दरवर्षी २६ जुलै हा ‘जागतिक खारफुटी दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाणथळ भूमीस ‘टाकाऊ जमीन’ असे मानल्याने जमीन व समुद्र यांच्यामध्ये वाढणाऱ्या खारफुटी वनस्पतींना महत्त्व नव्हते. इक्वेडोर या छोटय़ा देशातील खारफुटीवर अवलंबून असणाऱ्या जनतेने दरवर्षी २६ जुलै रोजी खारफुटी जंगलांच्या संरक्षणार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांच्या यूनेस्को या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०१५ साली सर्व जगभर खारफुटी संवर्धनाबाबत जागरूकता आणण्यासाठी ‘जागतिक खारफुटी दिन’ साजरा करण्याचे ठरले.

शाश्वत, चिरस्थायी विकासासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी जी १६ उद्दिष्टे ठरवली आहेत, त्यांपैकी- क्रमांक ६ : पिण्यासाठी स्वच्छ पाणी,

क्रमांक १३ : जलवायू परिवर्तनाची समस्या सोडवणे, क्रमांक १४ : पाण्याखालील जीवसृष्टीची सुरक्षा व संवर्धन, क्रमांक १५ : भूभागावरील जीवसृष्टीचे जतन व संवर्धन;  ही चार उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खारफुटी जंगलांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. खारफुटी वनस्पती या अनेक वैशिष्टय़ांनी, उपयोगांनी युक्त आहेत. मात्र, केवळ योग्य माहितीच्या अभावामुळे संवर्धनाऐवजी खारफुटींचा संहार केला जातो. जमिनीवरील वनांच्या तुलनेत चौपट कत्तल खारफुटींची होते. गेल्या ४० वर्षांत या वनस्पतींची निम्म्या प्रमाणात घट झाली आहे.

खारफुटी संशोधन व जनजागरणात अग्रेसर असणाऱ्या भारतात प्रत्यक्ष सहभागातून खारफुटी लागवड, खारफुटी जंगल सफाई अशा अनेक मार्गानी अत्यंत संपन्न नैसर्गिक साधनसंपत्तीची जोपासना व त्याद्वारे पर्यावरण रक्षण केवळ या दिवसापुरतेच नाही, तर वर्षभर सुरू ठेवण्यात ‘मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया’ आणि तिच्या सहयोगी संस्थांचा मोलाचा वाटा आहे.

‘जागतिक खारफुटी दिवसा’च्या निमित्ताने जनसामान्यांत खारफुटी संवर्धन, संरक्षण, लागवड, जोपासना अशा अनेक स्तरांवर जागरूकता निर्माण करण्याचे अत्यावश्यक काम होत आहे. सध्याच्या करोनाकाळात प्रत्यक्ष जनसहभाग शक्य नसला तरीही यानिमित्ताने ऑनलाइन परिसंवाद, स्पर्धा, व्याख्याने यांद्वारे जनजागृती केली जात आहे. भविष्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खारफुटी जगवणे, वाढवणे गरजेचे आहे. हाच संदेश या दिनानिमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचावा!

– डॉ. प्रसाद कर्णिक

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org