02 March 2021

News Flash

कुतूहल : दगडफुले : हवाप्रदूषणाची निर्देशक

निसर्गात प्राणी-प्राणी, वनस्पती-वनस्पती, वनस्पती-प्राणी परस्परावलंबनाची अनेक उदाहरणे आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

आपण शहरापासून, औद्योगिक वसाहतींपासून दूर असलेल्या जंगलात फेरफटका मारत असताना, बऱ्याचदा आपल्याला तेथील वृक्षांच्या बुंध्यांवर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांसारखी रचना असलेल्या आणि बुरशीसारख्या दिसणाऱ्या हिरवट वा अन्य रंगांच्या तसेच विविध आकारांच्या असंख्य ‘रचना’ विशिष्ट पद्धतीने वाढलेल्या दिसतात. अशाच प्रकारच्या रचना त्या परिसरातील खडकांवरदेखील आढळून येतात. या नैसर्गिक रचना म्हणजे अतिशय विलक्षण शरीररचना असलेल्या आणि सहजीवनाचा एक आदर्श नमुना असलेल्या ‘लायकेन’ म्हणजेच दगडफूल या गटातील वनस्पती आहेत. भारतात या दगडफुलाचा उपयोग घरगुती मसाले तयार करताना वापरण्यात येणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून करण्यात येतो. यामुळे निसर्गातील या वनस्पतीला आर्थिक महत्त्व प्राप्त झालेले आहेच; परंतु या वनस्पतीचे निसर्गातील अस्तित्व पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील खूप महत्त्वाचे आहे. हे महत्त्व जाणून घेण्याआधी या वनस्पतीची विशिष्ट रचना जाणून घेऊ या.

निसर्गात प्राणी-प्राणी, वनस्पती-वनस्पती, वनस्पती-प्राणी परस्परावलंबनाची अनेक उदाहरणे आहेत. याचाच एक प्रकार म्हणजे सहजीवन किंवा ‘सिम्बायोसिस’! या प्रकारच्या सहजीवनात दोन सजीव एकमेकांच्या सहवासात राहून नात्यांचे बंध निर्माण करतात आणि हे बंध एकमेकांना पूरक ठरतील अशा पद्धतीने या सजीवांची शरीररचना आणि कार्यप्रणाली असते. दगडफूल ही अशा प्रकारच्या सहजीवनाची अत्युच्च पातळी दर्शवणारी वनस्पती आहे. या दगडफुलांच्या शरीररचनेत बुरशीच्या तंतूंचे दोन जाड थर असतात आणि या दोन थरांच्या मध्ये शैवालांच्या पेशींचा एक थर असतो. शैवालांच्या पेशींमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या हरितद्रव्याच्या साहाय्याने शैवाल सूर्यकिरणांची ऊर्जा वापरून आपले अन्न तयार करतात आणि या अन्नाचा एक वाटा बुरशीला देतात. याबदल्यात बुरशी शैवालाला लागणारे पाणी (ओलावा) आणि पोषक द्रव्ये असा ‘कच्चा माल’ पुरवते.

अत्यंत प्रतिकूल वातावरणातदेखील या वनस्पती सहजपणे तग धरू शकतात. परंतु विविध प्रजातींची दगडफुले हवेतील सल्फर आणि नायट्रोजनची संयुगे, त्याचप्रमाणे शिसे, पारा यांसारखे जड धातू अशा प्रदूषकांच्या संपर्कात तग धरू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या परिसरातील वृक्ष अथवा खडकांवर जर दगडफुले विपुल प्रमाणात वाढलेली असतील, तर त्या परिसरातील हवा शुद्ध आहे असे खुशाल समजावे. याव्यतिरिक्त दगडफुलांच्या द्रावामुळे खडकांना चिरे पडतात आणि कालांतराने त्यांचा भुगा होऊन अतिशय पोषक मूलद्रव्यांनी युक्त अशी माती तयार होते.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2020 12:07 am

Web Title: article on stones indicators of air pollution abn 97
Next Stories
1 कुतूहल : प्रदूषणाचे सजीव निर्देशक
2 मनोवेध : मानसोपचार
3 मनोवेध : अति खाण्याचे व्यसन
Just Now!
X