली कित्येक दशके दरवर्षी मे महिन्यात शेकडय़ांच्या संख्येने हे तिबोटी खंडय़ा पक्षी भूतान, केरळ, श्रीलंका येथून स्थलांतरित होऊन कोकणात आपल्या वंशवृद्धीसाठी हक्काने येतात.  त्यांचे येथे स्थलांतर हा पावसाच्या आगमनाचा संकेत समजला जातो. अत्यंत आकर्षक रंगसंगती आणि विलोभनीय रूपामुळे ते ‘ग्लोरी ऑफ द जंगल’ म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या पायांना चार बोटे असतात, परंतु या पक्ष्याला मात्र तीनच बोटे आहेत.

जून ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. नर व मादी या दोघांच्या संगनमताने घरटय़ाची जागा निश्चित होते. एखाद्या ओहळाशेजारी मातीच्या कडय़ात बीळ करून हे घरटे केले जाते. प्रणयाराधन काळात नर पक्षी मादीसाठी विविध प्रकारचे किडे, सरडे आदी अन्न आणून तिला भरवून तिचे कोडकौतुक करतो. मग नर-मादी यांचे मीलन होऊन, मादी घरटय़ात साधारणपणे दोन ते पाच अंडी घालते. सुमारे १८ दिवसांच्या अंडे उबवणीच्या काळामध्ये नर पक्षी मादीच्या अन्नपाण्याची काळजी घेतो. दरम्यान अंडय़ांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले या काळात खूपच भुकेलेली असतात. या लहानग्यांना पॅनचेक्स मासे, कोळी, चतुर असे लहान भक्ष्य भरवले जाते. जशी जशी पिल्ले मोठी होऊ लागतात तसे त्यांना पाली, सरडे, खेकडे असा चौरस आहार पुरवला जातो. उजाडल्यापासून मावळेपर्यंत अव्याहतपणे खंडय़ा पक्षी भक्ष्य शोधून आणून भरवण्याचे काम सुमारे १५ ते १८ दिवस करीत असतो. पूर्ण वाढ झालेली पिल्ले घरटय़ातून उडून गेली, की पिल्लांचा आणि पालनकर्त्यांचा संबंध संपला! घनदाट जंगलातील तेच बीळरूपी घरटे अनेक वर्षे हा पक्षी वापरतो.

कोकण व पश्चिम घाट हा हजारो प्रकारच्या ज्ञात-अज्ञात पक्षी, कीटक, फुलपाखरे, प्राणी, झाडे, वेली यांचे नंदनवन ठरला आहे. मात्र, आता हेच नंदनवन सरकारी विकास (?) आराखडय़ानुसार उजाड, उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अमूल्य नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 12:07 am

Web Title: article on oriental dwarf kingfisher in konkan abn 97
Next Stories
1 मनोवेध : भावनांची मोजपट्टी
2 मनोवेध : मानसिक प्रथमोपचार
3 कुतूहल : वन-संरक्षण आणि देवराया
Just Now!
X