वर्ष संपताना वाचकांनी ‘कुतूहल’ला दिलेल्या प्रतिसादावर एक दृष्टिक्षेप..
डॉ. आनंद कर्वे यांच्या लेखांना मिळालेल्या अनेक प्रतिसादांपकी मुंबईच्या दीपक पेंटर यांच्या ई-पत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गोबर गॅसमधून शुद्ध मिथेन वेगळा केल्यावर उरलेला कार्बन डायॉक्साईड पाण्यात मिसळून पिकांना दिला तर पिके जोमाने वाढतील का?’ या दीपक पेंटर यांच्या शंकेतून विचाराला चालना मिळाली. जयंत साठे यांनी आपला बंद पडलेला बायोगॅस प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात डोकावल्याचे कळवले. हाँगकाँगमधील रहिवासी हृषीकेश कुलकर्णी यांनी भारतात परतले असता, कोकणातील आपल्या जमिनीवर शेतीप्रकल्प राबवण्याचे ठरवले.
वसईचे एक शेतकरी माल्कम कोलासो यांच्या शेतात गेल्या काही वर्षांत पीक फारच कमी प्रमाणात येते. सोलापूरचे कृषी अधिकारी डॉ. जनार्दन कदम यांच्या जमिनीच्या सुपीकतेविषयक लेखामुळे शेतजमिनीचे माती परीक्षण करून घेण्याचे कोलासो यांनी ठरवले.
प्राचीन भारतीय शेतीपद्धतीविषयी सुधा गोवारीकर यांच्या ‘वाल्मीकी अय्यंगार्या’ या लेखाने ‘कुणप’चा अर्थ, कुणपची निर्मिती, कुणपचा जमिनीवर, पिकांवर परिणाम याबद्दल ज्ञात करून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
मुंबईतील बोरिवलीच्या सुजाता मुणगेकर यांच्या परिसरातील सरकारी धान्य कोठारामुळे घरातील धान्यात जास्त किडे सापडतात. बीएआरसीमधील शास्त्रज्ञ डॉ. सुधा राव यांचा लेख वाचून लेखिकेशी ई-पत्र व्यवहार केल्यावर त्यांना आपली समस्या सोडवण्याविषयी मार्गदर्शन मिळाले.
साताऱ्याचे यशस्वी प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या पॉलीहाऊस शेतीविषयी प्रदीप म्हात्रे यांच्या लेखालाही अनेक प्रतिसाद मिळाले. सुनील मिराशी यांना फुलांची पॉलीहाऊस शेती करण्याची प्रेरणा मिळाली. जमिनीची खरेदी किंमत, पॉलीहाऊस शेतीचे प्रशिक्षण, त्याचा खर्च, कालावधी वगरे बारीकसारीक तपशील त्यांनी विचारले. निहाल बोभाटे या तरुण अभियंत्याने बोडके यांचा आदर्श ठेवून पॉलीहाऊस शेतीत पाऊल ठेवण्याचे ठरवले.
अनघा वक्टे यांचा ज्योती नंदर्षी या जळगावच्या यशस्वी महिला शेतकऱ्यावरील लेख दहिसरच्या श्रीमती कर्णिक यांच्या वाचनात आला. पुण्याजवळच्या आपल्या निम्म्या जमिनीत बाग फुलवण्याचा, तर उरलेल्या निम्म्या जमिनीत शेती पिकवण्याचा विचार असल्याचे त्यांनी कळवले. त्यासाठी कृषी संस्था, कृषी तज्ज्ञ, सल्लागार यांच्याविषयी माहिती विचारली.

वॉर अँड पीस: सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार भाग-४
९) खोकला- कफ – ‘तू माझ्यासमोर खोकू नकोस, तुझ्यामुळे मला खोकला होईल’, ‘तुझ्यामुळे मला सर्दी झालीये.’ अशी वाक्ये घरीदारी, ऑफिसात  नेहमीच ऐकावयास मिळतात. बहुधा प्रथम सर्दी मग कफ आणि नंतर खोकला हे ‘त्रिमूर्ती सोबती’ विकार व्हायला कुपथ्यच करावे लागते असे नाही. प्रदूषण, कचरा, बाहेरचे खाणेपिणे, पंखा, फ्रीज, एसी यांचा अनावश्यक वापर अशा विविध कारणांनी प्रथम नाकावर प्रदूषणाचा हल्ला होतो. ‘नासा हि शिरसो द्वारम्’ या वचनाप्रमाणे बाहेरचे हवेतील अतिसूक्ष्म कणसुद्धा तुमच्या-आमच्या नकळत, दोन्ही नाकपुडय़ात घुसतात, तेथून कपाळपट्टीमधल्या अत्यंत सूक्ष्मसूक्ष्म पट्टांमध्ये ठाण मांडून बसतात. डॉक्टरांना दाखवल्यावर ते सायनोसायटिस असे लांबलचक नाव सांगतात. नाकात टाकायला ड्रॉप्स देतात. तुम्ही आम्ही सर्दी, कफ, खोकला हे आपल्या पाचवीला पुजलेले आहेत असे धरून तात्पुरते सावध होतो, पण दीर्घकालीन उपाययोजना करत नाही. ज्यांना हे प्रदूषणाचे विकार नेहमीकरिता टाळायचे आहेत त्यांनी पुढील उपचारांची मदत घ्यावी.
१) दीर्घश्वसन- प्राणायाम, २) मीठ हळद- गरम पाण्याच्या गुळण्या. ३) नाकावर वेखंड गंधाचा दाट गरम लेप. ४) चांगल्या दर्जाच्या काळ्या मनुका २५-३० चावून खाणे. ५) पंख्यापासून लांब राहणे. ६) रस्त्यावर, उघडय़ावर धूळ-कचरा असल्यास मफलर, हातरुमाल यांची मदत घेणे. ७) तुळस, पुदीना, आले, लसूण यांची चटणी व तुळशीची दहा पाने चावून खाणे. ८) नाकात टाकण्याकरिता तेल किंवा घरगुती तुपाचा सुयोग्य वापर करणे.
 खोकल्याकडे दुर्लक्ष झाले, की दमा, धाप, ब्रॉन्कायटिस व शेवटी राजयक्ष्मा अशी धास्ती असते. तुम्हा-आम्हाला प्रदूषण टाळता येत नाही, हे सर्व लक्षात घेऊन वरील ‘अष्टावधानी’, प्रिव्हेंटिव्ह उपाय करावेच; जोडीला एलादिवटी, वासापाक, कफमिक्चर, खोकला काढा, खोकलाचूर्ण, नागरादीकषाय यातील एक-दोन औषदांची मदत घ्यावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      भाषा पुढे चालू..
धड ना इंग्रजी, धड ना हिंदी, धड ना मराठी अशी आजची आपली स्थिती आहे. इंग्रजीत ‘नो यार’ वगैरे पूर्वी होते, हल्ली त्याची जागा विष्ठा आणि मैथुन यांबद्दलच्या इंग्रजी शब्दांनी व्यापली आहे आणि हे शब्द मुलीही सुलभतेने वापरतात. कारण त्याशिवाय त्यांच्या समूहात त्यांना स्थान मिळत नाही. परवा एक मराठीभाषक घरातला मुलगा कोठे तरी सहलीला गेला. धडपडला. त्याच्या हनुवटीला खोक पडली आणि त्याला टाके पडले तेव्हा त्याला मी म्हटले, सोमवारी पहिली पट्टी बदलू. तेव्हा त्याने त्याच्या आईकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले. आई म्हणाली, Somwar means Monday. मग त्याला वार कळला.
गोदावरी उपाख्य दक्षिणेतली गंगा ब्रह्मगिरीच्या कडय़ातून उगम पावते. त्र्यंबकेश्वरला पहिल्यांदा दिसते. मग नाशिकमधून वाहते. पुढे नेवासे गावाजवळ प्रवरा आणि तिचा संगम आहे. यातील उगम आणि संगम हे शब्द किंवा एकूणच ते वर्णन आणि नेवासे या गावाचा संदर्भ इंग्रजीत भाषांतर केल्यावर कसे वठणार आहे याची कल्पनाच केलेली बरी. हल्ली लोक नाशिकला जातात ते तिथल्या दारूच्या बागाईतवजा कारखाना बघण्यासाठी आणि ही‘Week End Trip साठी. त्र्यंबकेश्वरला गेले तर त्यांच्या ऐहिक आयुष्याला काळसर्प योगाने वेढले असले तर त्याचे परिमार्जन करण्यासाठी. एका बाजूला असुरक्षिततेने वेढल्यामुळे अंधश्रद्धा आणि दुसरीकडे धांदल आणि मौजमजा असे आजचे आपले सध्याचे स्वरूप आहे.
 हिंदीची तर लज्जास्पद स्थिती आहे. बंबैया हिंदी नावाची एक भयानक भाषा सध्या सिद्ध आहे. यात इंग्रजी शब्द घुसडले की हिंदी चित्रपटांची भाषा तयार होते. एक-दोन गमती सांगतो. एकदा अहमदाबादला मी परीक्षक म्हणून गेलो होतो. प्रात्यक्षिकाच्या वेळी एक मुसलमान तरुण विद्यार्थी उत्तरे देताना अडखळू लागला तेव्हा त्याला मी म्हटले, गुजराथीत बोल. तेव्हा त्याने जी बिनतोड उत्तरे देत काय शस्त्रक्रिया कशी करायला हवी हे सांगितले, ते ऐकून मी त्याला नव्वद टक्के गुण दिले. माझे थोडे शिक्षण गुजराथीत झाले. एका ठिकाणी मला माझ्या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी बोलावले होते. मी गुजराथीत बोलायला सुरुवात केल्यावर सभागृहात चुळबुळ सुरू झाली. एक उठला आणि म्हणाला, ‘आम्हाला इंग्रजी समजते.’ तेव्हा मी म्हणालो, ‘पण मला गुजराथी येते त्याचे काय?’ समजूत अशी की, मी ह्यांना खेडवळ समजतो आहे. याला भाषिक न्यूनगंड म्हणतात. इंग्रजीत शिक्षण घेतले की चांगले इंग्रजी येते आणि मातृभाषेत शिक्षण घेतले की विज्ञान रुजत नाही ही दोन्ही विधाने धादांत खोटी आहेत. जगात जी वैज्ञानिक प्रगती झाली ती मातृभाषेच्या साहाय्याने आली आहे. आठवा, आपल्यात एक म्हण आहे की, मी काही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही. सोमवारी आभाराचा लेख.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत: २८ डिसेंबर
१८९९> कादंबरीकार, समीक्षक व ‘तरुण भारत’चे माजी संपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर (भाऊसाहेब) यांचा जन्म. आधुनिक कविपंचक (समीक्षा) मुक्तात्मा, शाप, डाकबंगला (कादंबऱ्या) हे त्यांचे ग्रंथ, तसेच  आत्मपर आणि व्यक्तिविषयक लेखांची पुस्तके प्रकाशित झाली.
१९०३> पोवाडेकार पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर यांचा जन्म. संभाजी महाराज, झाशीची राणी, स्वा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर त्यांनी रचलेले पोवाडे गाजले.
१९३६> कथा-कादंबरीकार वामन सदाशिव पात्रीकर यांचा जन्म. सखाराम शिंपी, कलंदर बिलंदर या बालनाटय़ांसह सूर्यविलाप हा एकांकिका संग्रह,जगबुडी  ही कादंबरी आणि किक  हा कथासंग्रह आदी पुस्तके त्यांची.
२०००> विचारवंत, तत्त्वचिंतक  व ‘नवभारत’ आणि ‘न्यू क्वेस्ट’ या मासिकांचे संपादक मेघश्याम पुंडलिक रेगे यांचे निधन. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, आकारिक तर्कशास्त्र तसेच तत्त्वज्ञानातील समस्या  या त्यांच्या पुस्तकांना पाश्चात्त्य ग्रंथांचा आधार होता, तर हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन आणि इहवाद आणि सर्वधर्मसमभाव , स्वातंत्र्य आणि न्याय ही त्यांच्या स्वतंत्र लेखनाची पुस्तके होत.
संजय वझरेकर