03 August 2020

News Flash

कुतूहल: शॉवरजेल आणि बबलबाथ

उन्हाळ्याच्या दिवसात घामाघूम होऊन घरी आल्यावर शॉवरखाली आंघोळ करून फ्रेश व्हावं किंवा दिवसभराच्या कामाचा शीण घालवण्यासाठी

| May 31, 2014 01:38 am

उन्हाळ्याच्या दिवसात घामाघूम होऊन घरी आल्यावर शॉवरखाली आंघोळ करून फ्रेश व्हावं किंवा दिवसभराच्या कामाचा शीण घालवण्यासाठी गरम पाण्याच्या टबमध्ये भरपूर साबणाच्या फेसात बसून राहावं, कल्पनाच खूप आनंददायी आहे ना? आता पाण्याची टंचाई असताना असं करणं अयोग्यच.
शॉवरबाथ आणि बबलबाथसाठी वेगवेगळे साबण उपलब्ध आहेत. या दोन्हीमध्ये असणारे बहुतेक घटक सारखेच असतात. शॉवरबाथसाठी शॉवरजेल किंवा शॉवरक्रीम वापरले जातात. साबणापेक्षा शॉवरजेल त्वचेसाठी सौम्य असतात. शॉवरजेलमधील ग्लिसरीन पाण्याला आकर्षून घेतं. त्यामुळे त्वचेमध्ये ओलसरपणा राहून त्वचा मऊ राहते. भरपूर फेस येण्यासाठी बबलबाथ आणि शॉवरजेलमध्ये कोकॅमाइड डाय इथॅनॉल अमाइन, सोडियम लॉरेल सल्फेट आणि सोडियम लाँरेथ सल्फेट या रसायनांचा वापर करतात. पाण्याचा पृष्ठभागीय ताण कमी करण्यासाठी सोडिअम कोकोअँफोअ‍ॅसिटेट, ट्रायसोडियम सल्फोसक्सिनेट यांसारखी रसायनं या उत्पादनांमध्ये वापरली जातात. सूक्ष्मजीवांपासून संरक्षण व्हावं, बबलबाथ आणि शॉवरजेल खराब होऊ नये म्हणून त्यात सोडियम बेंझोइटसारखी रसायनं घातली जातात. कठीण पाण्यात बायकाबरेनेट, सल्फेट यांसारख्या रसायनांमुळे साबणाला फेस कमी येतो. कठीण पाण्यात फेस येण्यासाठी पाण्याचा पृष्ठभागीय ताण कमी करणाऱ्या एकापेक्षा जास्त रसायनांचा वापर केला जातो. बबलबाथमध्ये सायट्रिक आम्ल वापरलं जातं. या आम्लाची काबरेनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि पाण्यात कार्बन डायऑक्साइड वायूचे बुडबुडे तयार होतात.
बबलबाथ घेताना शरीर खूप वेळ पाण्यात राहतं, त्यामुळे मृत त्वचा निघून जाऊन त्वचेची छिद्रं उघडी पडतात. या छिद्रांतून बबलबाथमधील रसायने त्वचेत जाऊन त्रास होऊ शकतो. बबलबाथनंतर लगेच सूर्यप्रकाशात जाऊ नये, त्यामुळे त्वचेला अपाय होऊ शकतो.
शॉवरबाथ आणि बबलबाथमध्ये पाणीसुद्धा असतं जे एक रसायनं आहे. शॉवरबाथ आणि बबलबाथचा आनंद घ्यायला हरकत नाही, पण पाणीटंचाईचा जरूर विचार करा.
 
मनमोराचा पिसारा: आत्मसमाधान नि प्रसन्नपणा शोधणाऱ्यांसाठी
हीलिंग म्हणजे उपचार अथवा ट्रीटमेंट एवढाच अर्थ होत नाही. आपण म्हणतो, जखम हील झाली म्हणजे बरी झाली. माझ्या शारीरिक अथवा मानसिक विकार-व्याधीवर ट्रीटमेंट करून घेतल्यामुळे मी ‘बरा’ म्हणजे नॉर्मल झालो. पूर्वी जसा आणि जितपत निरोगी होतो तसा परत झालो. मला वाटतं, वैद्यकीय ट्रीटमेंट अथवा उपचार तिथेच थांबतात. वैद्यकतज्ज्ञ म्हणून बिघडलेली शरीरक्रिया अथवा मोडलेला अवयव, दूषित नकोसा (टय़ूमर) आजार बरा केला, रोगी रोगमुक्त झाला म्हणजे पूर्वीसारखा झाला. म्हणजे डॉक्टरचं काम संपल!? हीलिंग ही प्रक्रिया त्यापलीकडची किंवा पुढची पायरी आहे. रोग-व्याधी-विकार, विकलांगता यांच्या पल्याड जीवन संपन्न करण्याची प्रक्रिया म्हणजे हीलिंग!
‘हील युअर लाइफ’ विषयावर कार्यशाळा घेताना, हील या शब्दापासून सुरुवात होते. या प्रक्रियेचे साथी ‘हील’ या शब्दाला वेगळा आयाम देतात. शरीर-मन या अद्वैतापलीकडे असलेल्या आत्मिक जीवनाशी हीलिंगची सांगड घालतात. हीलिंग म्हणजे चैतन्याच्या अनुभवानं मनात आणि शरीरातली नकारात्मक विचार आणि भावनांची जळमटं नष्ट करून सेंद्रिय होलिस्टिक ऑरगॅनिक अनुभवानं मन अधिक ताजंतवानं होत तेजस्वी होणं.. जणू काही शरीर आणि मनाची प्रतिकारशक्ती तेजतर्रार होते. मन केवळ निरोगी नाही तर सुदृढ आणि प्रसन्न होतं.
आज वैद्यकीय शास्त्र यांत्रिक (मेकॅनिकल-नॉन ऑरगॅनिक) पद्धतीनं चालवलं जातं. त्यातला ह्य़ुमन टच हरवलाय. म्हणून ‘हीलिंग’ची ट्रीटमेंट  अनिवार्य होत्येय.
ट्रीटमेंटसाठी डॉक्टर आणि आरोग्यव्यवस्था हवी. मग हीलिंग करता काय हवं? योग, ध्यानधारणा, आध्यात्मिक सत्संग, गुरू, भजन, प्रवचन, भक्ती, असे प्रश्न आपोआप उभे राहतात. यातील बऱ्याच प्रक्रिया आपल्याकडे सहज उपलब्ध झाल्या आहेत. परंतु या सर्व प्रक्रियांसाठी कोणावर अवलंबून राहावं लागतं. आपल्याला न पटणाऱ्या रिवाजांना स्वीकारावं लागतं. गुरूंना देवस्थानी ठेवावं लागतं. भजन, प्रवचन आणि सत्संगसारख्या घाऊक हीलिंगमध्ये सहभागी व्हावंसं वाटत नाही.
या आणि अशा समस्यांना उत्तर देण्याकरता बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. तुमचं घर, कार्यालय, लोकांचा गोतावळा सोडून विशेष स्थान महात्म्य प्राप्त झालेल्या ठिकाणी जायला नको. न समजलेल्या मंत्रांचे पुनरुच्चार करायला नको. इतकंच व्यक्ती अथवा संस्थेवरही अवलंबून राहायला नको.
आपल्याला ‘हील’ करणारी शक्ती आणखी कोणाकडून आपल्याकडे ट्रान्समीट होत नाही. ती आपल्यात, आपल्या मनात असते. गुरूकडून डाऊनलोड करावी लागत नाही.
‘हील’ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या मनाच्या डीएनएमध्ये स्वत:ला हील करण्याची, मनाला आणि शरीराला पुनर्जीवित करण्याची स्वाभाविक शक्ती असते. आपल्याला त्याची जाणीव व्हायला हवी आणि ती जाणीव टिकायला हवी. म्हणजे मनाच्या हीलिंग पॉवरचं ज्ञान हवं आणि त्या पॉवरचं उपयोजन करण्याचं भान हवं. अशा रीतीनं स्वत:मधल्या सामर्थ्यांचं सातत्यानं भान राखणं म्हणजे ‘माइण्डफुलनेस’.
या विषयाची अतिशय सोप्या, सरळ भाषेत प्रभावी ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचं नाव आहे- ‘द हीलिंग पॉवर ऑफ माइण्ड’. तुस्कु थोंडुप या तिबेटन बौद्ध भिक्खूनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. डॅनिएल ‘इमोशनल इंटेलिजन्स’ गोलमन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. भन्ते तुस्कु यांनी ध्यानधारणेची संकल्पना अक्षरश: डीकन्स्ट्रक्ट केली आहे. जेवताना, चालताना कार्यालयीन काम करताना स्वत:ला कसं हील करावं यावर भाष्य केलंय. पृथ्वी-आप-तेज-वायू नि आकाश ही पंचमहाभूते आपल्याला ऊर्जा देतात, ती कशी मिळवायची यावर चिंतन आणि प्रक्रिया मांडली आहे. ध्यानधारणा, समाधी, कुंडलिनी इ. शब्दांना बिचकणाऱ्या, तरी आत्मसमाधान नि प्रसन्नपणा शोधणाऱ्या साधकांना हे पुस्तक निरतिशय उपयुक्त आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: संतवाङ्मयातील ‘रांडापोरे!’
‘‘ संतवाङ्मयात एक अत्यंत उद्वेगकारक प्रकार आढळून येतो. आपले बहुतेक सारे संत परमार्थाच्या मार्गावर होते. परमेश्वराची प्राप्ती हा त्यांचा एकच ध्यास होता. परंतु त्या मार्गात स्त्रिया आणि मुलेबाळे ही फार विघ्ने आणतात असा या सर्वाचा अभिप्राय होता. अर्थात् जे आपल्या ध्येयाच्या आड येतात, त्यांच्या संबंधाने अवहेलनेने बोलावे, त्यांना शिव्याही द्याव्यात हे ओघानेच येते. तुमच्या-आमच्यासारख्या साध्या माणसांनी हा प्रकार केला तर त्यात काही विशेष नाही. पण संत जेव्हा अपशब्दांचा भडिमार करू लागतात तेव्हा मात्र आपण बिचकून उभे राहतो आणि कोणाच्या तोंडी काय यावे यासंबंधीची आपली अपेक्षा फसल्यामुळे आपण थोडे खिन्न होतो; व एरवी ज्यांना संत म्हणावयाचे तेसुद्धा प्रसंग आला म्हणजे तोंडाळपणा करतातच, असे आपण आपल्या मनाशी पुटपुटतो. बायका-मुलांना रांडापोरे म्हणणे हा संतांचा नित्याचा खेळ होता.. संतांनी जर रागावण्याची परवानगी घेतलेली आहे तर ती परवानगी आपल्याला देण्याला संतांचे पक्षपाती लोक कुरकूर करणार नाहीत असा भरंवसा आहे.’’
श्री. म. माटे ‘संतवाङ्मयातील ‘रांडापोरे!’’ या लेखात संतांच्या बोलण्यातील विसंगतीही दाखवून देतात-‘‘नवलाची गोष्ट अशी आहे की परमेश्वराला आळविताना संतांनी त्याला कित्येकदा ‘आई’ या नावाने हाक मारली आहे, हे फार चांगले आहे. परंतु संतांच्या हे ध्यानात यावयास हवे होते की प्रथम बायको असल्याशिवाय कोणीही स्त्री आई होऊ शकत नाही. संतांच्या पोटात बायकांबद्दल मोठा राग; परंतु आईबद्दल मात्र त्यांच्या पोटात प्रेमाचा महापूर.. संत होणे हा आपला अधिकार आहे; आणि आपण काही एका उंचावरून बोलले पाहिजे असाच थाट संतांनी ठेवलेला असल्यामुळे सगळ्या समाजाच्या मनात बायकांसंबंधी जी अवहेलना असते, तीच संतांच्या ठिकाणीही प्रकट झाली आहे. असो. सांगण्याचे तात्पर्य असे की ज्यांचे वाङ्मय वाचले असताना आपल्या मनात अत्यंत उदात्त भावना उत्पन्न होतात, त्यांचे स्त्रियांसंबंधीचे उद्गार अतिशय उद्वेगकारक वाटतात. असे उद्गार त्यांनी काढावे याचे कारण हेच की स्त्रियांच्या थोर मानवतेची ओळख इतर लोकांप्रमाणेच संतांनाही झालेली नव्हती.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 1:38 am

Web Title: curiosity shower gel and bubble bath
टॅग Curiosity
Next Stories
1 कुतूहल: गोरं करणारा साबण
2 कुतूहल: पी.एच. (pH) बॅलन्स्ड सोप
3 कुतूहल – साबणातील घटकद्रव्य
Just Now!
X