ओल्या कचऱ्याचे शक्यतो मूळ स्रोतापाशीच कम्पोस्टिंग करणे अभिप्रेत आहे. उपाहारगृहे वगैरेंमधून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस, खतनिर्मिती, वीजनिर्मिती करता येऊ शकते. सुक्या घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करताना मुखत्वे दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरतात.

पहिल्या प्रकारच्या तंत्रज्ञानात कचरा थेट जाळण्यात येतो. जाळण्यापूर्वी निरुपयोगी घटक वेगळे करून कचऱ्यातील आद्र्रता कमी केली जाते. या ज्वलन क्रियेतून तयार होणाऱ्या इंधनाला ‘आरडीएफ’ म्हणजे कचऱ्यापासून मिळवलेले इंधन असे म्हणतात. हे इंधन प्रामुख्याने औद्योगिक बॉयलरमध्ये वापरण्यात येते. बॉयलरमध्ये ते १००० अंश सेल्सिअस एवढय़ा उच्च तापमानाला जाळतात. यामुळे साहजिकच डायॉक्सिनसारखी घातक प्रदूषके निर्माण होत नाहीत. या तंत्रज्ञानात हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी, उत्सर्जित होणाऱ्या वायूंमधली नायट्रोजनची ऑक्साइड्स, पाऱ्याचे अंश आदी प्रदूषके एका प्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात येतात. अशा तऱ्हेची  ‘एस्सेल इन्फ्रा’ या कंपनीची संयंत्रे भारतात जबलपूरला बसवली आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या तंत्रज्ञानात ‘प्लाझ्मा’, ‘पायरोलिसिस’ आणि ‘गॅसिफिकेशन’ हे तीन प्रकार आहेत. प्लाझ्मा तंत्रज्ञानात मोठय़ा प्रमाणावर वीज वापरून आधी प्लाझ्मा तयार करतात. याचे तापमान जवळपास १००० ते ३००० अंश सेल्सिअस एवढे असते. या तापमानाला कचऱ्यातील सर्व घटकांचे विघटन होऊन वायू तयार होतो आणि या वायूचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जातो. मूळ प्लाझ्मा तयार करण्यासाठी जेवढी वीज वापरली जाते, त्यापेक्षा किती तरी जास्त वीजनिर्मिती या तंत्रज्ञानातून होते. असे तंत्रज्ञान भारतात अहमदाबादमधील एका प्रयोगशाळेत विकसित केलेले आहे. ‘गॅसिफिकेशन’ आणि ‘पायरोलिसिस’ या दोन्ही प्रक्रियांमध्ये कचऱ्याला बाहेरून १००० अंश सेल्सिअसपर्यंत तापवतात. त्यामुळे कचऱ्याचे पूर्ण विघटन होते आणि तप्त वायू तयार होऊन त्यापासून वीजनिर्मिती करतात. दोन्हींतला फरक असा की, ‘गॅसिफिकेशन’ प्रक्रियेत ठरावीक प्रमाणात ऑक्सिजन वापरला जातो. परंतु ‘पायरोलिसिस’मध्ये ऑक्सिजनचा वापर होत नाही; त्यामुळे ज्वलनशील ‘सिन गॅस’ (हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइडचे मिश्रण) तयार होतो व तो जाळून वीजनिर्मिती करतात.

ओला कचरा तसाच उच्च तापमानाला तापवून उच्च दाबाखाली ठेवून त्याचे रूपांतर थेट कोळशात करतात. त्याला ‘हायड्रोथर्मल टेक्निक’ म्हणतात. यात ओला कचरा तासाभरात कोळशात रूपांतरित होतो. तो कोळसा जळण म्हणून वापरता येतो. अशा तऱ्हेने कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती जगातील प्रगत देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात यशस्वीरीत्या वापरण्यात येत आहेत. भारतामध्येही हे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे.

– डॉ. हर्षवर्धन मोडक

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org