अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कुटुंबीयांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे.
पारंपरिक पीक पद्धतीत पाच भाऊ शेतात राबूनही कष्टाच्या तुलनेत पसा कमी मिळत असल्याची जाणीव रौंदळे कुटुंबीयांना झाली. जास्त उत्पन्नासाठी पद्धतशीर शेती व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांना पटले. पारंपरिक शेती करताना आलेल्या अनुभवाबरोबरच विविध कृषी चर्चासत्रांतून मिळालेल्या ज्ञानाचा वापर ते करतात. प्रसंगी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात.
विशेषत: रासायनिक कीडनाशके तसेच खत वापर यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला ते घेतात. ठरावीक कालावधीनंतर कीडनाशकांची फवारणी न करता पिकाची परिस्थिती पाहून फवारणी करतात. खत व्यवस्थापनावरही ते विशेष लक्ष देतात. शेणखत, िनबोणी खत, सेंद्रीय खत यांबरोबरच डीएपी, युरिया इत्यादी खतांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करतात.
पाण्याच्या व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा मार्ग ते अवलंबतात. त्यांच्या १३३ एकरांपकी ८० एकरांवर ठिबक सिंचन केले जाते. विशेषत: फुलधारणा व फळधारणेच्यावेळी पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, याकडे ते अधिक लक्ष देतात. शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे त्याचा आíथक फायदा रौंदळे कुटुंबीयांना होत आहे. किती एकर शेतात कोणते पीक घ्यायचे, कोणत्या पिकाची बाग व्यापाऱ्याला केव्हा द्यायची, कोणती आंतरपिके घ्यायची, कोणत्या जातीचे बियाणे घ्यायचे यांचे गणित करून त्यातून नफा मिळवला जातो. याशिवाय बाजाराचा सातत्याने वेध घेऊन जादा दर देणाऱ्याला माल विकला जातो.  
रौंदळे कुटुंबीय मजुरांवर अवलंबून न राहता आपल्या शेतात स्वत: राबतात. त्यांच्या दोन ट्रॅक्टर्सच्या मदतीने वेळेचे योग्य व्यवस्थापन करून बरीचशी कामे उरकली जातात. रौंदळे कुटुंबीयांनी एकजुटीने, सामूहिकरीत्या योग्य व्यवस्थापन करून शेती १३३ एकरांपर्यंत वाढवली आणि शेतीतून नफा होतो, हे सप्रमाण दाखवून दिले.
– चारुशीला जुईकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  -पाश्चिमात्य देशातले वैज्ञानिक / आचार्य
गेल्या हजारएक वर्षांत आपण किती मागासलेले होतो/आहोत याचा शोध घ्यायचा असेल तर कोठल्यातरी वाचनालयात जाऊन एक Enclopaedia नावाची चीज असते ती डोळ्याखालून घालावी.
मी हे पुस्तक १९७२ साली साठ डॉलरला विकत घेतले. अर्थात ते पुस्तक सेकंड हँड होते. आणि प्रसिद्ध झाले होते १९६७ साली. मूळ पुस्तक १७६९ मधले. त्यानंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. माझ्याकडच्या A-Anstey  या पहिल्या खंडात ज्या नोंदी आहेत त्यातल्या पन्नास टक्क्यांहून अधिक नोंदी निखळ विज्ञान किंवा वैज्ञानिकांबद्दल आहेत.
प्रपंचाचे ज्ञान ते विज्ञान असा निकष जर लावला तर भूगोल किंवा शेती  असले विषयही सामावतात आणि तसे केले तर मग जवळजवळ सत्तर टक्क्य़ांहून अधिक नोंदी वैज्ञानिक ठरवतात. शेती या विषयाखालच्या माहितीत वनस्पती शास्त्र, खत, संकर, हवामान, अर्थशास्त्र या नोंदीही विज्ञानातच मोडतात. त्या त्या विषयात प्रगती केलेल्या आचार्याची लांबलचकच यादी मग तयार होते.
ज्या नोंदी भौगोलिक गणल्या जाऊ शकतील त्यात कोणी किती हालअपेष्टा करत प्रवास केले. प्रवास करताना चढउताराचे नकाशे कसे काढले त्यासाठी कोणती सामग्री वापरली. एखादी नदी दिसली तर उगम कोठून होतो हे कसे शोधले याची विस्तृत वर्णने आहेत. आणि पाश्चिमात्यांनी हे अनेक खंडात केले. अक्षांश, रेखांश, समुद्रातले प्रवाह, त्यातले मासे, समुद्रातल्या वनस्पती प्रत्येकाचे निरीक्षण आणि मग लेखी नोंद असा त्यांचा दिनक्रम असे. अंटाक्र्टिकासारख्या प्रचंड आवाका असलेल्या जीवघेण्या थंडीने गारठलेल्या खंडाला यांनी प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. त्या साहसात अनेक बुडाले, मेले, काही बर्फावर तरंगत कोणीतरी वाचवेल अशा आशेने जगले. काही वाचले. इतरांची शवे कायमची नाहीशी झाली.
कल्पना करा ज्या काळात आपल्याकडे समुद्राला ओलांडणे म्हणजे भ्रष्ट होणे असे समजले जाई त्या वेळचा हा काळ आहे. प्रत्येक खंडावरचा कच्चा माल, मसाले, अन्न पदार्थ, वनस्पती त्यांनी स्वगृही नेल्या. त्याचा व्यवसाय केला. व्यवसाय करताना कच्च्याचा पक्का माल करण्यासाठी यंत्रे शोधली, ती वाफेवर चालवली, मग वीज वापरून आणखी सुधारली.
 विज्ञान बहरले ते अनेक दिशांनी आणि त्याचे हजारोंच्या संख्येत असलेले संशोधक आणि प्रवर्तक केवळ तळटीप एवढाच मागमूस ठेवत इतिहासात बुडून गेले.
त्या सर्वाची नक्कल करत आपण मोठे शहाणे असल्याचा आव आणणे सध्या चालू आहे..
 त्याबद्दल सोमवारच्या अंकात!
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ६
(२६) कृमी, जंत होणे- आरोग्यवर्धिनी, त्रिचूर्ण, करंजेलतेल पिचकारी (२७) क्रॉनिक किडनी विकार- गोक्षुरादि गुग्गुळ, चंद्रप्रभा, सूर्यक्षार, रसायनचूर्ण, साळीच्या लाह्य़ा (२८) खाज पित्तामुळे- त्रिफळाचूर्ण, शतधौतधृत, कामदुधा (२९) खाज कफामुळे- दमागोळी,  ज्वरांकुश, त्रिफळाचूर्ण, करंजेल, कापूर
(३०) खाज मधुमेहामुळे- आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, एकादितेल
(३१) खूप घाम फुटणे, घाम येऊन थकवा- कामदुधा, मौक्तिकभस्म (३२) खोकला अ‍ॅलर्जी, कोरडा खोकला- एलादिवटी, खदिरादिवटी, गुळण्या (३३) खोकला कफाचा,  क्षयाचा, फुफ्फुसाचे विकार प्लुरसी दमा- दमागोळी, ज्वरांकुश, खदिरादि, गुळण्या (३४) खोकला रक्त पडणे- एलादिवटी, मौक्तिकभस्म (३५) खांदा दुखणे, स्नायू जखडणे- गोक्षुरादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी म.ना.तेल (३६) गळवे, बेंड-  कामदुधा, त्रि.चूर्ण, शतधौतधृत,  दशांगलेप (३७) गिळावयास त्रास- कामदुधा, मौक्तिक भस्म (३८) घसा खवखवणे- कामदुधा, एलादिवटी, दमागोळी,  खदिरा दिवटी, त्रि.चूर्ण, गुळण्या (३९) चेहऱ्यास सूज, चेहरा टापसणे- आरोग्यवर्धिनी,  चंद्रप्रभा, गो. गुग्गुळ, रसायन चूर्ण (४०) छातीत दुखणे- मनातेलाचा हलका मसाज (४१) जखम साधी, पू असलेली- आरोग्यवर्धिनी, कामदुधा, एकादि तेल, शतधौतधृत, टाकणखार पोटीस (४२) जळवात- कामदुधा मौक्तिकभस्म, शतधौत धृत (४३) जुलाब, पटकी, कॉलरा,  डहाळ, हगवण- कुटजवटी, अमृतधारा, बिब्बा शेवते, संजीवनीवटी
(४४) झोप न येणे- शतधौतधृत कानशिले, कपाळ, तळहात, तळपायांना  चोळणे (४५) ठणका- सिंहनाद गुग्गुळ
(४६) डोकेदुखी- लघुसूतशेखर, आरोग्यवर्धिनी, त्रिफळाचूर्ण
४७) डोळे तळावणे, डोळे लाल होणे- कामदुधा, मौक्तिकभस्म, शतधौतधृत (४८) डोळे येणे- कामदुधा, बोरिक पावडरच्या पाण्याने धुणे (४९) तडस लागणे- प्रवाळपंचामृत        
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत- २१ डिसेंबर
१९३५ > ख्यातनाम बालसाहित्यिक दत्ता टोळ यांचा जन्म. बालसाहित्याची एकूण ७५ पुस्तके त्यांची प्रकाशित. ‘जादू संपली, गोडय़ा पाण्याचे बेट’ या कादंबऱ्या. ‘शाहू महाराज, म. फुले’ यांची चरित्रे, ‘शाळा नसलेला गाव’ ही एकांकिका, ‘एक मन एक रूप’ हे पुरस्कारप्राप्त पुस्तक याशिवाय प्रौढांसाठी ‘मुलगा पाहिजे’ ही एकांकिका आणि ‘एका वेडय़ाने एकदा’ हा कथासंग्रह प्रसिद्ध.
१९७९ > इतिहास संशोधक, चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचे निधन. त्यांनी लिहिलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या चरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार. फाटक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्टय़. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’ तसेच काही संतचरित्रे त्यांच्या नावावर आहेत.
१९९७ > तब्बल ५० वर्षे मराठी हृदयाच्या मनाला भावगीताचे वेड लावणारे भावगीतकार पी. सावळाराम यांचे निधन. कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे.
– संजय वझरेकर