सुनीत पोतनीस

दक्षिण सुदान हा ईशान्य आफ्रिका खंडातील देश ९ जुलै २०११ रोजी अस्तित्वात आला. तत्पूर्वी तो त्याचा मूळ देश सुदानचा एक भाग होता. उत्तर आणि दक्षिण सुदान भिन्न धर्मीय, भिन्न जीवनशैली आणि परंपरांचे देश. त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष नित्याचाच होता. उत्तरेतल्या लोकांचे वर्चस्व असलेल्या सुदानी सरकारने दक्षिणेतल्या नेत्यांना सरकारात सहभागी न केल्याने झालेल्या संघर्षांने यादवीचे रूप धारण केले. १९६२ मध्ये दक्षिणेचा नेता अनिया निया याच्या नेतृत्वाखाली उत्तर सुदानींच्या विरोधात, दक्षिण सुदानला स्वायत्तता मिळविण्यासाठी यादवी युद्ध  सुरू  झाले. याच काळात कट्टर कम्युनिस्टधार्जिणा लष्करी अधिकारी जाफर नुमेरी याने सुदानची सत्ता ताब्यात घेऊन दक्षिण सुदानी लोकांचे हे बंड दडपशाहीने मोडून काढले. या धुमश्चक्रीमध्ये दक्षिणेतल्या युनिटी प्रांतात तेलविहिरी सापडल्यामुळे दक्षिण सुदान समृद्ध झाले. दक्षिण सुदानचे नेतृत्व १९८३ मध्ये ‘सुदानीज पीपल्स लिबरेशन मूव्हमेंट’ या स्वातंत्र्यवादी संघटनेकडे आले. या संघटनेचा नेता डॉ.जॉन गॅरांग दी मेबिऑर याने सुदानी अध्यक्ष नुमेरीकडे दक्षिण सुदानला स्वायत्तता देण्याची मागणी केली आणि नुमेरीने ती धुडकावून लावली. यामुळे गॅरांग याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले यादवी युद्ध संपूर्ण सुदानमध्ये पसरले. सुदानच्या उत्तर भागात प्राबल्य असलेल्या अरबी आणि न्यूबियन वंशाच्या इस्लामी धर्माचे लोक आणि दक्षिणेत प्राबल्य असलेल्या अ‍ॅनिमिस्ट निलोटस वंशाचे ख्रिस्ती लोक यांच्यात सुरू झालेले हे यादवी युद्ध संपूर्ण सुदानमध्ये पसरले. अस्थिर राजकीय परिस्थितीत १९८६ मध्ये सुदानी लष्कर प्रमुखांनी सुदानची सत्ता हस्तगत केली. अखेरीस २००५ मध्ये केनियामध्ये नेत्यांची बोलणी होऊन सुदानी सरकारचे प्रतिनिधी आणि दक्षिण सुदानचे स्वातंत्र्यवादी बंडखोर नेते यामध्ये काही मुद्यांवर एकमत होऊन यादवी युद्ध बंद करण्याविषयी करार झाला. खदखदणाऱ्या दक्षिण सुदानला पूर्ण स्वातंत्र्य देऊन स्वायत्त देश म्हणून मान्यता देण्याबाबत, सहा वर्षांनी सार्वमत घेण्याचे ठरले. दरम्यान, सुदानच्या सरकारमध्ये दक्षिणेतल्या नेत्यांनाही सामावून घेण्याविषयी करार करण्यात आला. तसेच दक्षिण सुदानला काही प्रमाणात स्वायत्तता देण्याचे ठरले. यामुळे सुदानमध्ये वर्षांनुवर्षे चाललेले यादवी युद्ध थंडावले.

sunitpotnis94@gmail.com