गणिताचे सहसा शुद्ध आणि उपयोजित गणित असे दोन भाग केले जातात. अमूर्त आणि लगेच वापरले जाईलच असे नसणारे शुद्ध गणित, ही मानवी बुद्धीची एक उत्कृष्ट उपलब्धी आहे. व्याख्या-प्रमेय-सिद्धता अशी त्याची सर्वसाधारण मांडणी असते. उपयोजित गणित हा गणिती पद्धतींचा वापर प्रत्यक्षात करणारा भाग आहे. अभियांत्रिकी गणित हे त्याचे एक रूप आहे. पिरॅमिडस् बांधणी ते चंद्रावर मानवी पाऊल पडणे हे त्याचे सामथ्र्य दाखवतात. त्याशिवाय मनोरंजनात्मक (रिक्रिएशनल) गणित असाही एक वेगळा वर्ग केला जातो, मात्र काही गणितींच्या मते तो फारसा महत्त्वाचा नाही. तथापि, हा गणिती भागही अनेक प्रकारे अध्यापनास आणि संशोधनास हातभार लावत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्याला दुय्यम समजून उपेक्षू नये असा मतप्रवाह जोर धरत आहे.

गणिताचे वेगळे वर्गीकरणही केले जाऊ शकते. एक म्हणजे, औपचारिक गणित- जे अभ्यास व सराव यांनी आत्मसात केले जाणारे शालेय ते पदव्युत्तर गणित शिक्षण. तर दुसरे, स्वाभाविक गणित- जे मनुष्याच्या आणि निसर्गाच्या सजीव सृष्टीमध्ये उपजत असते. उदाहरणार्थ, रहदारीचा रस्ता ओलांडणे हा तसे पाहिल्यास अत्यंत जटिल गणिती प्रश्न आहे, जो आपण सहज सोडवतो; पण यंत्रमानवाला तसे करणे सोपे नसते. तसेच कोणतेही गणिती शिक्षण न घेता मधमाशा त्यांच्या पोळ्यात इष्टतम मात्रेत मधाचा साठा करण्यासाठी षट्कोनी कोठारे रचतात किंवा झाडावरील फुले आदर्श सममिती राखणारे रूप घेतात.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

आपण औपचारिक आणि स्वाभाविक गणित या दोहोंचा वापर दैनंदिन आयुष्यात करतो. औपचारिक शिक्षणामुळे आपला गणिती अनुभव समृद्ध होतो. त्यामुळे एखादे पुस्तक खणात मावेल की नाही याचा अंदाज आपल्याला एका दृष्टिक्षेपात येतो. दर वेळी पुस्तकाचे आणि खणाचे क्षेत्रफळ/घनफळ काढावे लागत नाही. म्हणून ही गणिती दृष्टी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. काही वेळा सादृश्यदर्शी (अ‍ॅनेलॉग) गणित, तर अन्य वेळा विश्लेषणात्मक गणित गरजेचे असते. जसे की, पेल्यात किती पाणी आहे हे समजण्यासाठी ते पाणी प्रमाणित मापन-भांडय़ात ओतून किंवा पेल्याचे घनफळ काढून उत्तर मिळू शकते (सादृश्यदर्शी पद्धत). मात्र पुढील सूर्यग्रहण केव्हा होईल हे जाणून घेण्यासाठी गणिती विश्लेषणच करणे भाग असते.

संगणकामार्फत अनुरूपण (सिम्युलेशन) हा गणिताचा आणखी एक प्रकार अलीकडेच विकसित झाला आहे. हे आभासी गणित गणिताच्या सर्व वर्गाना साहाय्यक ठरू शकते; काही वेळा ते त्यांच्या मर्यादाही ओलांडू शकते. तरी त्याचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने योग्य अशा संगणक आज्ञावली तयार करणे हे महत्त्वाचे ठरत आहे.

– डॉ. विवेक पाटकर  

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org