हरितगृह म्हणजे बंदिस्त काचेचे पॉलिथिनचे घर. याचा उपयोग फळे, भाज्या, विविध फुलांची वेगाने वाढ करण्यासाठी होतो. सूर्यप्रकाश जेव्हा हरितगृहावर पडतो तेव्हा जंबूपार किरणे काचेबाहेर रोखली जातात आणि प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असणारी किरणे आत प्रवेश करतात. बंदिस्त असल्यामुळे हरितगृहामधील वातावरण उबदार राहते. या क्रियेमध्ये कर्बवायूचा फार मोठा सहभाग असतो. बाहेरच्या मोकळ्या सुदृढ वातावरणामध्ये कर्बवायूचे प्रमाण ०.०३ टक्के म्हणजे कोरडय़ा हवेच्या ३०० दशलक्ष भाग अर्थातच ३०० पीपीएम असते. हरितगृहात मात्र हेच प्रमाण ४०० पीपीएमच्या पुढेही जाऊ शकते. कर्बवायूचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे उष्णता शोषून घेणे. हरितगृहामधील वनस्पतीच्या श्वसनामधून बाहेर पडलेला कर्बवायू या क्रियेत सहभागी होतो आणि आतील वातावरण उबदार होते. सूर्यप्रकाशात उभ्या असलेल्या बंदिस्त चारचाकी वाहनात किंवा आपल्या घरामधील बंदिस्त खोलीतही आपणास हरितगृहाची संकल्पना अनेक वेळा अनुभवण्यास मिळते.

वातावरणामधील ३०० पीपीएम कर्बवायू स्थिर असेल तर पर्यावरण सुदृढ राहते आणि यास स्थिर ठेवण्यासाठी पृथ्वीच्या भूपृष्ठावर मुबलक वृक्षसंख्या असणे गरजेचे असते.

वृक्षसंख्या कमी झाली आणि मनुष्यप्राण्यांची संख्या वाढू लागली की त्यांच्या श्वसनामधून बाहेर पडणारा कर्बवायू वातावरणात साठू लागतो, त्याचबरोबर ज्वालामुखी, वणवे यासारख्या नैसर्गिक घटना, शहरीकरण, औद्योगिक विकासही कर्बवायू वाढवण्यामध्ये मोठा हातभार लावत असतात. हवेमधील सीमित मर्यादा असलेला कर्बवायू जेव्हा मर्यादा ओलांडून मोठय़ा प्रमाणात वातावरणामध्ये साठू लागतो तेव्हा त्याची उष्णता ग्रहण करण्याची क्षमताही वेगाने वाढू लागते आणि वातावरण प्रमाणापेक्षा जास्त उबदार होऊ लागते. हे बिघडलेल्या पर्यावरणाचे प्राथमिक लक्षण आहे.

हवेमधील कर्बवायूचे प्रमाण ०.०३ टक्के सीमित ठेवण्यासाठी नियंत्रित विकास प्रक्रियेबरोबरच मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करणेही आवश्यक आहे. सध्याच्या वातावरण बदलास आणि चढत्या स्तरावरील उष्णतेस वातावरणात सतत वाढत असलेला कर्बवायू जास्त जबाबदार आहे. नैसर्गिक ठिकाणी असलेला बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, नद्यांना येणारे पूर या सर्व घटनाक्रमामागे हवेमध्ये वाढणारा कर्बवायू जबाबदार आहे, म्हणूनच आपण प्रत्येकाने हा कर्बवायू कसा नियंत्रणाखाली राहू शकेल यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

– डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org