सुनीत पोतनीस

ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी अधिकारी म्हणून कॉलिन मॅकेन्झी यांची नियुक्ती १७८३ ते १८१५ या काळात दक्षिण भारतात विविध ठिकाणी झाल्यावर, १८१५ साली त्यांची नियुक्ती कलकत्ता येथे भारताचे पहिले सव्‍‌र्हेयर जनरल या पदावर झाली. कॉलिन त्यांच्या नोकरीचा अधिकतर काळ मद्रास येथेच राहून त्यांनी दक्षिण भारतातच सर्वेक्षण व पुराणवस्तू संशोधन केले. दुभाषी कवेलु व्यंकट बेरिया आणि जैन धर्माचे अभ्यासक धर्मय्या यांच्या साह्याने कॉलिन यांनी मुदगेरीला राहून अनेक जैन मंदिरांचे अवशेष शोधून काढले. तेथील शिलालेखांचा अभ्यास करून जैन धर्मावर एक व्यापक निबंधही कॉलिन यांनी लिहिला.

सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या आणि सध्या आंध्र प्रदेशात असलेल्या अमरावती येथे कॉलिन काही दिवस राहिले आणि त्यांनी तेथील ८५ शिल्पांच्या चित्रकृती करविल्या. या चित्रकृतींच्या तीन प्रती बनवून त्यातील एक प्रत एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया, कलकत्ता येथे, दुसरी प्रत मद्रास आणि तिसरी लंडनमधील ग्रंथालयात ठेवली. अमरावतीत त्यांना १३२ शिलालेख सापडले आणि मछलीपटण येथे सहा शिलालेख सापडले. हे सर्व सध्या चेन्नई येथे आहेत. हम्पी येथील विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांमधून तेथील पुरातन वास्तुशास्त्रीय सौंदर्य आणि संपन्न वारसा जगासमोर प्रथम उजेडात आणणारे कॉलिनच! त्यांनी काढलेला पेन्सिल स्केच नकाशा आणि महाबलीपुरमचे २५ नकाशे आजही ब्रिटिश ग्रंथालयात आहेत. श्रावण बेळगोळ येथील गोमतेश्वराच्या प्रचंड मूर्तीची उंची कॉलिन यांनी प्रथम मोजली. त्यांनी एकहाती केलेल्या प्रचंड वस्तुसंग्रहात तेरा भाषांमधील १५०० हस्तलिखिते, ८००० हून अधिक ताम्रलेख व तालपत्र (ताडाच्या पानांवर) लेख, २६३० नकाशे/ चित्रे, १४६ पुतळे, ६००० सुवर्ण, तांबे आणि चांदीची नाणी, २१५९ स्थलपुराणांचा समावेश आहे.

कॉलिन यांचा मृत्यू कलकत्त्यात १८२१ साली झाल्यावर त्यांनी केलेला प्रचंड वस्तुसंग्रह ब्रिटिश सरकारने त्यांच्या पत्नीकडून एक लाख रुपयांना विकत घेतला. हम्पी येथील विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांचे संशोधन केल्यामुळे कॉलिन मॅकेन्झींचा उल्लेख अनेक ठिकाणी कॉलिन मॅकेन्झी हम्पी या नावाने केला जातो!

sunitpotnis@rediffmail.com