महाराष्ट्रासह देशात अवैध व्यापाराकरिता वन्यजीवांची शिकार करण्यासाठी मुख्यत्वे बारा बोअरच्या एक नळी वा दुनळी बंदुका अथवा पॉइंट थ्री वन फाइव्ह रायफल्सचा वापर केला जातो. वन्यजीवांना पकडण्याकरिता त्यांचे पाय अडकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सापळे-फासे तयार केले जातात, प्राण्यांवर विषप्रयोग केला जातो, जंगलातील दुर्गम भागात विष लावलेले बाण वापरले जातात, तसेच घरगुती वापरासाठी जी वीज वापरली जाते (२२० व्होल्ट) तिचाही उपयोग केला जातो. या प्रकारे नवनव्या पद्धती शोधून शिकार केली जाते. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, नागपूर, गडचिरोली तसेच कोकणातही मोठय़ा प्रमाणावर शिकारीच्या घटना घडतात.

‘न्यायवैद्यकशास्त्र’ म्हणजेच ‘फोरेन्सिक सायन्स’ या अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय शाखेचा उपयोग गेल्या काही दशकांपासून वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारी करणारे गुन्हेगार शोधून काढण्यासाठीदेखील केला जातो आहे. यासंदर्भात ‘वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२’मधील तरतुदींची अंमलबजावणी करणारी तपास यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थान (वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) येथे ‘वन्यजीव न्यायवैद्यक आणि संवर्धन अनुवंशशास्त्र’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागातील न्यायवैद्यकशास्त्रात पारंगत असलेले शास्त्रज्ञ जंगलातील ज्या भागात अवैध शिकारीचा गुन्हा घडला आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या जमिनीवर, झाडाझुडपांवर शिकार केलेल्या प्राण्याचे काही अवशेष सापडतात का याची पाहणी केली जाते आणि जमिनीवर सांडलेले रक्त, केस, नखे, हाडे, शरीरातील अवयव यांचे नमुने विशिष्ट पद्धतीने गोळा केले जातात. याशिवाय शिकार करताना संबंधित गुन्हेगाराने कोणती पद्धत अवलंबली असावी, याचादेखील तपास करण्यात येतो आणि योग्य पुरावे गोळा केले जातात.

मग हे सगळे नमुने त्यांच्या अद्ययावत प्रयोगशाळेत आणले जातात. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या अवशेषांची चाचणी करण्यात येते आणि या चाचणीच्या निष्कर्षांनुसार पोलीस, वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित गुन्हे तपास यंत्रणा पुढील तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतात. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जुलै २०१७ मध्ये एक आदेश जारी करून या वन्यजीव न्यायवैद्यक शास्त्रज्ञांना ‘फौजदारी प्रक्रिया संहिता-१९७३’ च्या कलम २९३ नुसार ‘सरकारी तज्ज्ञ शास्त्रज्ञ’ असा दर्जा दिला आहे. या विभागाच्या माध्यमातून हजारो अवैध शिकारींच्या गुन्ह्य़ांची उकल करण्यात यश मिळाले आहे.

– संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org