ब्रिटिश वसाहतीपासून स्वातंत्र्य मिळविलेल्या ग्रेनाडात पुढे १९७९ मध्ये साम्यवादी क्युबाच्या पाठिंब्याने ‘न्यू ज्युवेल मूव्हमेंट’ या साम्यवादी चळवळीने सरकार स्थापन केले. त्यानंतर क्युबन सैन्याच्या अनेक तुकड्या ग्रेनाडात तळ ठोकून राहिल्या होत्या. राजकीय विरोधकांवर चाललेल्या रक्तरंजित कारवायांमुळे या नवदेशात अराजकता पसरली होती. मग अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी यात लक्ष घातले. अमेरिकी फौजांनी हल्ले करून क्युबन सैन्य ग्रेनाडाबाहेर काढले. त्यानंतर ग्रेनाडात राजकीय स्थैर्य प्रस्थापित झाले. तिथे लोकशाही पद्धतीने निवडणुका पार पडतात आणि पंतप्रधानाची नियुक्ती होत असते. १९९० पासून ग्रेनाडात एकलगृह संसदीय सांविधानिक राजेशाही पद्धतीची राजकीय व्यवस्था आहे. २०१८ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या न्यू नॅशनल पार्टीचे कीथ मिशेल हे सार्वभौम ग्रेनाडाचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

ग्रेनाडा बेट हे दक्षिण कॅरिबियन सागरी वादळीय पट्ट्यात येते. त्यामुळे अधूनमधून लहान-मोठी वादळे येऊन जीवित आणि वित्तहानी होत असते. २३ सप्टेंबर १९५५ रोजी या बेटावर ताशी १८५ कि.मी. या वेगाने घोंगावलेले ‘हरिकेन जॅनेट’ हे आजपर्यंत आलेल्या वादळांपैकी सर्वाधिक संहारक होते. साधारणत: ६० टक्के जनता या वादळाने विस्थापित होऊन बहुतांश घरे जमीनदोस्त झाली. त्यानंतर २००४ मध्ये आलेले ‘इव्हान’ आणि २००५ सालचे ‘एमिली’ ही दोन वादळे प्रचंड वित्तहानी करून गेली.

पर्यटनापासून मिळणारे उत्पन्न हा ग्रेनाडाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. येथील समुद्रकिनारे, धबधबे आणि वनवैभव यांचे उत्तर अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड येथील पर्यटकांना मोठेच आकर्षण आहे. पर्यटकांसाठी आलिशान हॉटेल्स, जलक्रीडा सुविधा येथे तयार केल्या आहेत. ग्रेनाडाच्या अर्थव्यवस्थेत ४० टक्के भाग येथील जायफळ आणि जायपत्रीच्या निर्यातीचा आहे. या बेटावरच्या अनेक कुटुंबांसाठी जायफळाची लागवड हे रोजीरोटीचे साधन आहे. ग्रेनाडाच्या राष्ट्रीय ध्वजावर आणि बोधचिन्हावरही जायफळाचे चित्र आहे, इतके ते महत्त्वाचे मानले जाते. एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या या देशात साधारणत: ९० टक्के लोक ख्रिस्तीधर्मीय असून सुमारे ८५ टक्के लोक आफ्रो-ग्रेनाडियन वंशाचे आहेत. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com