ब्लिचिंग अर्थात विरंजन क्रियेसाठी हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर सर्वत्र केला जातो. १०० टक्के सुती कपडय़ाचे ब्लिचिंग करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड (५० टक्के) कापडाच्या वजनाच्या दोन ते चार टक्के या प्रमाणात वापरले जाते, तर कॉस्टिक सोडय़ासाठी हे प्रमाण कापडाच्या वजनाच्या तीन ते चार टक्के इतके असते. याशिवाय स्थिरीकरण घटक अर्धा ते एक टक्का आणि जलशोषक पदार्थ एक ते दोन टक्के या प्रमाणात वापरले जातात. द्रावणाचा सामू (पी.एच.) १०.५ ते १२ या दरम्यान ठेवला जातो. तसेच तापमान ८५ अंश ते ९५ अंश सेल्सिअस या दरम्यान राखले जाते. या प्रकारे नीट ब्लिचिंग होण्यास कापड द्रावणात दोन ते तीन तास ठेवावे लागते.
ब्लिचिंगची प्रक्रिया दोन प्रकारे करता येते. एक प्रकार थंड ब्लिचिंग, तर दुसरा प्रकार गरम ब्लिचिंग. थंड ब्लिचिंग ही हळू होणारी प्रक्रिया असून थंड पाण्यात किंवा त्या ठिकाणचे तापमान असेल त्या तापमानाला प्रक्रिया केली जाते. अशी प्रक्रिया केल्यास चांगला पांढराशुभ्र कपडा मिळतो. तसेच कापडाच्या ताकदीवर काही दुष्परिणाम होत नाही. पण या प्रक्रियेला वेळ जास्त लागतो. तर गरम ब्लिचिंग प्रक्रिया कमी वेळात पार पडते. गरम प्रक्रियेतही कापडाची शुभ्रता चांगली मिळते, पण कपडय़ाची ताकद थंड प्रकियेच्या तुलनेत थोडी कमी होते.
ब्लिचिंगसाठी जिगर, जंबो जिगर आणि जेटी १०२ या यंत्रांचा वापर पूर्वीपासून केला जात आहे. आजही विकेंद्रित क्षेत्रातील कापड प्रक्रिया उद्योग याच यंत्रणा वापरतात. िवच, सॉफ्ट फ्लो आणि जेट या प्रकारची यंत्रे गुंफाई (निटिंग) केलेल्या तसेच तलम व अतितलम कापडासाठी वापरतात. या दोन्ही प्रकारच्या यंत्रांमध्ये गरम ब्लिचिंग पद्धतीचा वापर केला जातो. याखेरीज आता सलग ब्लिचिंग यंत्रणा विकसित झालेली आहे. या यंत्रणेच्या वापरामुळे जास्त आणि एकसारखे उत्पादन मिळते, कापडाची शुभ्रता आणि जलशोषकता चांगली असते. या प्रक्रियेला पाणी कमी लागते, तद्वतच पाण्याचे प्रदूषणही आटोक्यात ठेवले जाते. या यंत्रासाठी रसायनांची मात्रा कमी लागते, तसेच मनुष्यबळाची गरजही कमी असते. या प्रकारे सर्व खर्च कमी होतो. त्यामुळे दर मीटर कापडामागे या प्रक्रियेला खर्च कमी पडतो.
सतीश दिंडे (इचलकरंजी) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पन्हाळगडाचे महत्त्व
कोल्हापूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या, सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेल्या पन्हाळगडाला मराठय़ांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कोल्हापूर ऊर्फ करवीर संस्थानाच्या जडणघडणीचा तर पन्हाळगड हा प्रमुख साक्षीदार आहे. कोल्हापूर संस्थानाचा जन्मच मुळी पन्हाळगडाच्या सान्निध्यात झाला. कोल्हापूर राज्याचा विकास, राज्याचे संरक्षण -संगोपन करण्याची जबाबदारी अनेक वर्षे पन्हाळगडाच्या समर्थ तटबंदीने पेलली.
शिलाहार राजा नृसिंह भोज याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात पन्हाळगड किल्ला बांधला. काही काळ शिलाहार राजाचा दरबारसुद्धा या गडावर भरविला जात असे. शिलाहारांची येथील कारकीर्द इ. स. ११७८ ते १२०९ अशी झाली. पुढे यादव राजा सिंघण याने १२०९ साली पन्हाळगडावर आक्रमण करून देवगिरीच्या यादवांच्या राज्याचा विस्तार केला. पन्हाळगड आणि आसपासचा टापू हा देवगिरीच्या राज्याचा महत्त्वाचा भाग बनला. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात यादवसत्तेला उतरती कळा लागली. देवगिरीचे राज्य दिल्लीच्या अमलाखाली गेले. पुढे पन्हाळा, कोल्हापूर आदी परिसर बहामनी राजवटीखाली गेला.
पूर्वेला विजापूर, गोवळकोंडा व पश्चिमेला कोकणचा किनारा येथपर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी पन्हाळगडासारखे केंद्रस्थान प्रत्येक सत्ताधाऱ्याला हवे होते. सतराव्या शतकात, १६५९ साली आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केल्यावर शिवाजी महाराजांनी पन्हाळगड मराठी राज्यात सामील केला. पुढे १६६० मध्ये आदिलशहाने विजापूरचा सरदार सिद्दी जोहर यास पन्हाळगडाची मोहीम दिली. सिद्दीने पन्हाळय़ाला घातलेल्या वेढय़ातून भुयारी मार्गाने राजांनी सुटका करून घेतली व विशाळगड गाठला. १६७३ साली शिवाजीराजांनी पन्हाळगड परत आपल्या कब्जात केला. पुढे शिवाजीराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचे निधन झाल्यावर १७१० साली ताराबाईंनी पन्हाळय़ावर आपले कोल्हापूरचे निराळे राज्य स्थापन करून आपला पुत्र शिवाजी याच्या छत्रपतीपदाची घोषणा केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com