29 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : न्यूरोप्लास्टिसिटी

मानवजातीसाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुसंख्य माणसं समाजाच्या भल्याचा विचार करत असतात.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

एकदा शिकलेल्या गोष्टी बदलता येतात का, त्या पुसून टाकून तिथे नवीन माहिती वा ज्ञान भरता येईल का? एखादी अत्यंत आवडती व्यक्ती अत्यंत नावडती होऊ शकते का? एकदा मनावर किंवा मेंदूवर ठसलेलं शिक्षण बदलतं, की कधीच बदलू शकत नाही? यावर मेंदूशास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की, लहान मुलांचा मेंदू हा बदलत, वाढत असतो. त्याला जसजसे नवे अनुभव येतील तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात. असेच बदल प्रौढांच्या मेंदूत होतात का? शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलेलं आहे, की हे बदल प्रौढांमध्येसुद्धा होऊ शकतात. यालाच ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ असं म्हणतात. मेंदू विचार बदलू शकतो, घडवू शकतो.

आपल्याला जी माहिती उपलब्ध झालेली आहे वा करून देण्यात आलेली आहे, त्या माहितीचं गारूड माणसांच्या मेंदूवर पसरवता येतं. कोणत्याही नव्या, वेगळ्या, चांगल्या, सकारात्मक शब्दांवर, भुरळ घालणाऱ्या भावनांवर माणसांचा विश्वास बसतो. त्यातून त्यांचं मत बनतं. मात्र, आज हे मत कितीही पक्कं असलं तरी उद्या ते असेलच असं ठामपणे सांगता येत नाही.

माणसांना वाईट अनुभव येत राहिले तर मत बदलूही शकतं. कारण सारासार विचारशक्ती ही प्रत्येक माणसाकडे असते. हे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे, तसंच जनमानसाच्या बाबतीतही शक्य आहे. कोणताही माणूस किंवा समाज हा चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभा राहतो. नकारात्मक भावनांमुळे माणूस काही काळ गोंधळून जाईल, विचारांचा गुंता निर्माण होईल; पण अंतिमत: हिंसा, दुफळी, क्रौर्य, खोटेपणा यापेक्षा शांतता, चांगुलपणा, अहिंसा यावर माणसाचा विश्वास असतो, म्हणूनच ओढाही तिकडेच असतो. समूह मानसशास्त्र अस्तित्वात असलं तरी त्यापैकी प्रत्येकाचा मेंदू घडलेल्या, समोर येणाऱ्या घटनांचं विश्लेषण करू शकतो. या विश्लेषणशक्तीमुळेच समाज शाबूत राहण्याची शक्यता वाढते. मानवजातीसाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुसंख्य माणसं समाजाच्या भल्याचा विचार करत असतात. म्हणूनच कोणत्याही समाजात युद्ध सुरू झालं, अनाचार माजला, की तो संपवून सकारात्मक परिस्थिती लवकरात लवकर कशी निर्माण होईल, याचे प्रयत्न चालू असतात. ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ हा मेंदूचा अतिशय सुंदर गुण यासाठी मदतच करतो.

 

First Published on July 12, 2019 2:10 am

Web Title: brain can change thoughts neuroplasticity zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : अल्कोहोल : मेंदूपासून शरीरापर्यंत परिणाम
2 कुतूहल : दूरदूरची अंतरे
3 मेंदूशी मैत्री : धोक्याची जाणीव करून देणारा – ब्रेन स्टेम
X
Just Now!
X