डॉ. वर्षां चिटणीस

सन १९३०च्या सुमाराला कार्ल जान्स्की नावाचा एक तरुण अभियंता अमेरिकेतील न्यू जर्सी येथील बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये रुजू झाला. त्या काळी न्यूयॉर्क आणि लंडनच्या दरम्यान अटलांटिक महासागरावरून होणाऱ्या दूरध्वनीच्या संभाषणासाठी रेडिओ लहरींचा वापर सुरू झाला होता. पण संभाषणादरम्यान या रेडिओ लहरींत वेगवेगळ्या प्रकारचे व्यत्यय (नॉइज) येत असत. जान्स्कीला या व्यत्ययांचे कारण शोधून काढण्याचे काम देण्यात आले होते. या व्यत्ययांमागील कारणांचा अभ्यास करण्यासाठी जान्स्कीने १९३१ साली एक नवीन रेडिओ अँटेना बनवली. मानवनिर्मित रेडिओ संदेशांचा अडथळा टाळण्यासाठी ही अँटेना न्यू जर्सीच्या ग्रामीण भागात उभारण्यात आली होती. वेगवेगळ्या दिशांना फिरवता येणारी ही अँटेना वापरून २० मिनिटांच्या अवधीत संपूर्ण आकाशाची पाहणी करता येत होती. तिचा व्यास सुमारे ३० मीटर तर उंची सात मीटर होती.

ही अँटेना वापरून जान्स्कीने व्यत्ययांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले. यातील दोन प्रकारच्या व्यत्ययांतील रेडिओ संदेश हे विजेच्या वादळांमुळे निर्माण होत होते. या व्यतिरिक्त तिसऱ्या प्रकारच्या व्यत्ययात एका वेगळ्या स्वरूपाचे रेडिओ संदेश मिळत होते. हे तिसऱ्या प्रकारचे रेडिओ संदेश सूर्याकडून येत असावेत, असे सुरुवातीला वाटले. परंतु, तारे जसे दिवसागणिक सूर्यापासून दूर जाताना दिसतात, तसेच हा रेडिओ स्रोतसुद्धा दिवसागणिक सूर्यापासून दूर जात असल्याचे, काही दिवसांच्या निरीक्षणांनंतर दिसून आले. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट जान्स्की याच्या निदर्शनास आली. ही अँटेना एका ठरावीक दिशेला सतत रोखून ठेवलेली असली, तर या रेडिओ संदेशांची तीव्रता दर २३ तास ५६ मिनिटांच्या कालावधीनंतर कमाल पातळीवर पोहोचत असे. २३ तास ५६ मिनिटांचा हा कालावधी म्हणजे पृथ्वीचा स्वतभोवती फिरण्याचा कालावधी होता. यावरून या रेडिओ संदेशांचा स्रोत दूर अंतराळात एखाद्या ठरावीक ठिकाणी असल्याचे लक्षात आले. या रेडिओ स्रोताचे स्थान आकाशगंगेच्या केंद्राजवळ, धनु तारकासमूहात असल्याचे खगोलाच्या नकाशांवरून दिसून येत होते.

अशा प्रकारे योगायोगानेच पहिल्या खगोलीय रेडिओ स्रोताचा शोध लागला. जान्स्कीने या शोधावर आधारित दोन प्रबंध १९३२ आणि १९३३ साली ‘प्रोसिडिंग्ज ऑफ आयआरई’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केले आणि यातूनच पुढे रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात झाली.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org