रासायनिक उद्योगांचा कच्चा माल म्हणजेच निसर्गाच्या रासायनिक कारखान्यांचा पक्का माल होय. जे निसर्गाने केलेले आहे त्याचा उपयोग करून मानवाने प्रगतीची नवीन पावले टाकली आहेत. निसर्गाने पृथ्वीवरच्या वायुमंडळाचे, भूमंडळाचे आणि जीवमंडळाचे आणि त्यामध्ये सातत्याने घडणाऱ्या क्रियांमधले संतुलन साधले आहे. या सर्व नसíगक क्रियांमध्ये जसे अनेक पदार्थ भाग घेतात तसेच अनेक नवीन पदार्थ निर्माण होतात. ते सर्व पदार्थ मानव स्वत:च्या बुद्धिकौशल्याने आणि गरजेप्रमाणे रासायनिक उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरतो.
रासायनिक उद्योगाच्या सर्व प्रकारच्या कच्च्या मालांचे विभाजन कार्बनी आणि अकार्बनी या मुख्यत: दोन भागांत होते. हवा आणि पाणी या अकार्बनी पदार्थाचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. हवेच्या घटक वायूंपकी रासायनिक उद्योगासाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचे असलेले घटक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरा नायट्रोजन.  नायट्रोजनचा सर्वात मोठा औद्योगिक उपयोग अमोनियाच्या निर्मितीत होतो. रासायनिक उद्योगांच्या दृष्टीने कच्च्या मालाइतकेच, किंबहुना त्याहूनही जास्त प्रमाणात विविध प्रकारच्या संस्करणांसाठी लागणारा एक पदार्थ म्हणून पाण्याला फारच महत्त्व आहे. अनेक रसायने पाण्यात विरघळतात, त्यामुळे त्याला ‘वैश्विक विद्रावक’ म्हणतात. साहजिकच अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये, विशेषत: मिश्रणातील घटकांचे विलगीकरण, रसायनांचे शुद्धीकरण, स्फटिकीकरण किंवा अर्क काढणे इ. कामांसाठी पाण्याव्यतिरिक्त फारच थोडय़ा पदार्थाचा वापर होतो. बहुतेक रासायनिक वा अन्य उद्योगांमध्ये जसे तापमान वाढविण्यासाठी मुख्यत: पाण्याच्या वाफेचा उपयोग होतो तसेच तापमान कमी करण्यासाठी शीतक म्हणून गार पाण्याचा वापर करतात. पाणी हा प्रवाही पदार्थ आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता करताना त्यामुळेच पाण्याला अग्रस्थान आहे. पाण्यात न विरघळणारे, पण भिन्न घनतेचे पदार्थ पाण्यात ढवळून वेगवेगळे करतात. जलविद्युत प्रकल्पामध्ये, खनिजांच्या उत्खननामध्ये व मोठय़ा आकाराच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी प्रचंड दाबाच्या पाण्याचा वापर केला जातो.  
अकार्बनी कच्च्या मालांमध्ये वरील पदार्थाबरोबर सल्फर, फॉस्फरस, क्लोरिन, चुनखडी आणि विविध खनिज पदार्थाचा समावेश होतो. कार्बनी कच्च्या मालांमध्ये पेट्रोलिअम पदार्थ, सजीव सृष्टी, दगडी कोळसा इत्यादींचा समावेश होतो.

मनमोराचा पिसारा: ऋतुसंहार- भाग १
महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला तोड नाही. ‘उपमा कालिदासाची’ असं म्हणताना त्यांच्या अद्वितीय सर्जनशील दृष्टीला आपण सलाम करतो.
थोर कवी आपल्या असामान्य कृतिशील अंत:स्फूर्तीच्या जोरावर काव्यामध्ये नवे उपमा-उत्प्रेक्षा-दृष्टांत असे अलंकाररूपी संकेत रूढ करतात. त्यामागून येणारे कवी आपापल्या मगदुराप्रमाणे कॉपी पेस्टचा जॉब करतात.
कालिदासांची महती अशी की, ते स्वत:हून निर्मिलेल्या संकेताचा भंग आपल्याच कवितेमध्ये करतात.
त्यांच्या प्रतिभेत विलक्षण लवचीकता होती. म्हणूनच ऋतुसंहारातील द्वितीय सर्गातल्या वर्षांऋतूच्या वर्णनात वैविध्य आढळतं.
कालिदास पहिल्या श्लोकात पर्जन्यराजाचं बहारदार वर्णन करतात. राजा कसला पृथ्वीवरचा तो अनभिषिक्त सम्राट जणू..
या ऋतुराजाचं आगमन राजेशाही असणार. श्लोकातील नायक आपल्या नायिकेला म्हणतो.. आकाशातले हे काळे ढग म्हणजे या राजाचे काळेकभिन्न अजस्र हत्ती आहेत.
या हत्तींपाठोपाठ येणारी पताकाही तितकीच लखलखीत आहे. कारण आकाशात कडाडणारी विद्युल्लता हीच त्याची फडकती निशाणी होय.
या राजाच्या आगमनार्थ झडणाऱ्या ललकाऱ्या आणि रणभेरी म्हणजे आकाशातला कडकडाट आहे.
या शक्तिशाली राजाच्या आगमनानं मात्र प्रियकर भयभीत झाले नाहीयेत बरं! प्रिये, उलट त्याच्या या गगनभेदी आगमनानं प्रियकर अधिक कामातुर झाले आहेत. अशा विलक्षण नयनरम्य प्रसंगी त्यांना त्यांच्या प्रेयसीची आठवण होते. कारण तिच्याशी आता लवकरच मीलन होईल असं त्यांना वाटतंय.
कालिदासानं इथे अत्यंत सुरेख विरोधाभास निर्माण केलाय. एकीकडे भयावह वाटावं असं वातावरण तर मनात मात्र प्रणयाचे गुलाबी रंग.
परंतु, ही फक्त आगमनाची वर्दी. प्रत्यक्ष पाऊस पडू लागल्यावर मात्र हा ऋतुराज आक्रमक होतो.
प्रणयोत्सुक प्रियकर मात्र अजूनही परदेशी आहेत.
आता मात्र हा ऋतू शत्रूसमान वाटतो. ढगांचा कडकडाट वज्रनादासारखा काणठळ्या बसवतो. लवलवती विद्युल्लता आता एखाद्या प्रत्यंचेसारखी भासते. आकाशात उभारलेल्या प्रचंड इंद्रधनूवरून हीच प्रत्यंचा पाऊसरूपी उग्र बाणांचा वर्षांव करते आहे. आता, हा ऋतू जणू काही परदेशस्थ प्रेमीजनांचा शत्रू झालाय. कालिदास अशा प्रियकर-प्रेयसीच्या मीलनाबद्दल काय म्हणतात ते उद्या पाहू.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
        
प्रबोधन पर्व: यशस्वी उद्योजक, कल्पक संपादक
शंकरराव किर्लोस्कर हे एक यशस्वी उद्योजक, यशस्वी व दूरदृष्टीचे संपादक म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत. १९२० ते १९६० या चाळीस वर्षांच्या कालखंडातील महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींशी त्यांचा जवळून संबंध आला. किर्लोस्कर, मनोहर आणि स्त्री या तीन नियतकालिकांच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात एक प्रकारचे कृतिशील योगदान दिले, असे म्हणावे लागेल.
शंकररावांनी पहिल्या महायुद्धात काही महिने प्रादेशिक सेनेत दाखल होऊन काम केले, किर्लोस्करवाडीच्या प्रारंभीच्या पिऱ्या मांगासारख्या दरोडेखोराला माणसाळवले. नाथ गोडबोले आणि चित्रे या तरुणांनी सायकलवरून जगप्रवास केल्यावर त्यांना त्या विषयी किर्लोस्करमध्ये शंकररावांनी लिहावयास सांगितले. सुरुवातीच्या सात-आठ वर्षांच्या काळात किर्लोस्कर कारखान्याचे विक्री व्यवस्थापक म्हणून त्यांनी नांगर, चरखा यांसारख्या वस्तूंची विक्री केली, तर १९४२च्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि १९४८ साली गांधीहत्येनंतर उफाळलेल्या दंगलींत किर्लोस्कर कारखाना आणि किर्लोस्करवाडी येथील कायदा आणि सुव्यवस्थेची अत्यंत जोखमीची कामगिरीही त्यांना पार पाडावी लागली.
औंध संस्थानातील ग्रामीण लोकशाहीच्या प्रयोगात एक लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यावर त्यांनी संस्थानाच्या खेडय़ापाडय़ांत िहडून ग्रामीण भागासाठी अनेक विकास योजना राबवल्या. डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे संस्थापकपद, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपद आणि कोयना धरण योजना परिषदेचे स्फूíतदाते म्हणून शंकररावांनी महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणातही हिरिरीने पुढाकार घेतला.
भारतासारख्या अविकसित देशात सामाजिकदृष्टय़ा जागरूक असणारा कारखानदार आणि संपादक हा अप्रत्यक्षरीत्या समाजसुधारकाची भूमिका पार पाडत असतो. त्यांच्या ‘शंवाकीय’ या आत्मचरित्रातून तत्कालीन महाराष्ट्राचा लेखाजोखाच वाचायला मिळतो. शंकरराव लिहितात-  ‘माझ्या दृष्टीने सत्तेचा किंवा अधिकाराचा उगम हा केवळ एखाद्या कायदेकानूतून किंवा आज्ञापत्रातून होत नाही. तो मुख्यत्वे होतो लोकांच्या स्वयंस्फूर्त मान्यतेमधून. नेत्याबद्दल किंवा वरिष्ठाबद्दल त्याच्या अनुयायांमध्ये किंवा हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये विश्वासाची व आदराची भावना असणे याला मी फार महत्त्व देतो. आपल्या सत्तेचा उगम अशा आदराच्या व विश्वासाच्या भावनेतच आहे.’