भूगर्भातील पाणी घेऊ शकणारे बहुवर्षीय वृक्ष दुष्काळातसुद्धा तग धरू शकतात. वृक्षलागवडीचा आणखी एक फायदा असा की, तीमध्ये दरवर्षी नांगरट, पेरणी आणि निंदणी यांसारखी मशागतीची कामे करावी लागत नाहीत. खरेदीची हमी आणि चांगला भाव या दोन्ही दृष्टिकोनांतून अखाद्य तेल देणाऱ्या वृक्षांची लागवड योग्य वाटते. साबण, बायोडिझेल, मेदाम्ले आदी पदार्थाच्या निर्मितीसाठी आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात वनस्पतिजन्य अखाद्य तेल वापरले जाते. सध्या तर त्याची टंचाईच आहे. अखाद्य तेल देणाऱ्या वृक्षांची लागवड हा काही नवा विचार नाही. हल्ली मोठय़ा प्रमाणावर केली जाणारी जट्रोफाची लागवड हे याचेच उदाहरण आहे.
मात्र जट्रोफात असणारा एक मोठा दोष आहे कमी उत्पन्नाचा. आपल्या देशी वृक्षांमध्ये आनुवांशिक गुणधर्माचे जे वैविध्य आढळते, ते जट्रोफात आढळत नाही. त्यामुळे जट्रोफाचे उत्पन्न वाढविणे अवघड आहे. आपल्या देशातल्या वृक्षजातींचा पद्धतशीर अभ्यास आणि सर्वेक्षण केल्यास त्यातून अधिक उत्पन्न देणारे वृक्ष नक्कीच निवडता येतील. बोर, करवंद, जांभूळ, आंबा आदी देशी फळांच्या सुधारित आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती याच पद्धतीने निर्माण केल्या गेल्या. अशा निवडक वृक्षांचे गुणन कलमांद्वारे केल्यास निवडलेल्या मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म अबाधित तर राहतातच, पण कलमांचा आणखी एक फायदा असा की, कलमांद्वारे वाढवलेल्या वनस्पतींना एक-दोन वर्षांतच फळेही येऊ लागतात, मानवी अन्नधान्यांचा विचार केल्यास असे दिसेल की तूर आणि कपाशी यांची बहुवर्षीय वाणे तर आजही लावली जातात, पण काही नवीन वृक्षजातींचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करावयाचा असेल तर आपल्याला आपल्या आहारात काही नव्या खाद्यपदार्थाना जागा करून द्यावी लागेल. उदा. आपण फणसाच्या आठळीच्या पिठाची भाकरी करू शकतो. यासाठी भाकरी करण्यास सुयोग्य आणि आठळ्यांचे भरपूर उत्पन्न देतील अशी फणसाची नवी वाणे निर्माण करणे ही काही अशक्य कोटीतली बाब नाही.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  : ‘एन्सीसी’
मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी ‘एन्सीसी’ हा प्रयोग करून पाहिला. त्या काळात भूदल (आर्मी) ‘एन्सीसी’ असते ते माहीत होते; परंतु आरमार किंवा नौदलाची ‘एन्सीसी’ असते हे ठाऊक नव्हते. यावरही कडी म्हणून की काय आरमारी वैद्यकीय ‘एन्सीसी’ची तुकडी निर्माण करण्याचे घाटले आणि भरतीसाठी त्यांचा एक अधिकारी कॉलेजमध्ये आला. ‘अभ्यास सोडून इतर काहीही सांगा’ असा मी त्या रांगते उभे राहिलो. उंची आणि छाती मोजण्यात आली आणि मी भरती झाल्याचे जाहीर झाले. ‘मला पोहता येते’ अशी पुस्ती मी जोडली तेव्हा ‘त्याची गरज नाही’ असे मला सांगण्यात आले. तेव्हा कळले की, बोटीवर नोकरी मिळविण्यासाठी ‘पोहणे’ ही गोष्ट ऐच्छिक असते, आवश्यक नसते. पाण्यावर राहायचे आणि पोहता येत नाही हे जरा विलक्षणच. या ‘एन्सीसी’ने माझा लवकरच भ्रमनिरास केला.
इस्त्रीचे कपडे आणि जाडजूड जोडे वगैरे ठीक आहे; परंतु त्यातली शिस्त मला फारच भारी गेली. दुसऱ्याच्या हुकमानुसार जगणे, कवायत करणे, सारखे सलाम ठोकणे, कोठलीही शंका किंवा प्रश्न न विचारणे, कवायतीच्या आधी कधी कधी तासन्तास अंगामागे हात धरून उभे राहणे, झोपून उठल्यावर कँपमधल्या तंबूत आपला बाडबिस्तरा सुरकुतीही नाही, अशा तऱ्हेने व्यवस्थित पद्धतीने साहेबांच्या निरीक्षणासाठी लावणे वगैरे गोष्टी मला जमणार नाहीत हे लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यातल्या त्यात लोणावळ्याला आयएनएस शिवाजीमध्ये कँप लागणार होता. तेव्हा मी कुतूहलाने टिकून राहिलो. लोणावळ्याच्या (आयएनएस शिवाजी) कँपमध्ये रू ट मार्च झाला. त्यात २० मैल चालणे झाले. आमच्यातले धडधाकट पाठीवरची पिशवी, पायातले जाड जोडे, पायवाटेवरचे खड्डे, गवतातले कीटक, अरण्यातली काटेरी झुडपे, रणरणते ऊन या संकटांमुळे हळूहळू गळले, थांबले किंवा पांगले. एका सरळ रेषेत मजल दरमजल सुरू करणारी आमची तुकडी विस्कळीत झाली आणि शिस्त संपली म्हणताच माझ्यातला हडकुळा जागा झाला आणि निर्धाराने चालू लागला. अर्धेअधिक लोक सुस्थितीत शेवटपर्यंत पोहोचले. काहींना आणण्यासाठी गाडय़ा पाठवाव्या लागल्या. कँपवर परत आल्यानंतर आंघोळी झाल्या व जेवणाआधी मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने बोलावले. त्याने मला समोर बसविले. मला एक थंड बीअरचा ग्लास पाजला आणि म्हणाला, ‘तू तंदरुस्त आहेस, पण ही लष्करी हडेलहप्पी तुला जमणार नाही, किंबहुना तुला कुठली नोकरीही करता येणार नाही.’
हल्ली मुलामुलींना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी पालक पैसे मोजतात असे ऐकतो. ५०-५५ वर्षांपूर्वी मला हे मार्गदर्शन आणि एक बीअर फुकट मिळाली, पण त्यासाठी आधी ‘एन्सीसी’त जावे लागले.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : एचआयव्ही – एड्स : आयुर्वेदीय विचार : भाग ३
आयुर्वेदीय शास्त्रकारांनी मानवी शरीरात ‘ओज’ या घटकाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. क्रोध, क्षुधा, चिंता, क्षोभ, श्रम इत्यादी कारणांनी ओजाचा अकाली क्षय होतो. असा माणूस भित्रा, दुर्बल, चिंतामग्न होतो. शरीर रुक्ष व कृश होते. इंद्रियांना व्यथा होते. अशा अवस्थेत आयुर्वेद दूध, मांस रस, पुष्टीदायक जीवनीय औषधांचा वापर करावा असा सांगावा देतो. आयुर्वेदीय उपचारांचे समस्त रोगांकरिता दोन भाग असतात. रोगाचे मूळ कारण दूर करणे व लक्षणांनुरूप औषधे देणे; सल्लामसलत देणे. आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे शोष हा विकार क्षय-टी. बी. सारखाच आहे. क्षय तीन प्रकारचा असतो. त्रिरूप, षड्रूप, एकादश रूप. अशा क्षय प्रकारात विविध लक्षणे असतात. एड्स विकारातही सामान्यपणे ताप, जुलाब, वजन घटणे, मूत्रेंद्रियावर फोड येणे, रक्ताल्पता, नैराश्य अशी लक्षणे असतात.
पुणे महानगरपालिकेतर्फे डॉ. कोटणीस दवाखाना, शुक्रवार पेठ येथील बाह्य़रुग्ण विभागात मला त्यांच्या डॉक्टरांनी एड्सग्रस्त रुग्णांकरिता, आयुर्वेदीय उपचार करण्याची संधी १९९२ साली दिली. गेली २१ वर्षे दर शुक्रवारी अशा रुग्णांना लक्षणांनुरूप औषधे देतो; पथ्यापथ्य सांगतो. खूप शुक्रक्षय झालेल्यांना काही काळ केवळ गोदुग्धावर ठेवले. च्यवनप्राश दिला. ज्यांची कामेच्छा खूपच, त्यांना कडूनिंबाच्या पानांचा रस ताजा देण्याची व्यवस्था केली. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती पुन्हा मिळावी म्हणून गोदुग्ध मदत करते; याबद्दल आहार शास्त्रात दुमत नाही. गोदुग्धामुळे फाजील वजन न वाढता, शरीरात उत्तम जोम निर्माण होतो.
पुणे शहराच्या गाडीखाना भागातील एचआयव्हीग्रस्त रुग्णांना; पांडुताकरिता चंद्रप्रभा, लघुसूतशेखर; सर्दी-कफकरिता ज्वरांकुश, दमागोळी, लवंगादि, लघुमालिनी; जुलाबाकरिता कुटजवटी, संजीवनी; मूत्रेंद्रिय विकाराकरिता चंदनादी, चंदनगंधादि अशी विविध औषधे नि:शुल्क देतो. ही संधी देणाऱ्या पुणे म.न.पा. आरोग्य विभागाला शतश: धन्यवाद!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २२ मार्च
१८५७ > कोल्हापुरात स्वतचा टाइपांचा कारखाना (विद्याविलास फाउंड्री) काढणारे आणि ‘तत्त्वप्रकाश’ व ‘विद्याविलास’ ही मासिके स्वतच्या लेखनानिशी संपादित करणारे शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले यांचा जन्म. पुण्यातून त्यांनी वैद्यक पदवी संपादन केली होती, पण दवाखाना न चालवता लेखनच केले.
१८७७ > ‘श्रीमद्दयानंद’ हे महर्षी दयानंद सरस्वतींचे चरित्र, ‘नवयुगधर्ममाला’ या मालिकेसह धर्मविषयक पुस्तके तसेच ‘परलोकाच्या दिवंगतांचे संवाद’ अशी पुस्तके लिहिणारे सदाशिव कृष्ण फडके यांचा जन्म.
१९२४ > दिवा जळू दे सारी रात, चांदणे शिंपीत जा, अपराध मीच केला, ही श्रींची इच्छा आदी गाजलेली नाटके तसेच ‘अखेर जमलं’, ‘आलिया भोगासी’ आदी ७५ चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे मधुसूदन कालेलकर यांचा जन्म.
१९२८ > महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या त्रमासिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित झाला.
१९८८ > विदर्भातील जुन्या पिढीतील कवी नारायण माधव सरपतवार यांचे निधन. ‘पदादी’ हा त्यांचा काव्यसंग्रह गाजला, त्यानंतर त्यांच्या कवितांचा ‘घराचे लेणे’ हाही संग्रह निघाला.
– संजय वझरेकर