आफ्रिकेतील युगांडा या देशात १९९९मध्ये बुरशीचा नवाच वाण उदयास आला. या कवकाचे शास्त्रीय नाव पुसिनिया स्ट्रीफोरमिस, परंतु ती ‘यूजी९९’ अशा नावाने ओळखली जाते. या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाला ‘पट्टीदार गंज’ (स्ट्राइप रस्ट) असे नाव आहे. ही बुरशी रोपाच्या प्रजनन प्रक्रियेत बाधा आणून त्याचे नुकसान करत असते, असे संशोधकांना आढळले आहे. गव्हासोबतच ही बुरशी अन्य कुठल्या पिकावर घाला घालत नाही ना, याचाही मागोवा शास्त्रज्ञ घेत आहेत. या बुरशीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन अन्नधान्याचा दुष्काळ पडू शकतो. आतापर्यंत उपलब्ध असलेली कीटकनाशके या बुरशीबाबत निष्प्रभ ठरली आहेत. ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्रज्ञ तेथील ‘ग्रेन रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या मदतीने यूजी९९ विषाणूंना थारा न देणाऱ्या जनुकांच्या शोधात आहेत.
 जगभर विविध प्रकल्पांद्वारे याविषयी संशोधन सुरू आहे. अशाच एका प्रकल्पाला बिल आणि मेलिन्दा गेट्स फाऊंडेशनने २.६ कोटी डॉलर्स दान केले आहेत. परंतु अर्थतज्ज्ञांच्या मते, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दरवर्षी पाच कोटी डॉलरची गरज आहे. अमेरिकेतील अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सव्‍‌र्हिसचे तज्ज्ञ आपल्या देशातील गव्हाचे विविध वाण आफ्रिकेतील निरनिराळ्या देशांत पाठवून त्यांचा यूजी९९ पुढे टिकाव लागतो का, याचा आढावा घेत आहेत.
अमेरिकेच्या शेतकी खात्यामधील शास्त्रज्ञांनी याबाबत आशादायक शोध लावलेला असून, त्यांनी गव्हाच्या फांद्या आणि पानावर मुक्काम ठोकणाऱ्या बुरशीचे वाण हुडकून काढले आहेत. ही कवके यजमानांच्या ऊतींवर ताव मारतात व विशिष्ट प्रथिने उत्सर्जति करून पिकांची रोगप्रतिकारकशक्ती दुबळी करतात. ही हानीकारक प्रथिने नाना तऱ्हेची असतात आणि त्यावर इलाज करणे खूप मुश्कील काम आहे, हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले आहे.
जगभर गव्हाचा साठा कमी होत असताना रोगराईचा हा आघात वेळीच पेलला नाही तर जगभरच्या अन्नतुटीची समस्या आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे.

वॉर अँड पीस : ऑटिझम  बालकांचा – कारणमीमांसा
काही आजारांची कारणे अनाकलनीय असली तरी प्रत्यक्षात अशा आजारांचा संबंध हा गर्भार मातेच्या आरोग्याशी असल्याचे दिसून आले आहे. एखादी  स्त्री गर्भवती असताना तिच्या शरीरातील यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याचा परिणाम तिच्या बाळावर होत असतो. ऑटिझम या अतिशय वेगळ्या आजाराचा संबंधदेखील गर्भवतीच्या आरोग्याशी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सकस आहारावर भर देण्याबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे, विशेषत: गर्भवती झाल्यावर नियमित तपासणी करणे गरजेचे झाले आहे. गर्भारपणात महिलेच्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य योग्यप्रकारे होत नसल्यास (स्त्राव कमी असल्यास) त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. परिणामी बाळाला ऑटिझम हा आजार होण्याची शक्यता वाढते हे संशोधनाअंती सिद्ध झाले. अमेरिकेच्या ह्य़ूस्टन मेथडिस्ट न्यूरॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट आणि नेदरलँडच्या इरॅस्मस मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी चार हजार माता व मुलांचा अभ्यास करून हे संशोधन केले.
बाळ पोटात असताना हे थायरॉईड बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. अन्नपदार्थात आयोडिनची कमतरता आढळल्यास थायरॉईड हार्मोन्स पुरेशा प्रमाणात स्रवत नाहीत. २००२ ते २००६ या काळात त्यांनी हजारो बालकांची तपासणी केली. ४०३९ मुलांमध्ये ८० मुले संभाव्य ऑटिस्टिक असल्याचे दिसून आले. गर्भवती महिला जेव्हा एखाद्या वैद्यकीय चिकित्सकांकडे आपल्या लहान-मोठय़ा शारीरिक तक्रारींबद्दल जाते, तेव्हा तिला संबंधित मॅटर्निटी होममधील, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जावे असे सुचविले जाते. गर्भिणी मातांनी कटाक्षाने पथ्यपाणी पाळावयास हवेच. गायनाकॉलॉजिस्टच्या सल्ल्याप्रमाणे थायरॉईड ग्रंथीची औषधे, शरीरातील लोह व चुना द्रव्यांच्या योग्य प्रमाणातील औषधांबरोबरच गर्भिणीचे सामान्य नियम पाळावे. चंद्रप्रभा, ब्राह्मीवटी, लघुसूतशेखर, आस्कंदचूर्ण, सारस्वतारिष्ट यांची मदत फलदायी ठरते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १ नोव्हेंबर
१९३२ > कवी, चित्रकार अरुण कोलटकर यांचा जन्म. लघु अनियतकालिकांच्या चळवळीशी जवळच्या आणि इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत काव्यलेखन करणाऱ्या कोलटकरांना मराठीत मर्ढेकरांनंतरचा महत्त्वाचा कवी मानावे लागेल, असे जाणकारांचे मत आहे. कवितेने काय सांगायचे, कविता कशासाठी असावी, याचे ठोकताळे बदलून टाकणारे काव्यलेखन कोलटकरांनी केले. ‘अरुण कोलटकरांच्या कवितां’त शहरी भाषा त्यांनी थेट टॅक्सीवाल्याच्या हिंदीपर्यंत नेली; तर जेजुरी, चिरीमिरी या संग्रहांतील अनेक कवितांनी मराठी कवितेला लोकभाषेचा ताल-ठसका परत मिळवून दिला. भिजकी वही, अरुण कोलटकरांच्या चार कविता हे त्यांचे कवितासंग्रह आणि द्रोण हे दीर्घकाव्य मराठीत, तर काला घोडा पोएम्स, सर्पसत्र, जेजुरी, द बोट राइड आदी कवितासंग्रह इंग्रजीत आणि ‘द पुलिसमॅन’ हा रेखाचित्रसंग्रह खास ‘कोलटकरी विचारभाषे’त आहे.
१९४५ > अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. ऐसे कैसे झाले भोंदू, भ्रम आणि निरास, अंधश्रद्धा विनाशाय, मती भानामती, विचार तर कराल आदी त्यांची पुस्तके वाचनीय आहेत.  
संजय वझरेकर

जे देखे रवी..      वैद्यकक्षेत्रातली स्पर्धा
हा लेख एकाच वर्तमानपत्रातल्या तीन-चार पानांवर आधारलेला आहे. एका डॉक्टरने अशी जाहिरात केली आहे की तो जगातल्या दहा अव्वल प्लास्टिक सर्जन्सपैकी एक आहे. तो ज्या गोष्टी घडवतो त्या वाचून मला विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीची आठवण झाली. त्याने तो ‘स्टेम सेल्स’ वापरतो अशीही जाहिरात केली आहे. ‘स्टेम सेल्स’ म्हणजे मूळ पेशी (स्कंदपेशी) या पेशींमधून निसर्गाच्या रचनेनुसार निरनिराळय़ा प्रकारच्या पेशी तयार होतात, असे संशोधन आता झाले आहे. पण संशोधन होते ना होते तोच अनेकजण मी स्टेमसेल वापरतो अशी जाहिरात करत सर्व इंद्रियांना मी कसा पुनर्जन्म देतो, नाही तिथे केस कसे उगवू शकतो, चेहऱ्यावरचे खाचखळगे कसे भरू शकतो अशा जाहिराती देत सुटले आहेत.
अर्थात याला वैज्ञानिक पुरावा देण्यास ते बांधील नाहीत आणि म्हणूनच ही फसवणूक छुपी पण राजरोस आहे. आहाराव नियंत्रण नको, व्यायामाची गरज नाही, दिवसा एक गोळी खाऊन वजन कमी करा, ओटीपोट यंत्राच्या साह्याने सपाट करा, रुग्णालयात न जाता स्तन मोठे करा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या विशेष प्रकारचे किरण टाकून किंवा मलमांनी काही दिवसांतच नष्ट करा आणि तुम्ही अशीच आणखी गिऱ्हाइके आणलीत तर तीस-चाळीस टक्के सूट घ्या, अशा तऱ्हेच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हल्ली सुळसुळाट झाला आहे.
ओठ जाडे किंवा अरुंद करण्यासाठी, गालावर खळी पाडण्यासाठी, गोंदलेले काढण्यासाठी आणि नवे गोंदवून घेण्यासाठी, नाक सरळ करण्यासाठी किंवा तीक्ष्ण करण्यासाठी ज्या जाहिराती येतात त्यांत या शस्त्रक्रिया किंवा उपचार करणारे अज्ञात असतात. आणि बहुतेक वेळा अज्ञानी आणि लबाड दोन्ही असतात. त्यांचा अनुभव काय, त्यांनी कोठे प्रशिक्षण घेतले आहे, याचा काहीच थांगपत्ता नसतो. शिवाय वैज्ञानिक निबंध जे अधिकृत नियतकालिकांतून प्रसिद्ध होतात, आणि ज्यांतले निष्कर्ष मान्य करून विज्ञान पुढे चालते, त्यांचा आणि ह्या दुकानदारांचा सुतराम् संबंध नसतो. लोक जातात, पस्तावतात. सोडून देतात, हताश होता. एखाददुसरा वैयक्तिक फिर्याद करतो, परंतु या दुकानांच्या बालेकिल्ल्यावर वकिलांचा पहारा असतो. शेवटी तो किंवा ती कंटाळते आणि अक्कलखाती खर्च झाला असे म्हणून नाद सोडून देते.
या सगळय़ा दुकानांमुळे अधिकृत सर्जन मंडळींच्या व्यवसायावर गदा येते असा एक भ्रमही मग तयार होतो आणि कोठलातरी वैद्यकीय समूह यांच्या जाहिराती बंद करा किंवा आम्हाला जाहिरात करायला परवानगी द्या असा परिसंवाद घडवून आणतात. अशा एका परिसंवादाचा मी अध्यक्ष होतो त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com