माद्रिदवासीयांचा सर्वात आवडता, परंपरागत क्रीडाप्रकार म्हणजे कोरिडा ऊर्फ बुलफाइट. परंतु आताशा बुलफाइट खेळाची तिकिटे फुटबॉलच्या तिकिटांच्या सहापट महाग झाल्यामुळे सामान्यत: लोक फुटबॉलकडे वळू लागले आहेत. बुल फाइट हा क्रीडाप्रकार प्रथम ग्रीसमध्ये सुरू झाला. रोमन लोकांनी ग्रिकांकडून घेतलेला हा क्रीडाप्रकार अधिक रुजला तो स्पेनच्या माद्रिदमध्ये. पुढे ७११ साली मुस्लीम मूर लोक स्पेनमध्ये आले. त्यांनी या खेळावर त्यांचे संस्कार करून नियोजनबद्ध असा आजचा खेळ तयार केला. बुलफाइट शिकविण्यासाठी माद्रिदमध्ये संस्था आहेत. १८३० साली प्रेडो रोमेरो या मेटॅडोरची म्हणजे बलाशी झुंजणाऱ्याची, बुलफाइट कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यावर त्याने चांगल्या लढवय्या जातीच्या बलांची पदास करवून घेतली. बुलफाइट हा खरे तर क्रीडाप्रकार नसून एक प्रकारचे नाटय़च आहे. कारण या खेळाचा शेवट ठरलेलाच असतो आणि तो म्हणजे बलाचा वध! बलाचा वध करण्याची पद्धतसुद्धा ठरलेलीच असते. या खेळाच्या प्रमुख खेळाडूला ‘मेटॅडोर’ म्हणतात. बुलफाइटचा खेळ माद्रिदमध्ये फक्त मार्च ते ऑक्टोबरमधील प्रत्येक रविवारी खेळवला जातो. त्यामुळे माद्रिदचा स्पॅनिआर्ड मोठय़ा आतुरतेने मार्च महिन्याची वाट पाहत असतो. बुलफाइटचे शिक्षण देणाऱ्या दोन संस्था म्हणजे बुलफाइट कॉलेजेस माद्रिदमध्ये आहेत. बुलफाइटचे पूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणाला ‘मेटॅडोरस टी टोरोस’ अशी ग्रेड दिली जाते. अशा मेटॅडोरना चांगली मिळकत आणि प्रसिद्धी मिळते. स्पेनमधील बहुतेक गावांमध्ये जेव्हा काही सण, उत्सव असतो त्या वेळी बुलफाइटचा खेळ असणारच. प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते आणि त्याचा उत्सव असतो. त्या वेळी जसे आपल्याकडे लहान गावात कुस्त्यांचे फड भरविले जातात त्याप्रमाणे रोज बुलफाइट असते! माद्रिदमधील ‘फिएस्टा जी सॅत्रनस्रिडो’ या उत्सवातील बुलफाइट स्पध्रेतील पहिले बक्षीस मिळविणे प्रतिष्ठेचे समजतात.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

पानाच्या मध्यावर फूल

सर्वानाच हे शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असणार. या वनस्पतीच्या पानाच्या मध्यावर फूल आणि फळ दोन्ही उगवतात; परंतु वैज्ञानिक दृष्टीने सविस्तर माहिती मिळाल्यावर आपले आश्चर्य नाहीसे होते. वनस्पती अचल असल्याने त्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी वातावरणाबरोबर जुळवून घेणे गरजेचे असते. म्हणून काही वनस्पतींमध्ये असे बदल झालेले दिसतात.

रस्कस अक्यूलिएटस (Ruscus  aculeatus)  एक सदाहरित असणारे झुडूप असून अ‍ॅस्पॅरेगस कुलातील वनस्पती आहे. मूळच्या इराण भूमध्यसागरीय भाग व अमेरिकेचा दक्षिण भाग या प्रदेशातील या वनस्पतीला इंग्रजीत बुचर्स ब्रुम, स्वीट ब्रुम किंवा ज्यूज मिरतल म्हणतात. याच्या अंकुरांना/ कोंबांना क्लॅलोड म्हणतात ते पानसदृश असून कडक आणि टोकाला अणकुचीदार काटय़ासारखे असतात. वास्तवात ते पान नसून खोडाचाच भाग अनुकूलनासाठी पानासारखा झालेला असतो. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साजऱ्या होणाऱ्या एका ज्यू सणामुळे ‘फिस्ट ऑफ टॅबरनेकल’ या वनस्पतीचे नाव ज्यूज मिरतल  पडले असावे.

रस्कस अ‍ॅक्यूलिएटस या वनस्पतीमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचे वेगळे झुडूप असते. वसंत ऋतूत पानाच्या मध्यावर हिरव्या रंगाची फुले येतात. स्त्रीकेसर फुलाचे रूपांतर नंतर लाल रंगाच्या चेरीसारख्या दिसणाऱ्या आणि आकाराच्या फळात होते. रस्कसच्या बियांचे प्रसारण पक्ष्यांद्वारे होते तसेच जमिनीतील खोडाच्या भागापासूनही होऊ शकते. ही वनस्पती जंगलात आणि समुद्रकिनारी अशा दोन्ही वातावरणात चांगली वाढते. त्याचप्रमाणे उद्यानातही उगवू शकते.

या वनस्पतीचे बुचर्स ब्रुम हे नाव त्याच्या कडक कांडय़ासारख्या फांद्यांमुळे आले आहे. युरोपमध्ये खाटीक लोक या झाडाच्या फांद्यांपासून बनवलेल्या झाडूचा उपयोग कापण्याचा ठोकळा स्वच्छ करण्यासाठी करीत असत. या वनस्पतीचे कोवळे भाग अ‍ॅस्पॅरॅगसप्रमाणे खाण्यासाठी वापरले जातात. त्यांचा औषधी उपयोग दोन हजार वर्षांपासून प्रामुख्याने रेचक आणि मूत्रविकारांसाठी होतो. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये याचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो.

सदाहरित वनस्पती म्हणून रस्कस कुंडीत किंवा जमिनीत लावल्यास बागेची शोभा वाढते. फुलांचा आकार जरी लहान असला तरी गडद लाल रंग आकर्षण वाढवतो.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org