धूमकेतू म्हणजे गोठलेल्या वायूचा आणि धुळीचा गोळा. ‘डर्टी स्नोबॉल’ म्हणून ओळखले जाणारे हे धूमकेतू आपल्या सूर्यमालेचे घटक आहेत. धूमकेतू जसे सूर्याजवळ येऊ लागतात, तसे त्यांच्या पृष्ठभागावरील वायूंचे बाष्पीभवन होऊन त्यांना शेपूट फुटते. यातील काही धूमकेतू हे ठरावीक कालावधीने सूर्याला भेट देत असले तरी, अनेक धूमकेतूंच्या कक्षा या अतिप्रचंड वा अन्वस्तीय (पॅरॅबोलिक) असल्याने त्यांचे पुन्हा दर्शन होणे दुरापास्त होते. या धूमकेतूंच्या उगमाबद्दल आतापर्यंत बरीच वेगवेगळी मते मांडली गेली आहेत. सोळाव्या शतकाच्या अखेरीस डेन्मार्कच्या टायको ब्राहेने, धूमकेतू हे आपल्या वातावरणातल्या वस्तू नसून त्यांच्या कक्षा चंद्राच्याही पलीकडे असल्याचे दाखवून दिले.

सतराव्या-अठराव्या शतकात धूमकेतूच्या कक्षांचे गणित स्पष्ट होऊ लागले. जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट याने ग्रह व धूमकेतूंचा जन्म एकाच तेजोमेघातून झाला असल्याचे प्रतिपादन अठराव्या शतकाच्या मध्यावर केले. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, फ्रान्सच्या लाप्लास याने, धूमकेतूंच्या कक्षा वेगवेगळ्या दिशेला रोखलेल्या असल्याने ग्रह व धूमकेतू यांचे जन्मस्थळ वेगळे असल्याचे मानले. त्याच्या मते धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेबाहेरच्या, आंतरतारकीय वस्तू होत्या. आपल्या सूर्यमालेतील गुरू हा अत्यंत वजनदार ग्रह आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे या धूमकेतूंना सूर्यमालेच्या आत ओढून आणीत असावा. मात्र असे असल्यास, इटलीच्या जिओवान्नी शिआपरेल्लीच्या मते, सूर्य ज्या दिशेने प्रवास करीत आहे, त्या दिशेने (समोरून) अधिक प्रमाणात धूमकेतू यायला हवेत. मात्र प्रत्यक्ष स्थिती अशी नसल्याने, शिआपरेल्लीने धूमकेतूंचा उगम आपल्या सूर्यमालेतच होत असल्याचे मत मांडले.

इस्टोनियातील खगोल संशोधक अर्न्‍स्ट योपिक याच्या काही संकल्पनांचा स्वीकार करून, जान ऊर्ट या डच खगोलज्ञाने, १९५० साली धूमकेतूच्या उगमस्थानाबद्दलचा एक सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार अब्जावधी धूमकेतूंनी भरलेल्या एका प्रचंड मेघाने सूर्यमालेला वेढले असून हा मेघ सूर्यापासून जवळजवळ दोन प्रकाशवर्षे अंतरापर्यंत पसरला असावा. हा मेघ आपल्याच सूर्यमालेचा भाग आहे. ग्रह आणि धूमकेतूंचा उगम हा समान असल्याचे ऊर्टचे मत होते. ऊर्टचा हा सिद्धांत सेहेचाळीस धूमकेतूंच्या कक्षांच्या माहितीवर आधारलेला आहे. ऊर्ट याचा ‘बुलेटिन ऑफ दि अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल इन्स्टिटय़ूट ऑफ नेदरलँड्स’मध्ये प्रकाशित झालेला, या संशोधनावरचा शोधनिबंध आधुनिक खगोलशास्त्रात लक्षवेधी ठरला आहे.

मृणालिनी नायक, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org