बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कलासमीक्षक विष्णू डे यांचा जन्म कलकत्ता येथे १८ जुलै १९०९ रोजी झाला. बंगाली भाषेत एका नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे म्हणून विष्णूजींची ओळख आहे. त्यांच्या ‘स्मृति सत्ता भविष्यत’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९७१चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा काव्यसंग्रह १९६०-१९६४ या कालावधीत प्रकाशित सर्व भाषांतील सृजनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

बंगाली, इंग्रजी भाषेत त्यांची एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी विषयात त्यांनी एम. ए. केले आणि अनेक कॉलेजांतून इंग्रजीचे अध्यापन केले.

विष्णूबाबूंचे वडील बंगाली व इंग्रजी साहित्याचे विलक्षण वाचक होते. पुस्तकांनी खच्चून भरलेली कपाटे म्हणजे घरातील मित्रमंडळीच.  यामुळे इंग्रजीच नव्हे तर जागतिक साहित्याचे दरवाजे उघडले गेले. मार्क्‍स व फ्रॉइडच्या विचारांची ओळख झाली. चित्रकला आणि पाश्चात्त्य संगीताचीही त्यांना आवड होती. शाळेत असतानाच विष्णूजींनी लिहायला सुरुवात केली. त्यांची सुरुवातीची रचना एक कथा होती. ‘पुरुणेर पुनर्जन्म या लक्ष्मण’- ही कथा ‘प्रगति’ या ढाक्यातून प्रकाशित होणाऱ्या साहित्यविषयक नियतकालिकात १९२८ मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९३१ ‘परिचय’च्या पहिल्या अंकात त्यांच्या दोन कविता प्रसिद्ध झाल्या. महाविद्यालयात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘उर्वशी ओ आर्टेमिस’ (१९३३) हा प्रसिद्ध झाला. यातील कवितांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. या काव्यरूपकात त्यांनी रचनेचे नवीन प्रयोग केलेले दिसतात.  ‘चोराबालि’ (१९३६) या सुरुवातीच्या काव्यसंग्रहातील कवितांतून व्यथित यौवनाची स्पंदने जाणवतात. तसेच उपरोधाचा सूरही जाणवतो. कदाचित विष्णू डे यांच्या काव्यजीवनाची सुरुवात व्यक्तिगत पीडा आणि एकाकीपणातून झाली असल्याने त्यांची कविताही समकालीन कवीपासून तशी दूरच राहिली, पण प्रस्थापित रचनेपेक्षा वेगळेपणही त्याच्या काव्यात जाणवू लागले होते.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

सर  चंद्रशेखर  व्यंकट  रामन 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया ज्या शास्त्रज्ञांनी रचला त्यात सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ ला जन्मलेल्या रामनांनी १९०४ मध्ये चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून सुवर्णपदकासह भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली.

पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांना ध्वनी व प्रकाश या विषयांत विशेष आवड निर्माण झाली. याच विषयात त्यांनी संशोधन सुरू केले. संशोधन करीत असतानाच त्यांनी नोकरीसाठी भारत सरकारच्या अर्थ खात्याची स्पर्धापरीक्षा दिली व त्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांची कोलकाता येथे साहाय्यक महालेखापाल या पदावर नियुक्ती झाली. नोकरी करीत असताना कार्यालयीन कामकाजाशिवाय उर्वरित सर्व वेळ ते भारतीय विज्ञान वíधनी (इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स) या संस्थेच्या प्रयोगशाळेत संशोधनकार्यात घालवीत. अर्थ खात्यात नोकरी करीत असतानाच त्यांनी कंपने, ध्वनी, पश्चिमी आणि भारतीय वाद्य्ो यांसंबंधी संशोधनकार्य केले.

त्यांच्या संशोधनकार्याचा दर्जा व आवड ओळखून त्या वेळी नवीनच स्थापलेल्या कोलकाता विद्यापीठाने त्यांना भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून येण्याची विनंती केली. कमी पगार मिळणार असतानाही रामनांनी ती नोकरी स्वीकारली, कारण अध्यापन व संशोधन यासाठी येथे पूर्ण मुभा मिळणार होती.

१९२१ मध्ये ऑक्सफर्ड येथे भरलेल्या ब्रिटिश साम्राज्य विद्यापीठ परिषदेत रामन यांनी कोलकाता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. इंग्लंडमधील रॉयल सोसायटीत त्या वेळी त्यांनी तंतुवाद्यांच्या सिद्धांतावर व्याख्यानही दिले. समुद्रमाग्रे भारतात परत येत असताना भूमध्य समुद्राच्या गडद निळ्या रंगाने ते प्रभावित झाले, आणि या निळ्या रंगाचे कारण शोधून काढण्याचे कार्य हाती घेतले.

लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९२४ मध्ये त्यांची निवड झाली. ब्रिटिश सरकारने त्यांना १९२९ मध्ये नाईट (सर) हा किताब दिला. कोलकाता विद्यापीठात सोळा वष्रे काम केल्यानंतर १९३३ मध्ये बंगलूर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांनी बंगलोर येथे रामन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च ही संस्था स्थापन केली. अनेक सन्माननीय डॉक्टरेट पदव्यांचा व वैज्ञानिक संस्थांच्या सदस्यत्वाचा त्यांना मान मिळाला होता.

-वैष्णवी कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org