प्लास्टिकचा वापर करू नये, याबद्दल जनजागृती आता होऊ लागली आहे. त्यातून प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधनही होऊ लागले आहे. त्यामुळे प्लास्टिक इतस्तत: टाकू नये आणि त्याचे पुन:चक्रीकरण (रीसायकलिंग) करावे, यासाठीचे प्रयत्नही होताना दिसत आहेत. अनेक संस्था प्लास्टिक गोळा करून ते वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये प्रक्रियेसाठी पाठवतात.

प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाबद्दलची ही जागृती मोठय़ा आकारातील प्लास्टिकबद्दल अधिक आढळते. परंतु छोटय़ा आकाराचे प्लास्टिक अशा प्रयत्नांपासून दूरच आहे. खिळे, स्क्रू, वॉशर, प्लास्टिकच्या छोटय़ा पिशव्या, वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिक बाटल्यांची झाकणे, या झाकणाबरोबरचे लॉक,  पातळ प्लास्टिक, सौंदर्यप्रसाधनांतील टिकल्या.. अशा अनेक प्रकारांत छोटय़ा आकारांतील प्लास्टिकचे भाग आपल्या वापरात येत असतात. मात्र वापर झाल्यानंतर हे लहान आकारांतील प्लास्टिकचे आपण कचऱ्यात टाकून देतो. तिथे या प्लास्टिकला थोडासा वाराही उडवून इतस्तत: पसरवतो.

प्लास्टिकच्या या छोटय़ा वस्तूंना, भागांना भक्ष्य समजून अनेक पक्षी व प्राणी खातात आणि मृत्युमुखी पडतात. कचऱ्याच्या ढिगाजवळ अथवा रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या अनवधानाने खाणाऱ्या गाई अनेकांनी पाहिल्या असतील. त्यांच्या पोटातील प्लास्टिक काढण्याच्या शस्त्रक्रियेचे दृकमुद्रण अनेकांनी समाजमाध्यमांवर  नक्की पाहिले असेल. पण पक्षी किंवा त्यासमान वजना/आकाराचे प्राणी किंवा सजीव हे प्लास्टिक खातात, तेव्हा त्यांचा अपमृत्यू अटळच असतो.

जमिनीवरील छोटय़ा तुकडय़ांच्या स्वरूपातील प्लास्टिक पावसाच्या पाण्याबरोबर जलाशयात वाहून जाते. त्यात सूर्यप्रकाश, तापमान आणि इतर प्रक्रियांनी या प्लास्टिकचे अधिक बारीक बारीक तुकडे होतात. तलाव, नद्या आणि खाडीमधून हे प्लास्टिकचे कण समुद्रापर्यंत पोहोचतात. एका सर्वेक्षणानुसार जगभरात अंदाजे ८० लाख टन प्लास्टिक दरवर्षी समुद्रात टाकले जाते. यातील धोका असा की, समुद्रात किंवा जलाशयात हे प्लास्टिकचे बारीक कण पाण्यातील वनस्पतिप्लावकांसारखे भासतात; त्यामुळे जलचर या कणांना भक्ष्य समजून खातात. माशांमार्फत हे कण माणसाच्या पोटातही शिरतात.

इतकचे काय, पण अगदी आपल्या घरातील नळाच्या पाण्यातही प्लास्टिकचे पातळ धागे असतात. एका जागतिक सर्वेक्षणात, भारतातील ८२.४ टक्के पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे असे तंतू आढळले. सरासरी अर्धा लिटर पाण्यामध्ये प्लास्टिकचे चार तंतू सापडले आहेत (संदर्भ : ओर्ब् मीडिया).

– विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org