कापडातून कांजी काढल्यावर कापड स्वच्छ करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत कांजीचा अंश राहिला असेल तर तो काढून टाकला जातो. तेलकट डाग काढून टाकले जातात. शिवाय सरकीच्या टरफलाचा काही भाग असल्यास तोही काढून टाकला जातो. ही प्रक्रिया भट्टीत केली जाते. पण यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात.
एक पद्धत दाब पद्धत तर दुसरी दाबविरहित पद्धत आहे. दाब पद्धतीत कॉस्टिक सोडा, सोडा अ‍ॅश, सोडिअम सिलिकेट, सोडिअम-बाय-सल्फाईट, साबण आणि  सोडिअम-हेक्झा-मेटा फॉस्फेट यांचा वापर द्रावणात केला जातो. ही प्रक्रिया २ ते २.५ किलो प्रति चौ. से.मी. इतक्या दाबाखाली ८ तास केली जाते. प्रक्रियेच्या वेळी तापमान १३० अंश सेल्सिअस ते १४० अंश सेल्सिअस इतके असते. दुसरी दाबविरहित पद्धत रंगीत धागे असलेल्या कापडासाठी वापरली जाते. या पद्धतीत सोडा-अ‍ॅश, सोडिअम सिलिकेट, साबण आणि सोडिअम-हेक्झा-मेटा फॉस्फेट यांचे द्रावण वापरतात. या द्रावणात कापड आठ तास ठेवले जाते. आणि तापमान ८० अंश सेल्सिअस एवढे ठेवतात. भट्टीचे झाकण उघडे ठेवून ही प्रक्रिया करतात. कापडाच्या वजनाच्या प्रमाणात द्रावणाचे घटक आणि पाणी वापरले जाते. भट्टीमध्ये कापड हाती किंवा यांत्रिक पद्धतीने भरले जाते. प्रक्रियेसाठीचे द्रावण भट्टीबाहेर एका टाकीत तयार केले जाते. तसेच ते वाफेच्या मदतीने गरम केले जाते.
भट्टीतील तापमान आणि वापरलेले रासायनिक घटक यांच्यामुळे कापडातील मेण, ग्रीस, कचरा, पेक्टीन इ. घटकांवर अभिक्रिया होऊन एक वेगळे द्रावण (साका) तयार होते. त्याद्वारे हे नको असलेले घटक कापडातून निघून जातात. सरकीच्या टरफलाचाही (असल्यास) असाच बंदोबस्त होतो.
या प्रक्रियेमुळे अनावश्यक घटक कापडातून निघून जातात. त्याचबरोबर कापडाची नसíगक रंगछटाही बदलते. तसेच पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते. याचा फायदा आपल्या अंगावरील घाम टिपून घ्यायला होतो. आपल्यासारख्या देशातील हवामानात याची नितांत गरज आहे. या गुणधर्मामुळेच नवनवीन तंतू आले तरी सुती कापडाची मागणी टिकून आहे. ही प्रक्रिया जेवढी चांगल्या दर्जाची होईल तेवढा पुढील ब्लीचिंग प्रक्रिया चांगली व्हायला फायदा होतो.

प्रबोधन पर्व: पोकळी भरून काढण्यासाठी विधायक कार्यही आवश्यक
‘‘आपली चळवळ समतेसाठी आहे, म्हणजेच तिला जुनी विषमता तोडायची आहे; तेव्हा संघर्षांला केव्हातरी तोंड लागणारच आहे, हे उघड असते. त्या संघर्षांत स्थानिक लोकांचा सहकार मिळवून, त्याला सामाजिक स्वरूप देण्याची धडपड करावी लागते. हा संघर्ष खेडय़ातील विविध प्रकारचे भय व बाहेरच्या माणसांचा उपद्रव यांच्याविरुद्ध होऊ शकतो. संघर्षांने सुरुवात झाली आणि त्यात स्त्रियांना समाविष्ट करता आले तर त्यांना पुरुषांकडून होणाऱ्या मारहाणीविरुद्धही पाऊल उचलणे संभवनीय असते. वस्तीबाहेरून येणाऱ्या लोकांच्या छळाचा उपद्रव जितका जास्त, तितके त्या उपद्रवाविरुद्ध चळवळ करण्यासाठी वस्तीचे लोक एकोप्याने एकत्र येणे अधिक संभवनीय असते. असे संघर्ष उभे राहिले तर पोलीस, पाटील, पटवारी ही सारी यंत्रणा त्या संघटना किंवा चळवळी नष्ट करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल असा संभव असतो. धमक्या, मारहाण, कोर्टात खटले असे अनेक उपाय योजून संघटना मोडण्याचे प्रयत्न होतात. नवसमाजाची रचना चुटकीसरशी साधत नाही, म्हणूनही संघर्षही चटकन संपत नाहीत. त्यांच्यात चढउतारही भरपूर असतात. हे कार्य एकटय़ा माणसाचेही नसते.’’
गीता साने  आपल्या ‘भारतीय स्त्रीजीवन’ (ऑगस्ट १९८६) या पुस्तकात स्त्रियांची चळवळ आणि संघर्ष यांच्या संतुलनाविषयी लिहितात-
‘‘सामाजिक परिवर्तनासाठी, जुने मोडून नवे घडवण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जुने तुटत जाताना निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी विधायक कार्यही आवश्यक आहे. संघर्ष व विधायक कार्य हातात हात घालून वाटचाल करतात तेव्हाच नवसमाजरचना टिकाऊ होते. विधायक कार्यामुळे लोकांचा कार्यकर्त्यांवरचा विश्वास वाढतो. संघर्षांला नवी धार येते. लोकांना जाणवणाऱ्या अडचणी व त्यांचे सर्वाना उपयोगी पडणारे उत्तर शोधून त्यावर कार्य झाल्यास नवसमाजरचनेचे काम रुजू लागते.. प्रत्येक संघर्षांचे स्वरूप थोडेथोडे वेगळे असते व प्रत्येक चळवळीचा कार्यक्रमही थोडाथोडा वेगळा असतो. संघर्ष करताना स्त्रियांनी आपली संख्या, आपली झारे-लाटणी व येणाऱ्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्याची तयारी, एवढीच आयुधे वापरणे हितावह असते.’’

मनमोराचा पिसारा: ओवर द रेनबो..
ज्युडी गारलंड या षोडशेनं १९३९ साली ‘विझार्ड ऑफ ओझ’ या चित्रपटासाठी ई आय हरबर्ग यांनी लिहिलेलं गाणं म्हटलं आणि अमेरिकेतल्या रेकॉर्ड कंपनीने इतिहास घडवला. आज अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय गाण्यात या कवनाचा (बॅलड) अव्वल क्रमांक आहे. चित्रपटातलं आतापर्यंत सर्वात गाजलेलं, आवडतं आणि यशस्वी म्हणून या गाण्याचा गौरव झालेला आहे.
दुसऱ्या महायुद्धकालीन जखमी अमेरिकन सैनिकांना धीर देण्यासाठी हे गाणं अनेकानी गायलं. अर्थात, ज्युडी गारलंडच्या आवाजातली आशादायी, तीव्र आणि कोवळी धार एकमेवाद्वितीय.
अवकाशात झेपावणाऱ्या अवकाशवीरांना वेकअप कॉल म्हणून याच गाण्याची धून वापरली. या वर्षी सर्वोत्तम शिखरावरचं गाणं म्हणून त्याचा सन्मान केला. अमेरिकेतल्या पोस्टानं या गाण्याचा स्टॅम्पही काढला.
चित्रपटातली नायिका संकटग्रस्त आहे. मनात निराशेचं धुकं दाटत आहे, पण ‘झाले युवती मना’ अशा अवस्थेत ती भविष्याकडे पाहून गाऊ लागते.
या गाण्यामध्ये असीम आशा आहे, आश्वासकता आहे, प्रेम आणि मानवी नाते संबंधातल्या आधार देणाऱ्या घट्ट विणीवर विश्वास आहे.
मर्मबंधातली ठेव आहे.
ओव्हर द रेनबो.. इंद्रधनूच्या पल्याड
उंच आकाशी, इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी,
असेन मी, अंगाई गीतातली कधीतरी जपलेली
स्वप्न घेऊन उराशी
उंच आकाशी इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी
उंच आकाशी इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी
उडतात निळे स्वप्नांचे पक्षी
जागी असेन मी चमचमत्या ताऱ्यापाशी
स्वप्न घेऊन उराशी
सोडून पाठी कृष्णमेघ सारे
धुरांडय़ातला काळा धूर मागे सरे
होतात स्वप्न खरी, जिवलगा खरंच रे
इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी
जातात संकटं विरघळून
चैतन्याच्या अवकाशी
विरघळे जशी साखर निर्मळ जळाशी
इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी
असेन मी अशा अवकाशी
चित्त माझे तुजपाशी
मीलनाचे संकेत घेऊन उराशी
इंद्रधनूच्या पल्याड अवकाशी
(स्वैर भावानुवाद ललिता बर्वे)
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com