06 August 2020

News Flash

मनोवेध : ‘डिप्रेशन’चे प्रकार 

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्याने, प्रसूतीनंतर किंवा कर्करोग, हृदयविकार यांसारखा आजार झाल्याचे कळल्यानंतरही ‘डिप्रेशन’ येते.

संग्रहित छायाचित्र

– डॉ. यश वेलणकर

मेंदूत अति वेगवान गॅमा लहरी असतात तेव्हा सर्व भागांचा समन्वय साधला जातो. औदासीन्य असेल तर अशा लहरी कमी असतात. त्याचमुळे त्या वेळी एक प्रकारची बधिर अवस्था असते. काही वेळा सर्व शरीरात वेदना असतात, निरुत्साह असतो. कोणताच आनंद अनुभवता येत नाही. एकाकीपणा आणि निराशा असते. सध्या ‘डिप्रेशन’चे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. ‘डिप्रेशन’ हा शब्द ‘खाली दाबणे’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून घेतलेला आहे. १९ व्या शतकात तो वापरला जाऊ लागला. १९५२ मध्ये मानसिक त्रासांचे वर्गवारी करणारे डायग्नोस्टिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक मॅन्युअल प्रसिद्ध होऊ लागले, त्यामध्ये ‘डिप्रेसिव्ह रिअ‍ॅक्शन’ या नावाने या आजाराचा समावेश झाला. १९६८ च्या दुसऱ्या मॅन्युअलमध्ये ‘डिप्रेसिव्ह न्युरॉसिस’ असे नाव दिले गेले. आता याचे अनेक प्रकार लक्षात आले आहेत.

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्याने, प्रसूतीनंतर किंवा कर्करोग, हृदयविकार यांसारखा आजार झाल्याचे कळल्यानंतरही ‘डिप्रेशन’ येते. कोणताही शारीरिक, मानसिक आघात झाला किंवा सर्व व्यवस्थांची उलथापालथ करणारे साथीचे आजार, भूकंप, पूर यांनंतरही ते येऊ शकते. या आजाराशी निगडित काही ‘जीन्स’ शास्त्रज्ञांनी शोधले आहेत, त्यामुळे हा त्रास आनुवंशिक आहे हे ध्यानात आले. मात्र आई-बाबांना ‘डिप्रेशन’ होते, याचा अर्थ मुलांना ते होईलच असे नाही. आनुवंशिकता ही भरलेल्या बंदुकीसारखी असते. तिचा चाप ओढला जात नाही तोपर्यंत बार उडत नाही.

म्हणजे, शरीरात ‘जीन्स’ असले तरी ते कार्यरत होण्यासाठी जीवनशैलीतील घटक आवश्यक असतात. हे हृदयरोग, मधुमेह यांसारख्या शारीरिक आजारांप्रमाणेच ‘डिप्रेशन’बाबतही खरे आहे. व्यायामाचा अभाव, सतत विचारात राहणे, नैसर्गिक पदार्थ कमी खाणे, सामाजिक आधाराचा अभाव ही या आजारवाढीची कारणे आहेत. माणसाच्या आतडय़ात असंख्य उपयोगी विषाणू, जिवाणू असतात. त्यांची संख्या कमी झाली तरीही ‘डिप्रेशन’ येते असे संशोधनात दिसत आहे. ‘डिप्रेशन’मध्ये आत्मभान असेल, स्वत:च्या इच्छेने लक्ष ठरावीक ठिकाणी नेण्याची क्षमता कायम असेल, तर सत्त्वावजय चिकित्सा उपयोगी ठरू शकते. पण ‘मेजर डिप्रेशन’मध्ये हे शक्य होत नाही. त्या वेळी मनोरोगतज्ज्ञांना भेटून औषधे घ्यायला हवीत.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:08 am

Web Title: article on types of depression abn 97
Next Stories
1 कुतूहल : फुलपाखरांचे मराठी नामकरण!
2 मनोवेध : मेंदूतील गॅमा लहरी
3 कुतूहल : सरीसृपांमधील अपत्य संगोपन
Just Now!
X