जोसेलीन बेल ही संशोधिका १९६७ साली अँटनी ह्य्रुईश याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात पीएच.डी.साठी संशोधन करत होती. ‘क्वासार’ या अतिदूरवरच्या दीíघकांची रेडिओ निरीक्षणे करण्यासाठी ती मुलार्ड वेधशाळेच्या, नव्यानेच उभारलेल्या रेडिओदुर्बणिीचा वापर करत होती. साडेचार एकरांवर पसरलेल्या या रेडिओदुर्बणिीत, दोन हजार लाकडी खांबांवरील सुमारे दोनशे किलोमीटर लांबीच्या तांब्याच्या तारांद्वारे हे रेडिओ संदेश ग्रहण केले जात होते. अंतराळातील विविध रेडिओ स्रोतांच्या निरीक्षणांतून, क्वासारची निरीक्षणे वेगळी करण्याचे काम बेलला करावे लागत असे. यासाठी ती रोज सुमारे तीस मीटर लांबीच्या कागदाच्या भेंडोळ्यावरील निरीक्षणे नजरेखालून घालत असे.

ऑगस्ट १९६७मध्ये तिला गरुड या तारकासमूहातल्या एका स्रोताकडून स्पंदांच्या (पल्स) स्वरूपात रेडिओ संदेश आल्याचे आढळले. घडय़ाळाप्रमाणे अत्यंत नियमित स्वरूपात येणाऱ्या या स्पंदांचा कालावधी प्रत्येकी सुमारे ०.३ सेकंद होता व दोन स्पंदांच्या दरम्यानचा कालावधी सुमारे १.३ सेकंदाचा होता. हे वैशिष्टय़पूर्ण रेडिओ संदेश एखाद्या क्वासारकडून नक्कीच येत नव्हते. सुरुवातीला या स्पंदांचा स्रोत एखादा उपग्रह, रडार, असा मानवनिर्मित असण्याची शक्यता वाटली होती. हे संदेश परग्रहवासीयांकडून येत असल्याची कल्पनाही केली गेली. परंतु १९६७च्या नाताळपर्यंत आकाशाच्या इतर भागातही, पहिल्या स्पंदकापेक्षा वेगळा कालावधी असणाऱ्या आणि वेगळी वारंवारिता असणाऱ्या अशा, आणखी तीन स्पंदकांचा शोध बेलला लागला.

त्यानंतर थॉमस गोल्ड याने हे स्पंदक (पल्सार) म्हणजे आपल्याच दीíघकेतले, खूप वेगाने फिरणारे व अतितीव्र चुंबकीय क्षेत्र असलेले न्यूट्रॉन तारे असल्याचे स्पष्ट केले. वजनदार ताऱ्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या गाभ्याचे अशा न्यूट्रॉनयुक्त ताऱ्यांत रूपांतर होते. या ताऱ्यांच्या चुंबकीय ध्रुवातून सतत रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत असते. एखाद सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात स्वतभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या या ताऱ्यांचा स्वतभोवती फिरण्याचा अक्ष व त्यांचा चुंबकीय अक्ष हे काहीसे वेगळ्या दिशेला रोखलेले असतात. या ताऱ्यांच्या चुंबकीय अक्षाच्या रेषेत जेव्हा पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीवर या रेडिओ संदेशांची नोंद होते. या शोधाचे निष्कर्ष १९६८ साली ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केले गेले. बेलचा मार्गदर्शक अँटनी ह्य्रुईश हा स्पंदकांच्या या शोधाबद्दल १९७४ सालच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला.

– डॉ. वर्षां चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org