फार मोठी गुंतवणूक न करताही द्राक्षावर प्रक्रिया करता येतात. एवढेच नव्हे तर हे व्यवसाय वर्षभरही चालू शकतात. कारण द्राक्षापासून बनवलेले मनुके, बेदाणे वर्षभर उपलब्ध असतात.
द्राक्षापासून रस तयार करून त्याची बाटलीतून विक्री केल्यास लोकांना एक आरोग्यदायी पेय उपलब्ध होऊ शकते. अर्थातच हा व्यवसाय किफायतशीर ठरू शकतो. फेसाळत्या रसाकडे तर ग्राहकांची पावले लवकर वळतात. त्यामध्ये कार्बनडाय ऑक्साइड वायू विरघळलेला असतो. द्राक्षापासून वाइन, आसवे, आरिष्टे तयार करण्याचा उद्योग तर मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
नेहमीची द्राक्षे वापरून द्राक्षासव तयार करता येते. कफ, खोकला यावर औषध म्हणून तसेच भूक वाढवण्यासाठी, अन्नपचन होण्यासाठी, शरीरातील रक्तवाढीसाठी द्राक्षासव उपयोगी पडते. मनुका, बेदाण्यापासून केलेल्या आसवाला द्राक्षारिष्ट म्हणतात. द्राक्षापासून स्क्व्ॉॅश, जाम हे पदार्थही तयार करता येतात. द्राक्षापासून बेदाणे बनवण्याचा उद्योग चांगलाच स्थिरावला आहे.
 द्राक्षाप्रमाणेच प्रक्रिया करता येण्याजोगे दुसरे एक फळ आहे आवळा. आवळ्याचा रस आरोग्यासाठी उपयुक्त असतो. आवळ्यापासून कॅण्डीही बनवता येते. आवळा तोडल्यावर मीठ घातलेल्या पाण्यात व नंतर तुरटीच्या पाण्यात भिजवून आवळ्याच्या पाकळ्या होईपर्यंत पाण्यात उकळायचा. त्यातील बिया बाजूला काढायच्या. पाकळ्या सुटय़ा करून एक दिवस उन्हात सुकवायच्या. दुसऱ्या दिवशी साखरेच्या पाण्यात भिजत घालायच्या. प्रक्रिया केलेल्या फोडी वेगळ्या करून पाण्याने धुऊन उन्हात चांगल्या सुकवून त्यांचे पॅकिंग करायचे. अनेक गृहोद्योग हा व्यवसाय आज करीत आहेत.
सूर्यप्रकाशात वाळवलेल्या कच्च्या आवळ्याची भुकटी आणि हिरडा, बेहडा, दालचिनी, ओवा, लवंग, वेलची, ज्येष्ठमध, जिरे, तुळस, गवती चहा एकत्र केले की आवळ्याचा चहा हे उत्साहवर्धक पेय तयार होते. खाद्यपदार्थाच्या प्रदर्शनांमध्ये या आरोग्यवर्धक चहाची विक्री किफायतशीर ठरते.
 कच्चे आवळे तोडून त्याचे बारीक तुकडे करून मीठ व तुरटीच्या पाण्यात एक दिवस भिजवून त्याला िशदीलोण, पांदेलोण लावून सुकवले की आवळा सुपारी हा सर्रास वापरला जाणारा मुखवास तयार होतो.

वॉर अँड पीस: कोलेस्टेरॉल, हृदयरोग, मधुमेह
‘अरे, पंप्या गेला, काय ऐकतो मी? कालपरवापर्यंत तर आम्ही रोज चौकात वडापाव खात होतो. अचानक काय झाले? अशा गप्पा अधूनमधून कानावर येतात.  फास्ट सव्‍‌र्हिसने वर गेलेली अनेकानेक तरुण, मध्यमवयाची मंडळी लठ्ठ असतातच, त्यांना मधुमेह, रक्तदाब याची खूप लवकर लागण झालेली असते. अनुवांशिकतेचा वारसा मिळालेला असतो. या मंडळींच्या हृदयावर वाढलेल्या चरबीच्या थरांचे प्रेशर येत असते. हृदय हळूहळू चपटे होत असते. हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यांत चरबीच्या गाठी वाढत असतात. हातापायांना मुंग्या येत असतात. एखाददुसरा जिना चढायलाही शरीर नकार देत असते. मलप्रवृत्ती चिकट, घाण वास, मूत्रप्रवृत्ती कष्टाने, दरुगधीयुक्त, हातापायांवर, चेहऱ्यावर वाढती सूज सहज लक्षात येत असते. वरील काही किंवा सर्व लक्षणे दिसत असूनही रुग्ण जागा होत नाही. त्यामुळेच मग ‘पंप्या’ ऐन तरुणपणी वर जातो.
दिवसेंदिवस भारतात मधुमेही रुग्णांची संख्या भूमिती श्रेणीने वाढत आहे. पूर्वी  माणसे तुलनेने साधी राहणी, भरपूर कष्ट करणारी अशी होती. आहारात प्रामुख्याने ज्वारीच, सणासुदीलाच गोडधोड. आता बहुसंख्य मंडळी नेहमी गोडधोड खातात. संधी मिळाली तर दुपारी झोपतात. लहानसहान कामांनाही कामवाली वा गडी ठेवतात.
माझ्याकडे विशेषकरून मुंबईत मधुमेह, स्थौल्यग्रस्त, कोलेस्टेरॉल वाढलेली मंडळी ईसीजी, लिपिड प्रोफाईल, स्ट्रेसटेस्ट, रक्तशर्करा तपासण्यांच्या फायली घेऊन येतात. या मंडळींना पैसे फेकून आरोग्य हवे असते. त्यांना पथ्य पाळायचे नसते. त्यांना मी तत्काळ फ्रीज विकायचा सल्ला देतो. त्यामुळे घरात अधिक प्राणवायू खेळतो. शेजारच्या तीन घरांत अनुक्रमे कमरेत वाकून फरशी पुसणे, धुणी-भांडी अशी कामे फुकटात करण्याचा सल्ला देतो. औषधे खूप आहेत. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेह, सुवर्णमाक्षिकादि, आम्लपित्तवटी, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, रसायनचूर्ण, मधुमेहकाढा यातील नेमकी औषधे निवडावी. ‘चालेल तो वाचेल, दुपारी झोपेल तो संपेल.’ संयमसे स्वास्थ्य!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. कर्माचा ओघ आणि चौकट
‘इतक्या हौशीने थाटामाटात लग्न केले, पण पटले नाही आणि मोडले’ दोघांमध्येही दोष नाही, पण मूल होत नाहीत. बंगला, गाडी, ड्रायव्हर, चार इऌङ सदनिका अशी नोकरी होती, पण कंपनीच बंद पडली. पस्तिसाव्या वर्षी ॅट झाला, पण काय अवदसा आठवली कोणास ठाऊक आता विपस्यना करू लागला आहे, इतका उत्तम वडिलोपार्जित धंदा होता. यानेही वाढवला, पण सरकारची धोरणं बदलली आणि एकदमच डबघाई झाली. आई-बाप दोन्ही मूर्ख आणि नादानच होते, पण मुलांनी मात्र उत्तम केले. एक ना अनेक असे संवाद मी तुम्हाला ऐकवू शकतो ज्यामध्ये आपण आखलेली किंवा योजलेली आणि मग प्रयत्नांती तयार केलेली चौकट मोडते किंवा खिळखिळी होते. आयुष्याच्या एका विशिष्ट वेळी अर्जुनाची चौकट मोडली आहे तेव्हा त्याला ज्या ओव्या सांगण्यात आल्या आहेत त्यात ओघाबद्दल ओव्या आहेत. परंतु ‘अक्कल नाही काडीची आणि मला तत्त्वज्ञान शिकवतोस’ अशी तंबीही त्याला श्रीकृष्णाकडून मिळाली आहे. नंतर
सांग रे अर्जुना। तुझ्यामुळे झाली का। ही विश्वाची । रचना?।।
असा प्रश्न विचारून
हे विश्व अनादि आहे। हे काय खोटे। हे तरी। सांगावे।
.. असा उपरोधिक टोमणाही त्याला मारला जातो.  हे जे अनादि आहे। ते होते जाते स्वभावे। त्याच्यामधे शोक करावे। असे काही नाही।। .. अशा अर्थाची समजही पुढे देण्यात आली आहे. नंतर, जसे वाऱ्याने पाणी हलविले। आणि तरंगासारखे भासले। तिथे काय जन्मले। असे विचारून वाऱ्याचे स्फुरण संपले। आणि पाणी सपाट झाले। तिथे काय निमाले (म्हणजे मेले)। .. असा दुष्टांत देण्यात येतो. इथेच आसपास..  गंगा तुटत नाही उगमस्थळी। वाहते मध्यावरी। आणि शेवटी तिला भेटत राहतो। सागरही।। असे आयुष्याच्या प्रवाहाचे वर्णन आले आहे.
इथले वाहत्या पाण्याचा दृष्टांत त्यावर उठलेल्या तरंगाचे उदाहरण प्रत्येकाच्या आयुष्याला साजेसेच आहे. अर्जुनाच्या काय किंवा आपल्या काय भौतिक अवस्थेत बदल होत नसतीलही, पण मनातल्या क्षणागणिक येणाऱ्या ऊर्मी या शेवटी प्रवाह आणि लाटाच असतात. त्या आपल्या चौकटीत घडत असतात. असल्या अनेक चौकटींचा प्रवाह चालूच राहतो.
अर्जुनाच्या चौकटीत घडलेली हडबड सांगताना ‘जन्मांध माणसाला वेड लागल्यावर तो सैरभैर होतो तसा तू’ अशी एक कणभर नव्हे शेरभर कुरूप रचना ज्ञानेश्वर करतात’ त्याला मात्र माझा आक्षेप आहे.
अपंग आणि मनोविकृत लोकांबद्दल असे लिहिण्याचा हल्ली प्रघात नाही तेच योग्य आहे.
ज्ञानेश्वरांशी माझी दोनतीन भांडणे आहेत, त्यातले हे एक.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १२ नोव्हेंबर
१८८० > संघर्षशील कार्यकर्ते आणि तत्त्वचिंतक पांडुंरंग महादेव तथा ‘सेनापती’ बापट यांचा जन्म. मुळशी धरण सत्याग्रहासह अनेक लोकलढय़ांचे सेनापतित्व त्यांनी केले, तसेच संघर्षांचे तत्त्वचिंतन करणारे ‘चैतन्यगाथा’ हे पुस्तक लिहिले. योगी अरविंद घोष यांच्या दिव्यजीवन या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. निधनानंतर १० वर्षांनी, १९७७ साली त्यांच्या समग्र साहित्याचा ग्रंथ राज्य सरकारने प्रकाशित केला.
१९०४ > ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते  श्रीधर महादेव जोशी म्हणजेच ‘एस. एम.’ किंवा ‘एसेम’ जोशी यांचा जन्म.  १९४२, संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती, आदी चळवळींतील सक्रिय सहभागानंतर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले. ‘मी एसेम’ हे त्यांचे पुस्तक, मराठीतले एक महत्त्वाचे आत्मचरित्र ठरले. १९८९ साली त्यांचे निधन झाले.  
१९५९ > सत्यशोधक पत्रकार व कार्यकर्ते केशवराव जेधे यांचे निधन. शिवस्मारक व कैवारी ही साप्ताहिके, तर मजूर हे वृत्तपत्र त्यांनी चालविले. गणेशोत्सवाच्या ब्राह्मणीकरणाला शह देण्यासाठी त्यांनी काढलेल्या मेळय़ातील गीते आक्रमक शैलीतील होती. ‘देशाचे दुष्मन’ हे त्या वेळी (१९२५) वादग्रस्त ठरलेले पुस्तक त्यांनी लिहिले होते.
संजय वझरेकर