21 October 2018

News Flash

पेटणारी हवा म्हणजे काय?

ही पेटणारी हवा म्हणजेच आपलं फ्लॉजिस्टॉन तर नव्हे ना, असं समजून कॅव्हेंडिशनं प्रयोग सुरू केले.

सुमारे एक दशलक्ष वर्षांपूर्वी अग्नीचा शोध आदिमानवाने लावल्याच्या खुणा सापडल्या असल्या तरीही अठराव्या शतकापर्यंत मानवाला ‘आग म्हणजे काय?’ याविषयी प्रचंड कुतूहल वाटे आणि म्हणून त्यावेळी बरेच तर्कही प्रचलित होते. ‘प्रत्येक वस्तूमध्ये फ्लॉजिस्टॉन आणि राख असे दोन्ही पदार्थ असतात आणि जेव्हा एखादा पदार्थ जळतो, तेव्हा त्यातला फ्लॉजिस्टॉन उडून जातो आणि फक्त राख उरते’, असा हा ज्वलनाविषयी फ्लॉजिस्टॉनचा सिद्धान्त सर्वमान्य होता. लोकांनी राख बघितली होती, पण फ्लॉजिस्टॉन मात्र कुणीच बघितला नव्हता. हेन्री कॅव्हेंडिशनं तो शोधण्याचं ठरवलं. वाचनालयात बरीच पुस्तकं चाळल्यावर, लोखंड सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवल्यावर जे बुडबुडे येतात ते साठवून आग लावल्यावर पेटतात, म्हणजेच ‘पेटणारी हवा’ अशी माहिती त्याच्या वाचनात आली.

ही पेटणारी हवा म्हणजेच आपलं फ्लॉजिस्टॉन तर नव्हे ना, असं समजून कॅव्हेंडिशनं प्रयोग सुरू केले. त्याने लोखंड, जस्त आणि कथील असे तीन धातू घेतले; सल्फ्युरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्लही घेतलं. यामुळे धातू+ आम्ल अशा वेगवेगळ्या सहा जोडय़ा तयार झाल्या. लोखंड + सल्फ्युरिक आम्ल, लोखंड + हायड्रोक्लोरिक आम्ल इ. या सहा जोडय़ा करून त्यांच्या रासायनिक प्रक्रियेतून बाहेर निघणारे सहा वायू त्याने सहा पिशव्यांत भरले. या पिशव्या पेटवून बघितल्या, त्यांची वजनं केली. आणि ही सगळी त्याला सारखीच आढळली. जितका धातू तो या रासायनिक प्रक्रियेत जास्त घ्यायचा, तितकाच त्यातून वायूही अधिक बाहेर पडे. यावरूनच हा वायू त्या धातूतूनच निघतो, असं त्यांना वाटलं. कॅव्हेंडिश यांना वाटलं की आपण फ्लॉजिस्टॉन शोधलं. याचबरोबर कॅव्हेंडिशनं फ्लॉजिस्टॉन (हायड्रोजन) आणि डिफ्लॉजिस्टिकेटेड (ऑक्सिजन) यांच्या मिश्रणातून पाणी तयार होतं, हे दाखवून दिलं. पण तो वायू फ्लॉजिस्टॉन नसून खरं तर हायड्रोजन वायू होता. हायड्रोजन हे नाव त्या वायूला पुढे लेव्हायजेनं दिलं. हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमध्ये पाणी तयार करणारा असा अर्थ होतो (हैड्रो-पाणी आणि जेन-तयार करणारा). अशा प्रकारे पेटणारी हवा म्हणजे काय आहे हे शोधता-शोधता कव्हेंडिशने १७६६ मध्ये अतिशय ज्वालाग्राही असणाऱ्या हायड्रोजनचा शोध लावला.

शुभदा वक्टे        

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मिलिंदाचे प्रश्न..

मिलिंद ऊर्फ मिनँडर या मूळच्या ग्रीक राजाने भारतीय प्रदेशावर राज्य कमावल्यावर बौद्ध धर्म स्वीकारून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्याच्यावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव कसा पडला त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.

मिलिंद त्याच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला बौद्ध संन्यासी, विचारवंत नागसेन यांच्या विद्वत्तेबद्दल बरेच काही ऐकून होता. मिलिंदने उत्सुकतेपोटी आपला दूत नागसेनांकडे पाठवून त्यांना दरबारात बोलावणे पाठविले. राजाच्या दरबारात येण्यास नागसेनांनी नकार दिला. नकार देताना दूतास सांगितले की, तुझ्या राजास सांग, की इथे कुणी नागसेन नावाचा माणूस राहात नाही! राजा मिलिंदने मग आपले सैनिक पाठवून सक्तीने नागसेनांना आपल्या दरबारात आणविले. मििलदने त्यांना विचारले की, या नगरात नागसेन या नावाचा कोणी राहात नाही तर तुम्ही कोण?

नागसेनांनी राजाला काही उत्तर न देता मिलिंदला प्रथम त्याच्या रथाची चाके काढायला लावली. आता चाकांशिवाय या रथाचा उपयोग काय, असे मिलिंदला विचारले. त्याचे उत्तर आले की, याचा उपयोग काहीच नाही. त्यानंतर रथाचे घोडेही सोडवून, चाके आणि घोडय़ांशिवाय जे उरले ते काय आहे, असा प्रश्न केला. मिलिंदचे उत्तर आले की, काहीच नाही! असेच रथाचे इतर सर्व भाग बाजूला काढल्यावर उरलेले जे काय आहे त्याला काय म्हणायचे, असा नागसेनांचा शेवटचा प्रश्न होता. मिलिंदचे उत्तर आले की, हे शून्य उरले!

नागसेनांचे हे प्रश्न ऐकून मिलिंद थक्क झाला. त्या प्रश्नांमागचा ‘मी कोणीच नाही’ हे सांगण्याचा नागसेनांचा हेतू कळल्यावर त्यांची माफी मागून मिलिंदने त्यांचा आदरसत्कार केला. त्याने आपल्या दुसऱ्या रथातून नागसेनांना त्यांच्या बौद्ध विहारात स्वत: पोहोचवले. रथ महत्त्वाचा असला तरी त्याचे भाग सुटे केल्यावर रथाचे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. त्याचप्रमाणे राजाचे महत्त्व त्याची प्रजा आणि सेवक यांच्याशिवाय शून्यवत आहे हा नागसेनांच्या प्रश्नांचा मथितार्थ होता हेही मिलिंदच्या लक्षात आले. नागसेनांची महती पटल्यावर त्यांना गुरुस्थानी मानून मिलिंदने त्यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ‘मिलिंद-प्रश्न’ हा नागसेन आणि मिनँडर यांच्यातील संवाद आहे. ‘तुम्ही कोण आहात?’ या प्रश्नापासून तो सुरू होतो. त्यामागील कथा मात्र विविध पद्धतींनी सांगितली जाते. काही कथारूपांत, मिलिंदच नागसेनांना भेटायला जातो.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on January 10, 2018 1:59 am

Web Title: burning air